रोमकर यांना पत्र
११ तर मग मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना नाकारलं का?+ मुळीच नाही! कारण मी स्वतःसुद्धा एक इस्राएली, अब्राहामच्या संततीचा* आणि बन्यामीनच्या वंशातला आहे. २ देवाने सुरुवातीलाच ज्यांचा विचार केला होता, त्या आपल्या लोकांना त्याने नाकारलं नाही.+ एलीयाबद्दल शास्त्रवचन काय म्हणतं ते तुम्हाला माहीत नाही का? त्याने इस्राएलविरुद्ध देवाकडे अशी तक्रार केली: ३ “हे यहोवा,* त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना मारून टाकलंय, तुझ्या वेदी पाडल्या आहेत आणि मी एकटाच उरलोय. आणि आता ते माझाही जीव घ्यायचा प्रयत्न करत आहेत.”+ ४ पण, देवाने त्याला काय म्हटलं? “तिथे माझी अजूनही ७,००० माणसं आहेत. त्यांनी बआलपुढे गुडघे टेकले नाहीत.”+ ५ त्याचप्रमाणे आजसुद्धा, असेही काही उरलेले आहेत,+ ज्यांना देवाच्या अपार कृपेमुळे निवडण्यात आलं आहे. ६ आणि जर ही निवड अपार कृपेमुळे आहे,+ तर यापुढे ती कार्यांमुळे होत नाही.+ तसं जर असतं, तर अपार कृपा ही अपार कृपा राहिली नसती.
७ मग आता काय म्हणता येईल? इस्राएलने जी गोष्ट मिळवायची खटपट केली, ती त्यांना मिळवता आली नाही, तर निवडलेल्यांनी ती मिळवली.+ पण बाकीच्यांची मनं मात्र कठोर झाली.+ ८ त्यांच्याबद्दल असं लिहिण्यात आलं आहे: “देवाने त्यांना जणू गाढ झोप लागू दिली आहे,+ पाहू न शकणारे डोळे आणि ऐकू न शकणारे कान दिले आहेत. आजपर्यंत त्यांची हीच स्थिती आहे.”+ ९ दावीदसुद्धा म्हणतो: “त्यांचं मेज त्यांच्यासाठी पाश आणि सापळा; अडखळण्याचं आणि शिक्षेचं कारण होईल. १० त्यांच्या डोळ्यांवर अंधारी येऊन त्यांना आंधळं होऊ दे आणि त्यांची पाठ नेहमी ओझ्याने वाकलेली राहू दे.”+
११ तर मग मी विचारतो, ते कायमचा नाश होण्यासाठी अडखळून पडले का? मुळीच नाही! तर त्यांच्यात ईर्ष्या निर्माण व्हावी,+ म्हणून त्यांच्या अपराधामुळे विदेशी लोकांना तारणाची* संधी मिळाली. १२ मग जर त्यांच्या अपराधामुळे जगाला आशीर्वाद मिळाले आणि त्यांच्या कमी होण्यामुळे विदेशी लोकांना आशीर्वाद मिळाले,+ तर त्यांची संख्या पूर्ण झाल्यावर आणखी किती मिळतील!
१३ आता मी तुमच्याशी म्हणजे विदेशी लोकांशी बोलतो. मला प्रेषित म्हणून विदेशी लोकांकडे पाठवण्यात आलं आहे+ आणि मी माझ्या सेवेचा गौरव* करतो.+ १४ यामागचा उद्देश हा, की कसंही करून मी माझ्या स्वतःच्या लोकांमध्ये ईर्ष्या निर्माण करावी आणि त्यांच्यापैकी काहींना वाचवावं.* १५ कारण, जर त्यांचा त्याग केल्यामुळे+ जगातल्या लोकांचा समेट झाला, तर मग त्यांचा स्वीकार केला जाईल तेव्हा काय होईल? मेलेल्यांतून जिवंत होण्यासारखं ते ठरेल. १६ पहिलं फळ म्हणून अर्पण केल्या जाणाऱ्या पिठाचा काही भाग पवित्र असेल, तर संपूर्ण गोळाच पवित्र असेल. आणि जर झाडाचं मूळ पवित्र असेल, तर फांद्याही पवित्र असतील.
१७ पण, त्यांच्यातल्या काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही रानटी जैतून असूनही तुम्हाला त्यांच्यामध्ये कलम करण्यात आलं. आणि जैतुनाच्या मुळातून तुम्हालाही भरपूर पोषण मिळालं. १८ तरीही, त्या तोडलेल्या फांद्यांसमोर तुम्ही बढाई मारू नका.* आणि बढाई मारलीच,*+ तर हे लक्षात असू द्या, की तुम्ही मुळाला आधार देत नाही, तर ते तुम्हाला आधार देतं. १९ आता तुम्ही म्हणाल: “आम्हाला कलम करण्यासाठीच त्या फांद्या तोडण्यात आल्या.”+ २० ते खरं आहे! त्यांच्या अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या.+ पण, तुम्ही तुमच्या विश्वासामुळे उभे आहात.+ म्हणून गर्व करू नका, तर भीती बाळगा. २१ कारण जर देवाने मूळ फांद्यांची गय केली नाही, तर तो तुमचीही गय करणार नाही. २२ म्हणून देवाच्या दयाळूपणाबद्दल+ आणि कठोरपणाबद्दल विचार करा. जे पडले त्यांच्याशी तो कठोरपणे वागला,+ तुमच्याशी मात्र तो दयाळूपणे वागतो. पण तुम्ही त्याच्या दयेत टिकून राहिलं पाहिजे, नाहीतर तुम्हालाही छाटून टाकलं जाईल. २३ आणि जर त्यांनीही अविश्वास दाखवायचं सोडून दिलं, तर त्यांनाही कलम केलं जाईल.+ कारण देव त्यांना पुन्हा कलम करायला समर्थ आहे. २४ तुम्हाला तर रानटी जैतुनाच्या झाडावरून तोडून, चांगल्या जैतुनाच्या झाडावर निसर्ग नियमाविरुद्ध कलम करण्यात आलं होतं. मग, मूळ फांद्यांना पुन्हा आपल्याच झाडावर कलम करणं किती सोपं जाईल!
२५ बांधवांनो, तुम्ही आपल्याच नजरेत बुद्धिमान बनू नये, म्हणून तुम्हाला हे पवित्र रहस्य माहीत असावं असं मला वाटतं:+ इस्राएलमधल्या काही लोकांची मनं कठोर झाली आहेत आणि विदेशी लोकांची संख्या पूर्ण होईपर्यंत ती तशीच राहतील. २६ अशा रितीने संपूर्ण इस्राएलला+ वाचवलं जाईल.* जसं लिहिलं आहे: “तारणकर्ता* सीयोनमधून येईल,+ तो याकोबमधून सगळी वाईट कामं नाहीशी करेल. २७ त्यांची पापं नाहीशी केल्यावर+ मी त्यांच्याशी हा करार करीन.”+ २८ हे खरं आहे, की आनंदाचा संदेश नाकारल्यामुळे ते देवाचे शत्रू आहेत आणि यामुळे तुमचा फायदा झाला. पण, देवाने त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या अभिवचनामुळे त्याने त्यांच्यापैकी काहींना आपले मित्र होण्यासाठी निवडलं.+ २९ कारण दानांच्या आणि बोलावण्याच्या बाबतीत देव आपलं मत बदलणार नाही. ३० एकेकाळी तुम्ही देवाची आज्ञा मानणारे नव्हता,+ पण त्यांनी आज्ञा न मानल्यामुळे+ आता तुम्हाला दया दाखवण्यात आली आहे.+ ३१ ज्याप्रमाणे, त्यांच्या आज्ञा न मानण्यामुळे तुम्हाला दया दाखवण्यात आली, त्याचप्रमाणे त्यांनाही दया दाखवली जाऊ शकते. ३२ सर्वांना दया दाखवण्यात यावी म्हणून+ देवाने त्यांना आज्ञाभंगाचे गुलाम होऊ दिलं आहे.+
३३ देव किती भरभरून आशीर्वाद देतो! त्याची बुद्धी आणि ज्ञान किती अफाट आहे! त्याचे निर्णय सखोल आणि मार्ग आपल्या बुद्धीपलीकडे आहेत. ३४ कारण “यहोवाचं* मन कोणी ओळखलंय? किंवा त्याला कोण सल्ला देऊ शकतं?”+ ३५ किंवा, “त्याला आधी कोणी काय दिलंय, की त्याने त्याची परतफेड करावी?”+ ३६ कारण सगळ्या गोष्टी त्याच्यापासून, त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठीच आहेत. सदासर्वकाळ त्याचाच गौरव होवो. आमेन.