लूक
२२ आता बेखमीर भाकरींचा सण, ज्याला वल्हांडण म्हणतात तो जवळ आला होता. २ आणि मुख्य याजक व शास्त्री येशूला धरून ठार मारण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता असू शकेल, यावर विचार करत होते, कारण त्यांना लोकांची भीती होती. ३ मग सैतानाने बारा शिष्यांपैकी एक असलेल्या व ज्याला इस्कर्योत असे म्हणायचे, त्या यहूदाच्या मनाचा ताबा घेतला. ४ तेव्हा यहूदा, येशूला आपण कशा प्रकारे धरून देऊ याविषयी बोलण्यासाठी मुख्य याजक आणि मंदिराचे अधिकारी यांच्याकडे गेला. ५ त्यांना याचा फार आनंद झाला आणि त्यांनी त्याला चांदीची नाणी देण्याचे कबूल केले. ६ तेव्हा तो तयार झाला आणि लोकांची गर्दी नसेल अशा वेळी येशूला धरून देण्याची एखादी चांगली संधी शोधू लागला.
७ आता बेखमीर भाकरींच्या सणाचा दिवस आला. या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पण केला जायचा. ८ त्यामुळे येशूने पेत्र व योहान यांना असे म्हणून पाठवले, की “जा आणि आपल्यासाठी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी करा.” ९ ते त्याला म्हणाले: “आम्ही कुठे जाऊन तयारी करावी अशी तुझी इच्छा आहे?” १० तो त्यांना म्हणाला: “पाहा! शहरात गेल्यावर तुम्हाला पाण्याचे मडके घेतलेला एक माणूस भेटेल. त्याच्यामागे जा, आणि तो ज्या घरात जाईल तिथे जाऊन ११ त्या घराच्या मालकाला असं म्हणा, ‘गुरुजींनी तुम्हाला विचारलं आहे: “मी जिथे आपल्या शिष्यांसोबत वल्हांडणाचं भोजन करावं, अशी पाहुण्यांची खोली कुठे आहे?”’ १२ तेव्हा तो माणूस सामानसुमान लावून तयार केलेली माडीवरची एक मोठी खोली तुम्हाला दाखवेल. तिथे आपल्यासाठी तयारी करा.” १३ तेव्हा शिष्य गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.
१४ नंतर वेळ झाली तेव्हा तो बारा प्रेषितांसोबत मेजाभोवती जेवायला बसला. १५ मग तो त्यांना म्हणाला: “मी दुःख भोगण्याआधी, तुमच्यासोबत हे वल्हांडणाचं भोजन करावं अशी माझी फार इच्छा होती; १६ कारण मी तुम्हाला सांगतो की देवाच्या राज्यात याची पूर्णता होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही.” १७ मग त्याने प्याला घेतला आणि देवाला धन्यवाद देऊन तो म्हणाला, “हा घ्या आणि तुम्ही सर्व जण एकेक करून यातून प्या. १८ कारण मी तुम्हाला सांगतो, की आजपासून देवाचं राज्य येईपर्यंत मी पुन्हा कधीही हा द्राक्षारस पिणार नाही.”
१९ तसेच त्याने भाकरी घेतली आणि देवाला धन्यवाद देऊन ती मोडली, आणि असे म्हणून त्यांना दिली: “ही माझ्या शरीराला सूचित करते, जे तुमच्यासाठी अर्पण केलं जाणार आहे. माझ्या स्मरणासाठी हे करत राहा.” २० त्याच प्रकारे, संध्याकाळचे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले. तो म्हणाला: “हा प्याला नव्या कराराला सूचित करतो, जो तुमच्यासाठी वाहिल्या जाणाऱ्या माझ्या रक्ताने स्थापित केला जाईल.
२१ पण पाहा! माझा विश्वासघात करणारा माझ्यासोबत एकाच मेजावर जेवत आहे. २२ कारण मनुष्याचा पुत्र तर ठरल्याप्रमाणे जाणारच आहे, पण जो माणूस मनुष्याच्या पुत्राचा विश्वासघात करून त्याला धरून देईल त्याचा धिक्कार असो!” २३ हे ऐकून, आपल्यापैकी असे करणारा खरोखर कोण असावा, याविषयी ते आपसात चर्चा करू लागले.
२४ त्याच वेळी, आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोणाला मानले जाते, यावरून त्यांच्यात मोठा वाद सुरू झाला. २५ पण तो त्यांना म्हणाला: “विदेश्यांचे राजे त्यांच्यावर सत्ता चालवतात आणि त्यांच्यावर अधिकार गाजवणाऱ्यांना जनसेवक* म्हटलं जातं. २६ पण, तुमच्यामध्ये असं असू नये; उलट, तुमच्यामध्ये जो श्रेष्ठ आहे त्याने सर्वात लहान झालं पाहिजे. आणि नेतृत्व करणाऱ्याने इतरांची सेवा केली पाहिजे. २७ कारण, श्रेष्ठ कोण असतो, जेवणारा की त्याची सेवा करणारा? जेवणाराच असतो ना? पण तुमच्यामध्ये मी सेवा करणाऱ्यासारखा आहे.
२८ तरीसुद्धा, माझ्या परीक्षांमध्ये मला जडून राहिलेले तुम्हीच आहात; २९ आणि जसा माझ्या पित्याने माझ्यासोबत एका राज्यासाठी करार केला आहे तसाच मीही तुमच्यासोबत एक करार करतो, की ३० माझ्या राज्यात तुम्ही माझ्यासोबत माझ्या मेजावर खावंप्यावं आणि राजासनांवर बसून इस्राएलच्या बारा वंशांचा न्याय करावा.
३१ शिमोन, शिमोन, पाहा! सैतानाने तुम्हा सर्वांना गव्हाप्रमाणे पाखडण्याची मागणी केली आहे. ३२ पण तुझा विश्वास खचू नये म्हणून मी तुझ्यासाठी याचना केली आहे; आणि तू मागे फिरल्यावर आपल्या बांधवांचा विश्वास दृढ कर.” ३३ मग तो त्याला म्हणाला: “प्रभू, मी तुझ्यासोबत तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार आहे.” ३४ पण तो म्हणाला: “पेत्र, मी तुला सांगतो की जोपर्यंत तू मला तीन वेळा नाकारणार नाहीस तोपर्यंत आज कोंबडा आरवणारच नाही.”
३५ तसेच तो त्यांना म्हणाला: “जेव्हा मी तुम्हाला पैशांचा बटवा, शिदोरी किंवा जास्तीचे जोडे सोबत न घेताच पाठवलं होतं, तेव्हा तुम्हाला कशाचीही अडचण भासली नाही, भासली का?” ते म्हणाले: “नाही!” ३६ मग तो त्यांना म्हणाला: “पण आता मात्र ज्याच्याजवळ पैशांचा बटवा आहे त्याने तो सोबत घ्यावा, तसंच, शिदोरीही घ्यावी. आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला झगा विकून ती विकत घ्यावी. ३७ कारण जे लिहून ठेवण्यात आलं आहे ते माझ्या बाबतीत पूर्ण होणं आवश्यक आहे. ते असं, की ‘त्याला अपराध्यांत गणलं गेलं.’ हे माझ्या बाबतीत आता पूर्ण होत आहे.” ३८ मग ते म्हणाले: “प्रभू, पाहा! दोन तलवारी आहेत.” तो त्यांना म्हणाला: “पुरे.”
३९ तिथून निघाल्यावर तो नेहमीप्रमाणे जैतुनांच्या डोंगरावर गेला आणि शिष्यही त्याच्यामागे गेले. ४० तिथे पोचल्यावर तो त्यांना म्हणाला: “तुम्ही मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करत राहा.” ४१ मग त्यांच्यापासून काही अंतरावर* जाऊन तो गुडघे टेकून प्रार्थना करू लागला ४२ आणि म्हणाला: “बापा, तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” ४३ तेव्हा, स्वर्गातून एक देवदूत त्याच्यासमोर प्रकट झाला आणि त्याने त्याला धीर दिला. ४४ पण तो इतका व्याकूळ झाला होता, की तो आणखीनच कळकळीने प्रार्थना करत राहिला; तेव्हा त्याचा घाम रक्ताच्या थेंबांसारखा जमिनीवर पडू लागला. ४५ तो प्रार्थना करून उठला आणि शिष्यांजवळ गेला, तेव्हा अतिशय दुःखाने शिणल्यामुळे ते झोपी गेले होते. ४६ तो त्यांना म्हणाला: “तुम्ही का झोपत आहात? उठा आणि मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करत राहा.”
४७ तो बोलत होता, इतक्यात एक मोठा जमाव तिथे आला. आणि यहूदा नावाचा माणूस, जो बारा शिष्यांपैकी होता, तो त्यांच्यापुढे चालत होता आणि तो येशूचे चुंबन घेण्यासाठी त्याच्याजवळ आला. ४८ पण येशू त्याला म्हणाला: “यहूदा, तू चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस का?” ४९ त्याच्या सभोवती असलेल्यांनी जेव्हा काय घडणार आहे हे पाहिले, तेव्हा ते म्हणाले: “प्रभू, आम्ही तलवार चालवावी का?” ५० त्यांच्यापैकी एकाने तर तलवार काढून महायाजकाच्या दासावर हल्लाही केला आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. ५१ पण येशू त्यांना म्हणाला: “आता पुरे झालं.” मग त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले. ५२ मग येशू त्याला धरण्यासाठी आलेल्या मुख्य याजकांना, मंदिराच्या अधिकाऱ्यांना आणि वडीलजनांना म्हणाला: “एखाद्या चोराला धरावं तसं तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला धरायला आला आहात का? ५३ दररोज मी तुमच्यासोबत मंदिरात होतो, तेव्हा तुम्ही मला धरलं नाही. पण, ही तुमची आणि अंधाराची राज्य करण्याची वेळ आहे.”
५४ मग ते त्याला अटक करून महायाजकाच्या घरी घेऊन गेले; पण पेत्र बरेच अंतर ठेवून त्याच्या मागेमागे गेला. ५५ ते अंगणाच्या मधोमध शेकोटी पेटवून बसले, तेव्हा पेत्रही त्यांच्यामध्ये बसला होता. ५६ पण एका दासीने त्याला शेकोटीच्या उजेडात बघितले, तेव्हा त्याला निरखून पाहत ती म्हणाली: “हा माणूसही त्याच्यासोबत होता.” ५७ पण त्याने ते नाकारून म्हटले: “बाई, मी त्याला ओळखत नाही.” ५८ काही वेळानंतर आणखी एकाने त्याला पाहून म्हटले: “तूसुद्धा त्यांच्याचपैकी एक आहेस.” पण पेत्र म्हणाला: “मी नाही.” ५९ मग सुमारे एका तासानंतर आणखी एक माणूस पूर्ण खातरीने असे म्हणू लागला: “नक्कीच हा माणूससुद्धा त्याच्यासोबत होता, कारण हादेखील गालीली आहे!” ६० पण पेत्र म्हणाला: “अरे, तू काय बोलतोस मला कळत नाही.” आणि तेवढ्यात, त्याचे बोलणे संपण्याआधीच, एक कोंबडा आरवला. ६१ तेव्हा प्रभूने वळून सरळ पेत्रकडे पाहिले. आणि पेत्रला प्रभूचे हे शब्द आठवले: “आज कोंबडा आरवण्याआधी तू तीन वेळा मला नाकारशील.” ६२ मग, तो बाहेर जाऊन ढसाढसा रडू लागला.
६३ आता ज्यांनी येशूला धरून नेले होते, ते त्याची थट्टा करू लागले आणि त्याला मारू लागले. ६४ मग त्याचा चेहरा झाकून त्यांनी त्याला म्हटले, “भविष्यवाणी कर! आणि तुला कोणी मारलं ते सांग.” ६५ तसेच, त्यांनी आणखी अनेक अपमानास्पद गोष्टी बोलून त्याची निंदा केली.
६६ मग दिवस उजाडल्यावर लोकांच्या वडीलजनांची सभा, म्हणजे मुख्य याजक आणि शास्त्री हे एकत्र जमले आणि त्यांनी त्याला न्यायसभेत* नेले व म्हटले: ६७ “तू ख्रिस्त असशील तर आम्हाला सांग.” पण तो त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही मुळीच विश्वास ठेवणार नाही. ६८ आणि मी तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही मला उत्तर देणार नाही. ६९ पण यापुढे मनुष्याचा पुत्र देवाच्या सामर्थ्यशाली उजव्या हाताला बसलेला असेल.” ७० यावर ते सर्व जण म्हणाले: “तर मग, तू देवाचा पुत्र आहेस का?” तो त्यांना म्हणाला: “तुम्ही स्वतःच तसं म्हणत आहात.” ७१ तेव्हा ते म्हणाले: “आता आणखी साक्षीदारांची काय गरज? कारण, आपण त्याच्या तोंडून स्वतः ऐकलं आहे.”