मत्तयने सांगितलेला संदेश
१५ मग, यरुशलेमहून काही परूशी आणि शास्त्री येशूकडे आले+ आणि त्याला म्हणाले: २ “तुमचे शिष्य वाडवडिलांच्या परंपरा का मोडतात? जसं की, जेवण्याआधी ते हात धूत* नाहीत.”+
३ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुम्ही आपल्या परंपरांमुळे देवाची आज्ञा का मोडता?+ ४ जसं की, देवाने म्हटलंय, ‘आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा,’+ आणि ‘जो आपल्या वडिलांशी किंवा आईशी अपमानास्पद बोलतो,* त्याला ठार मारलं जावं.’+ ५ पण तुम्ही म्हणता, ‘जो आपल्या वडिलांना किंवा आईला म्हणतो, की “तुम्हाला उपयोगी पडलं असतं असं जे काही माझ्याकडे आहे, ते मी देवाला अर्पण केलंय,”+ ६ तर त्याला आपल्या वडिलांचा आदर करण्याची काही गरज नाही.’ अशा रितीने तुम्ही तुमच्या परंपरांमुळे देवाचं वचन तुच्छ लेखता.+ ७ अरे ढोंग्यांनो, यशयाने भविष्यवाणीत तुमच्याबद्दल जे म्हटलं होतं ते अगदी खरंय:+ ८ ‘हे लोक ओठांनी तर माझा सन्मान करतात, पण त्यांचं हृदय माझ्यापासून फार दूर आहे. ९ ते माझी उपासना करत असले, तरी ती व्यर्थ आहे. कारण ते माणसांच्या आज्ञा, देवाचे सिद्धान्त म्हणून शिकवतात.’”+ १० तेव्हा तो लोकांना आपल्याजवळ बोलावून म्हणाला: “ऐका आणि याचा अर्थ समजून घ्या:+ ११ माणसाच्या तोंडात जे जातं त्यामुळे तो अशुद्ध होत नाही, तर त्याच्या तोंडून जे निघतं त्यामुळे तो अशुद्ध होतो.”+
१२ मग त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले: “परूशी तुझ्या बोलण्याने दुखावले गेले* हे तुला कळलं का?”+ १३ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “माझ्या पित्याने लावलं नाही असं प्रत्येक झाड उपटून टाकलं जाईल. १४ त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ते स्वतः आंधळे असून इतरांना रस्ता दाखवतात. एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला रस्ता दाखवला तर दोघंही खड्ड्यात पडतील.”+ १५ पेत्र म्हणाला: “आम्हाला ते उदाहरण समजावून सांग.” १६ तेव्हा तो म्हणाला: “तुम्हालाही अजून ते समजलं नाही का?+ १७ जे काही माणसाच्या तोंडात जातं ते त्याच्या पोटात जाऊन शरीराबाहेर टाकलं जातं, हे तुम्हाला माहीत नाही का? १८ पण ज्या गोष्टी तोंडातून निघतात त्या माणसाच्या हृदयातून येतात आणि त्याच गोष्टी माणसाला अशुद्ध करतात.+ १९ उदाहरणार्थ, हृदयातून दुष्ट विचार निघतात.+ आणि त्यांमुळे खून, व्यभिचार, अनैतिक लैंगिक कृत्यं,* चोऱ्या, खोट्या साक्षी, निंदा या गोष्टी घडतात. २० या गोष्टी माणसाला अशुद्ध करतात. पण जेवण्याआधी हात न धुतल्यामुळे* माणूस अशुद्ध होत नाही.”
२१ तिथून निघाल्यावर येशू सोर आणि सीदोनच्या प्रदेशात गेला.+ २२ तेव्हा, त्या भागात राहणारी फेनिकेची एक स्त्री त्याच्याकडे आली आणि मोठ्याने म्हणू लागली: “प्रभू, दावीदच्या मुला! माझ्यावर दया करा. माझी मुलगी दुष्ट स्वर्गदूताने* पछाडल्यामुळे खूप त्रासात आहे.”+ २३ पण त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिलं नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंती केली: “तिला जायला सांग, कारण ती ओरडत आपल्या मागेमागे येत आहे.” २४ त्याने उत्तर दिलं: “मला इस्राएलच्या घराण्याच्या हरवलेल्या मेंढरांशिवाय इतर कोणाकडेही पाठवण्यात आलेलं नाही.”+ २५ पण ती स्त्री त्याला नमन करून म्हणाली: “प्रभू, मला मदत करा!” २६ तो तिला म्हणाला: “मुलांसाठी असलेली भाकर कुत्र्याच्या पिल्लांपुढे टाकणं योग्य नाही.” २७ ती म्हणाली: “खरंय प्रभू, पण कुत्र्याची पिल्लंसुद्धा आपल्या मालकांच्या मेजावरून पडणारे तुकडे खातातच ना.”+ २८ तेव्हा येशू तिला म्हणाला: “बाई, तुझा विश्वास खरंच मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे.” आणि त्याच वेळी तिची मुलगी बरी झाली.
२९ तिथून निघाल्यावर येशू गालील समुद्राजवळ आला+ आणि एका डोंगरावर जाऊन तिथे बसला. ३० तेव्हा लोक मोठ्या संख्येने त्याच्याकडे येऊ लागले. त्यांनी आपल्यासोबत लंगड्या, लुळ्या, आंधळ्या, मुक्या आणि अशा बऱ्याच लोकांना आणून त्याच्या पायांजवळ ठेवलं. तेव्हा त्याने त्यांना बरं केलं.+ ३१ जेव्हा लोकांनी पाहिलं, की मुके बोलत आहेत, लुळे बरे होत आहेत, लंगडे चालत आहेत आणि आंधळ्यांना दिसत आहे, तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्यामुळे त्यांनी इस्राएलच्या देवाचा गौरव केला.+
३२ मग, येशू आपल्या शिष्यांना बोलावून म्हणाला: “मला या लोकांची दया येते+ कारण ते तीन दिवसांपासून माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काहीच नाही. त्यांना असंच उपाशी पाठवून देणं मला योग्य वाटत नाही. कारण वाटेत त्यांचे भुकेने हाल होतील.”+ ३३ पण शिष्य त्याला म्हणाले: “अशा या रानात एवढ्या मोठ्या जमावाला पुरेल इतकं अन्न आम्ही कुठून आणणार?”+ ३४ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले: “सात, आणि काही लहान मासे.” ३५ मग लोकांना खाली बसायला सांगून, ३६ येशूने ते मासे आणि सात भाकरी घेतल्या आणि देवाला धन्यवाद देऊन त्या भाकरी मोडल्या. त्याने त्या शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी त्या लोकांना दिल्या.+ ३७ मग सगळे पोटभर जेवले आणि त्यांनी उरलेलं अन्न गोळा केलं, तेव्हा त्याच्या सात मोठ्या टोपल्या भरल्या.+ ३८ जेवणाऱ्यांमध्ये ४,००० पुरुष, तसंच स्त्रिया आणि लहान मुलंही होती. ३९ शेवटी, लोकांना पाठवून दिल्यावर तो नावेत बसून मगदानच्या प्रदेशात गेला.+