निर्गम
३० धूप जाळण्यासाठी एक वेदी बनव;+ ती बाभळीच्या लाकडाची असावी.+ २ ती चौकोनी असावी. तिची लांबी एक हात,* रुंदी एक हात आणि उंची दोन हात असावी. वेदी आणि शिंगं लाकडाच्या एकाच तुकड्यापासून बनवलेली असावीत.+ ३ वेदीचा वरचा भाग, तिच्या चारही बाजू आणि तिची शिंगं, अशी संपूर्ण वेदी शुद्ध सोन्याने मढव. तिच्यासभोवती सोन्याची किनार* बनव. ४ वेदीच्या दोन बाजूंना, किनारीच्या* खाली सोन्याच्या दोन कड्या बनव; वेदी उचलून नेताना या कड्यांमधून दांडे घालता येतील. ५ दांडे बाभळीच्या लाकडापासून बनव आणि त्यांना सोन्याने मढव. ६ जिथे मी तुला प्रकट होईन,+ त्या साक्षपेटीच्या जवळ असलेल्या पडद्यासमोर तू ती वेदी ठेव.+ ती साक्षपेटीसमोर आणि तिच्या झाकणासमोर असावी.
७ दररोज सकाळी जेव्हा अहरोन+ दिव्यांची+ तेलवात करेल, तेव्हा त्याने वेदीवर सुगंधी धूप+ जाळावा.+ ८ तसंच, संध्याकाळी* जेव्हा तो दिवे पेटवेल तेव्हाही त्याने धूप जाळावा. तुम्ही पिढ्या न् पिढ्या यहोवासमोर नियमितपणे हे धूपार्पण द्या. ९ नियमानुसार नसलेला धूप,+ होमार्पण किंवा अन्नार्पण वेदीवर देऊ नका; तसंच, तिच्यावर पेयार्पणही ओतू नका. १० वर्षातून एकदा अहरोनने वेदीच्या शिंगांवर प्रायश्चित्त करावं.+ पिढ्या न् पिढ्या, तो वर्षातून एकदा प्रायश्चित्तासाठी केलेल्या पापार्पणातलं काही रक्त घेऊन वेदीसाठी प्रायश्चित्त करेल.+ ही वेदी यहोवासाठी परमपवित्र आहे.”
११ मग यहोवा मोशेला म्हणाला: १२ “जेव्हाही तू जनगणनेच्या वेळी इस्राएलच्या मुलांची मोजणी करशील,+ तेव्हा प्रत्येकाने यहोवाला आपल्या जिवासाठी खंडणी द्यावी, म्हणजे नावनोंदणी करताना त्यांच्यावर कोणतीही पीडा येणार नाही. १३ ज्यांची नावनोंदणी होईल त्यांच्यापैकी प्रत्येकाने पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे*+ अर्धा शेकेल* द्यावा. (एक शेकेल म्हणजे २० गेरे* आहेत.) अर्धा शेकेल हे यहोवासाठी दान आहे.+ १४ नावनोंदणी झालेल्या २० आणि त्यापेक्षा जास्त वर्षं वयाच्या प्रत्येकाने यहोवासाठी दान द्यावं.+ १५ आपल्या जिवांकरता प्रायश्चित्त करण्यासाठी यहोवाला दान देताना श्रीमंताने अर्ध्या शेकेलपेक्षा* जास्त, तर गरिबाने त्यापेक्षा कमी देऊ नये. १६ प्रायश्चित्त करण्यासाठी इस्राएली लोकांकडून घेतलेले चांदीचे पैसे तू भेटमंडपाच्या सेवेसाठी दे. यहोवासमोर इस्राएली लोकांची आठवण राहावी म्हणून ते द्यावेत, म्हणजे तुमच्या जिवांचं प्रायश्चित्त होईल.”
१७ मग यहोवा मोशेला म्हणाला: १८ “तांब्याचं एक मोठं भांडं* आणि त्याची बैठक बनव;+ ते भेटमंडपाच्या आणि वेदीच्या मधोमध ठेवून त्यात पाणी भर.+ १९ अहरोन आणि त्याची मुलं तिथे हातपाय धुतील.+ २० भेटमंडपात जाताना, तसंच सेवा करण्यासाठी किंवा अग्नीत जाळून केलेलं अर्पण यहोवाला देण्यासाठी वेदीजवळ जाताना, त्यांनी स्वतःला पाण्याने धुऊन शुद्ध करावं म्हणजे ते मरणार नाहीत. २१ त्यांनी आपले हातपाय धुवावेत म्हणजे ते मरणार नाहीत. हा एक कायमचा नियम आहे आणि अहरोनने व त्याच्या वंशजांनी तो पिढ्या न् पिढ्या पाळावा.”+
२२ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २३ “यानंतर सगळ्यात चांगल्या प्रकारचे सुगंधी पदार्थ घे: ५०० शेकेल गंधरसाचा डिंक, त्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे २५० शेकेल दालचिनी, २५० शेकेल वेखंड,* २४ पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे*+ ५०० शेकेल तज,* तसंच एक हिन* जैतुनाचं तेल घे. २५ मग त्यांपासून अभिषेकाचं पवित्र तेल बनव; त्यांचं कुशलपणे मिश्रण तयार कर.+ हे अभिषेकाचं पवित्र तेल असेल.
२६ तू त्या तेलाने भेटमंडपाचा आणि साक्षपेटीचा अभिषेक कर.+ २७ तसंच, मेजाचा व त्याच्या सगळ्या भांड्यांचा, दीपवृक्षाचा व त्याच्या भांड्यांचा, धूपवेदीचा, २८ होमार्पणाच्या वेदीचा व तिच्या भांड्यांचा आणि तांब्याच्या मोठ्या भांड्याचा व त्याच्या बैठकीचा अभिषेक कर. २९ या सर्व गोष्टींना पवित्र कर, म्हणजे त्या परमपवित्र होतील.+ त्यांना हात लावणाऱ्यानेही पवित्र असावं.+ ३० तू अहरोनचा आणि त्याच्या मुलांचा अभिषेक कर+ आणि याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी त्यांना पवित्र कर.+
३१ तू इस्राएली लोकांना असं सांग, ‘तुमच्या पिढ्या न् पिढ्या हे माझ्यासाठी अभिषेकाचं पवित्र तेल असेल.+ ३२ हे तेल कोणाही व्यक्तीच्या अंगाला लावलं जाऊ नये. यासारखं दुसरं कोणतंही मिश्रण बनवू नका. ते पवित्र आहे आणि तुम्ही त्याला नेहमी पवित्र समजावं. ३३ जो कोणी त्यासारखं मिश्रण तयार करेल आणि त्यातलं काही दुसऱ्या कोणाला* लावेल, त्याला ठार मारलं जावं.’”+
३४ मग यहोवा मोशेला म्हणाला: “हे सुगंधी पदार्थ+ सारख्या प्रमाणात घे: सुगंधी डिंक, शेखेलेथ,* गंधबिरुजा* आणि शुद्ध ऊद.* ३५ त्यांपासून धूप बनव;+ हे मिश्रण कुशलपणे एकत्र केलेलं, मीठ घातलेलं,+ शुद्ध आणि पवित्र मिश्रण असावं. ३६ यापैकी थोडं कुटून त्याची बारीक पूड तयार कर. मी तुला जिथे प्रकट होईन, त्या भेटमंडपातल्या साक्षपेटीसमोर* त्यातली थोडी पूड ठेव. हा धूप तुमच्यासाठी परमपवित्र असावा. ३७ या पद्धतीने तयार केलेला धूप तू स्वतःच्या वापरासाठी बनवू नकोस.+ तो तू यहोवासाठी पवित्र समजावा. ३८ जो कोणी त्या सुवासाचा आनंद घेण्यासाठी त्यासारखं काही तयार करेल, त्याला ठार मारलं जावं.”