२ योहान
१ एका वडिलाकडून,* निवडलेल्या स्त्रीला आणि तिच्या मुलांना. तुमच्यावर मी मनापासून प्रेम करतो आणि केवळ मीच नाही, तर ज्या सर्वांना सत्याची ओळख झाली आहे तेसुद्धा तुमच्यावर प्रेम करतात. २ कारण, सत्य आपल्यामध्ये टिकून आहे आणि ते सर्वकाळ आपल्याजवळ राहील. ३ देव जो पिता आणि त्या पित्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांच्याकडून आपल्याला सत्य आणि प्रेम यांसोबतच अपार कृपा, दया आणि शांती लाभेल.
४ तुझी काही मुले, पित्याकडून आपल्याला मिळालेल्या आज्ञेप्रमाणे सत्याच्या मार्गावर चालत आहेत, हे समजल्यामुळे मला खूप आनंद होतो. ५ आणि आता हे स्त्री, मी तुला विनंती करतो, की आपण एकमेकांवर प्रेम करावे. (मी काही तुला नवीन आज्ञा लिहीत नाही, तर आपल्याला सुरुवातीपासून मिळालेली आज्ञाच लिहीत आहे.) ६ आणि प्रेमाचा अर्थ हाच आहे, की आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे. तुम्ही सुरुवातीपासून ऐकलेली आज्ञा हीच आहे, की तुम्ही प्रेम दाखवत राहावे. ७ कारण फसवणूक करणारे पुष्कळ जण जगात निघाले आहेत. येशू ख्रिस्त मानव* म्हणून आला, असे ते मान्य करत नाहीत. जो हे मान्य करत नाही, तोच फसवणूक करणारा आणि ख्रिस्तविरोधी आहे.
८ स्वतःला सांभाळा, म्हणजे तुमच्यामध्ये ज्या गोष्टी उत्पन्न करण्यासाठी आम्ही मेहनत घेतली त्या तुम्ही गमावून बसणार नाही, तर तुम्हाला पूर्ण प्रतिफळ मिळेल. ९ जो ख्रिस्ताच्या शिकवणीत टिकून न राहता मर्यादा ओलांडतो त्याला देवाची पसंती मिळत नाही. पण, जो या शिक्षणात टिकून राहतो त्याला पिता आणि पुत्र या दोघांची पसंती मिळते. १० हे शिक्षण न देणारा कोणीही तुमच्याकडे आला, तर त्याला आपल्या घरात घेऊ नका किंवा त्याला नमस्कारही करू नका. ११ कारण जो कोणी त्याला नमस्कार करतो तो त्याच्या दुष्ट कामांत सहभागी आहे.
१२ मला आणखी बऱ्याच गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. पण, मला त्या कागद आणि शाई यांनी लिहायच्या नाहीत; तर, तुमच्या आनंदात भर पडावी म्हणून प्रत्यक्षात तुमच्याकडे येऊन तुमच्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे.
१३ तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले तुला नमस्कार सांगतात.