रोमकर
१२ त्यामुळे बांधवांनो, मी देवाच्या करुणेने तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला स्वीकारयोग्य बलिदान म्हणून अर्पण करावीत. अशा रीतीने, तुम्हाला आपल्या विचारशक्तीने* पवित्र सेवा करता येईल. २ आणि यापुढे या जगाच्या व्यवस्थेचे* अनुकरण करू नका, तर आपली विचारसरणी बदलून स्वतःचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे, देवाची उत्तम, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे याची तुम्हाला खातरी पटेल.
३ देवाकडून मिळालेल्या अपार कृपेने मी तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगतो, की कोणीही स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा मोठे समजू नये, तर देवाने प्रत्येकाला जितका विश्वास दिला आहे* त्यानुसार स्वतःबद्दल समंजसपणे विचार करावा. ४ कारण ज्याप्रमाणे आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत, पण ते सर्व एकाच प्रकारचे कार्य करत नाहीत; ५ त्याचप्रमाणे, आपणसुद्धा पुष्कळ असलो, तरी ख्रिस्तासोबतच्या ऐक्यात एक शरीर असून एकमेकांना जोडलेले अवयव आहोत. ६ देवाच्या अपार कृपेने आपल्याला निरनिराळी कृपादाने मिळाली आहेत. त्यामुळे जर भविष्यवाणी करण्याचे कृपादान मिळाले असेल, तर आपल्याला दिलेल्या विश्वासानुसार आपण भविष्यवाणी करू या; ७ किंवा सेवेचे कृपादान असेल, तर सेवा करत राहू या; किंवा ज्याला शिकवण्याचे कृपादान मिळाले आहे, त्याने शिक्षण देत राहावे; ८ किंवा ज्याला प्रोत्साहन देण्याचे* कृपादान मिळाले आहे, त्याने प्रोत्साहन द्यावे;* जो दान देतो,* त्याने ते उदारपणे द्यावे; जो नेतृत्व करतो,* त्याने ते मेहनतीने* करावे; आणि जो दया दाखवतो, त्याने ती आनंदाने दाखवावी.
९ तुमचे प्रेम निष्कपट असावे. वाइटाचा द्वेष करा आणि चांगल्याला जडून राहा. १० भावाभावांसारखे प्रेम करून एकमेकांबद्दल आपुलकी बाळगा. एकमेकांचा आदर करण्यात पुढाकार घ्या. ११ मेहनती* असा, आळशी असू नका.* आत्म्याने ज्वलंत असा. यहोवाचे* दास होऊन त्याची सेवा करा. १२ आपल्या आशेमुळे आनंद करा. संकटात धीर धरा. प्रार्थना करत राहा. १३ पवित्र जनांच्या गरजा भागवण्यात हातभार लावा. पाहुणचार करत राहा. १४ तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद देत राहा; आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. १५ आनंद करणाऱ्यांसोबत आनंद करा; रडणाऱ्यांसोबत रडा. १६ तुम्ही स्वतःबद्दल जसा विचार करता, तसाच इतरांबद्दलही करा; मोठमोठ्या गोष्टींवर मन लावू नका,* तर हलक्या समजल्या जाणाऱ्या गोष्टी करण्यास तयार असा. स्वतःच्या नजरेत बुद्धिमान होऊ नका.
१७ वाइटाबद्दल कोणाचे वाईट करून फेड करू नका, तर सर्व माणसांच्या दृष्टीने* जे चांगले ते करण्याकडे लक्ष द्या. १८ शक्यतो, सर्व माणसांसोबत होईल तितके शांतीने राहा. १९ प्रिय बांधवांनो, सूड घेऊ नका, तर क्रोध व्यक्त करणे देवावर सोडून द्या. कारण असे लिहिले आहे: “‘सूड घेणं माझं काम आहे, मी परतफेड करेन,’ असे यहोवा* म्हणतो.” २० पण, “तुझा शत्रू भुकेला असेल, तर त्याला खायला दे; तो तहानलेला असेल, तर त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या डोक्यावर निखाऱ्यांचा ढीग ठेवशील.”* २१ वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाइटाला जिंकत राहा.