प्रेषितांची कार्यं
३ पेत्र आणि योहान प्रार्थनेच्या वेळी, दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला* मंदिरात चालले होते. २ तेव्हा लोक जन्मापासून पांगळा असलेल्या एका माणसाला तिथून नेत होते. त्याला मंदिरात जाणाऱ्यांकडे भीक मागता यावी, म्हणून ते दररोज त्याला मंदिराच्या एका फाटकाजवळ बसवायचे. या फाटकाला ‘सुंदर फाटक’ असं म्हटलं जायचं. ३ त्या माणसाला पेत्र आणि योहान मंदिरात जाताना दिसले, तेव्हा तो त्यांच्याकडे भीक मागू लागला. ४ पण पेत्र आणि योहान यांनी सरळ त्याच्याकडे बघून म्हटलं: “आमच्याकडे पाहा.” ५ तेव्हा त्यांच्याकडून काहीतरी मिळेल या आशेने तो त्यांच्याकडे एकटक पाहत राहिला. ६ पण पेत्र म्हणाला: “माझ्याजवळ सोनं-चांदी तर नाही, पण जे माझ्याजवळ आहे ते मी तुला देतो. नासरेथचा येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुला सांगतो, ऊठ आणि चालायला लाग!”+ ७ असं म्हणून त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उभं केलं.+ त्याच क्षणी त्याच्या पायांत बळ आलं.+ ८ म्हणून तो लगेच उठला+ आणि चालू लागला आणि त्यांच्यासोबत मंदिरात गेला. तो चालत, उड्या मारत देवाची स्तुती करत होता. ९ सगळ्यांनी त्याला चालताना आणि देवाची स्तुती करताना पाहिलं. १० तेव्हा त्यांनी त्याला ओळखलं. हाच माणूस मंदिराच्या सुंदर फाटकाजवळ भीक मागत बसायचा हे त्यांच्या लक्षात आलं.+ तो बरा झाला आहे हे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि फार आनंद झाला.
११ त्या माणसाने अजूनही पेत्र आणि योहान यांचा हात धरून ठेवला होता. तेवढ्यात सगळे लोक त्यांच्याकडे, म्हणजे ‘शलमोनचा वऱ्हांडा’+ म्हटलेल्या ठिकाणी धावत आले, कारण ते आश्चर्यचकित झाले होते. १२ पेत्रने हे पाहिलं तेव्हा तो लोकांना म्हणाला: “इस्राएली लोकांनो, तुम्हाला हे पाहून इतकं आश्चर्य का वाटतंय आणि तुम्ही आमच्याकडे असं एकटक का पाहताय? आम्ही स्वतःच्या सामर्थ्याच्या किंवा देवाच्या भक्तीच्या बळावर याला चालायला लावलं असं तुम्हाला वाटतंय का? १३ अब्राहामच्या, इसहाकच्या आणि याकोबच्या देवाने,+ आमच्या पूर्वजांच्या देवाने त्याचा सेवक,+ येशू याचा गौरव केलाय.+ त्या येशूला तुम्ही पिलातच्या हवाली केलं+ आणि त्याने त्याची सुटका करायचं ठरवलं असतानाही तुम्ही त्याला त्याच्यासमोर नाकारलं. १४ हो, तुम्ही त्या पवित्र आणि नीतिमान माणसाला नाकारलं आणि त्याच्याऐवजी खुनी असलेल्या एका माणसाची मागणी केली.+ १५ आणि जो जीवन देणारा मुख्य प्रतिनिधी+ होता, त्याला तुम्ही ठार मारलं. पण देवाने त्याला मेलेल्यांतून उठवलं आणि आम्ही या गोष्टीचे साक्षीदार आहोत.+ १६ त्याच येशूच्या नावाने आणि त्याच्या नावावर असलेल्या आमच्या विश्वासाने, हा जो माणूस तुम्ही पाहताय आणि ज्याला तुम्ही ओळखता, तो बरा झालाय. त्याच विश्वासामुळे हा माणूस तुम्हा सगळ्यांना पूर्णपणे बरा झालेला दिसतोय. १७ भावांनो, तुमच्या अधिकाऱ्यांप्रमाणेच+ तुम्हीही जे केलं ते अज्ञानामुळे केलं,+ हे मला माहीत आहे. १८ पण देवाने सगळ्या संदेष्ट्यांच्या तोंडून जे पूर्वीच घोषित केलं होतं, म्हणजे ख्रिस्ताला दुःख सोसावं लागेल असं जे त्याने सांगितलं होतं,+ ते त्याने अशा रितीने पूर्ण केलंय.
१९ म्हणून पश्चात्ताप करा+ आणि मागे वळा,+ म्हणजे तुमची पापं पुसून टाकली जातील.+ आणि खुद्द यहोवाकडून* तुम्हाला तजेला मिळेल. २० तो तुमच्यासाठी नियुक्त केलेला ख्रिस्त, म्हणजे येशू याला पाठवेल. २१ सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या होण्याच्या ज्या काळांबद्दल देवाने जुन्या काळातल्या आपल्या पवित्र संदेष्ट्यांद्वारे सांगितलं होतं, ते काळ येईपर्यंत येशूने स्वर्गातच राहणं आवश्यक आहे. २२ मोशेनेही स्वतः असं म्हटलं होतं: ‘तुमचा देव यहोवा* तुमच्या भावांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुमच्यासाठी उभा करेल.+ तो जे काही सांगेल ते तुम्ही ऐका.+ २३ खरंतर जो कोणी* त्या संदेष्ट्याचं ऐकणार नाही त्याचा आपल्या लोकांतून पूर्णपणे नाश केला जाईल.’+ २४ शमुवेलपासून आणि त्याच्या नंतर झालेल्या जितक्या संदेष्ट्यांनी देवाचे संदेश सांगितले, त्या सगळ्यांनी या दिवसांबद्दल अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं.+ २५ तुम्ही त्या संदेष्ट्यांची आणि देवाने तुमच्या पूर्वजांसोबत केलेल्या कराराची मुलं आहात.+ देवाने असं म्हणून अब्राहामशी करार केला होता, की ‘तुझ्या संततीमुळे* पृथ्वीवरच्या सर्व कुटुंबांना आशीर्वाद मिळतील.’+ २६ तुम्हा प्रत्येकाला आपली दुष्ट कामं सोडायला मदत करून आशीर्वादित करावं, म्हणून देवाने आपल्या सेवकाला नियुक्त करून सगळ्यात आधी तुमच्याकडे पाठवलं.”+