लूकने सांगितलेला संदेश
२४ पण आठवड्याच्या पहिल्या दिवशी, त्या स्त्रिया आपल्यासोबत तयार केलेले सुगंधी मसाले घेऊन अगदी पहाटेच कबरेजवळ* आल्या.+ २ पण कबरेच्या* दारावर लावलेला मोठा दगड बाजूला केलेला त्यांना दिसला.+ ३ त्या आत गेल्या तेव्हा त्यांना प्रभू येशूचं शरीर तिथे सापडलं नाही.+ ४ यामुळे त्या अगदी गोंधळून गेल्या. पण तेवढ्यात, तेजस्वी वस्त्रं घातलेली दोन माणसं त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली. ५ तेव्हा त्या स्त्रिया इतक्या घाबरल्या, की मान वर करून पाहण्याचंही त्यांचं धैर्य होत नव्हतं. म्हणून ती माणसं त्यांना म्हणाली: “जो जिवंत आहे त्याला तुम्ही मेलेल्यांमध्ये का शोधताय?+ ६ तो इथे नाही, त्याला उठवण्यात आलंय. गालीलमध्ये असताना त्याने तुम्हाला काय सांगितलं होतं ते आठवा. ७ त्याने असं सांगितलं होतं, की मनुष्याच्या मुलाला पापी माणसांच्या हाती धरून दिलं जाईल आणि त्याला वधस्तंभावर* मृत्युदंड दिला जाईल. पण तिसऱ्या दिवशी तो उठेल.”+ ८ तेव्हा त्यांना येशूचे शब्द आठवले.+ ९ मग त्या कबरेकडून* परत आल्या आणि त्यांनी ११ प्रेषितांना आणि इतर सर्वांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या.+ १० मग्दालीया मरीया, योहान्ना आणि याकोबची आई मरीया या त्या स्त्रिया होत्या. तसंच, त्यांच्यासोबत असलेल्या इतर स्त्रियासुद्धा प्रेषितांना या गोष्टी सांगू लागल्या. ११ पण त्यांना या वेडेपणाच्या गोष्टी वाटल्या आणि त्यांनी त्या स्त्रियांवर विश्वास ठेवला नाही.
१२ पण पेत्र उठला आणि धावत कबरेकडे* गेला आणि त्याने आत वाकून पाहिलं, तेव्हा त्याला फक्त मलमलीची कापडं तिथे दिसली. म्हणून तो तिथून निघून गेला आणि काय घडलं असावं याबद्दल मनात विचार करू लागला.
१३ पण त्याच दिवशी दोन शिष्य यरुशलेमपासून जवळपास ११ किलोमीटर* अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाकडे जात होते. १४ तिथे जाताना ते घडलेल्या या सगळ्या गोष्टींबद्दल एकमेकांशी बोलत होते.
१५ ते बोलत असताना आणि चर्चा करत असताना येशू स्वतः तिथे आला आणि त्यांच्यासोबत चालू लागला. १६ पण ते त्याला ओळखू शकले नाहीत.+ १७ तो त्यांना म्हणाला: “तुम्ही चालता चालता कोणत्या गोष्टींबद्दल वादविवाद करताय?” तेव्हा ते थांबले. त्यांचे चेहरे उदास दिसत होते. १८ मग ज्याचं नाव क्लयपा होतं, तो त्याला म्हणाला: “तू यरुशलेममध्ये एकटाच राहणारा कोणी परका आहेस की काय? मागच्या काही दिवसांत काय घडलं हे तुला माहीत नाही का?”* १९ त्याने त्यांना विचारलं: “काय घडलं?” ते त्याला म्हणाले: “नासरेथकर येशूबद्दल+ जे घडलं ते तुला माहीत नाही? तो त्याच्या शिकवणींमुळे आणि कार्यांमुळे देवासमोर आणि सगळ्या लोकांसमोर एक प्रभावशाली संदेष्टा ठरला.+ २० आणि आमच्या मुख्य याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्याला मृत्युदंड देण्यासाठी पकडून दिलं+ आणि वधस्तंभावर खिळलं. २१ पण हाच माणूस इस्राएलची सुटका करेल अशी आमची आशा होती.+ शिवाय, या सगळ्या गोष्टी घडल्यानंतरचा आजचा तिसरा दिवस आहे. २२ तसंच, आमच्यापैकी असलेल्या काही स्त्रियांनीसुद्धा आम्हाला गोंधळात टाकलंय. कारण पहाटेच जेव्हा त्या कबरेजवळ* गेल्या+ २३ तेव्हा त्यांना त्याचं शरीर सापडलं नाही. त्या असं सांगत आल्या, की त्यांना स्वर्गदूतांचं अद्भुत दर्शन झालं आणि येशू जिवंत आहे असं स्वर्गदूतांनी त्यांना सांगितलं. २४ तेव्हा आमच्यासोबत असलेल्यांपैकी काही जण लगेच कबरेजवळ* गेले+ आणि स्त्रियांनी जसं सांगितलं होतं, तसंच त्यांना दिसलं, पण तो त्यांना दिसला नाही.”
२५ मग तो त्यांना म्हणाला: “अरे समज नसलेल्या माणसांनो! संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला* अजूनही कशा समजत नाहीत? २६ ख्रिस्ताने हे सर्व सहन करून+ आपल्या गौरवात जावं, हे आवश्यकच नव्हतं का?”+ २७ मग मोशेपासून सुरुवात करून सर्व संदेष्ट्यांची लिखाणं,+ असं करत त्याने सगळ्या शास्त्रवचनांत स्वतःबद्दल सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ त्यांना समजावून सांगितला.
२८ शेवटी, ते ज्या गावाला जात होते त्याजवळ आले. तेव्हा, आपल्याला आणखी पुढे जायचं आहे असं त्याने दाखवलं. २९ पण त्यांनी त्याला थांबण्याचा आग्रह केला आणि ते म्हणाले: “आमच्यासोबत राहा, कारण संध्याकाळ झाली आहे आणि लवकरच रात्र होईल.” तेव्हा तो त्यांच्यासोबत राहिला. ३० मग जेवत असताना त्याने भाकर घेतली आणि देवाला धन्यवाद दिला. त्यानंतर, ती मोडून तो त्यांना देऊ लागला.+ ३१ त्या क्षणी त्यांचे डोळे पूर्णपणे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखलं. पण तो त्यांच्यासमोरून नाहीसा झाला.+ ३२ तेव्हा ते एकमेकांना म्हणाले: “रस्त्याने चालताना जेव्हा तो आपल्याशी बोलत होता आणि शास्त्रवचनं अगदी स्पष्ट करून सांगत होता, तेव्हा आपल्याला आतल्या आत एक वेगळाच उत्साह जाणवत नव्हता का?” ३३ मग ते लगेच तिथून निघाले आणि यरुशलेमला परतले आणि त्यांना ११ प्रेषित आणि त्यांच्यासोबत जमलेले लोक भेटले. ३४ ते लोक त्यांना म्हणाले: “प्रभू खरोखरच उठलाय आणि तो शिमोनला दिसला!”+ ३५ मग त्यांनी रस्त्याने जाताना घडलेल्या घटनांबद्दल आणि भाकर मोडल्यामुळे त्यांनी कशा प्रकारे त्याला ओळखलं, याबद्दल त्या सगळ्यांना सांगितलं.+
३६ ते या गोष्टींबद्दल बोलत होते, तेवढ्यात तो स्वतः त्यांच्यात येऊन उभा राहिला आणि त्यांना म्हणाला: “तुम्हाला शांती असो.”+ ३७ पण ते खूप घाबरले आणि त्यांना फार भीती वाटली. आपल्याला काहीतरी भास होत आहे असं त्यांना वाटलं. ३८ म्हणून तो त्यांना म्हणाला: “तुम्ही का घाबरलात आणि तुमच्या मनात शंका का येत आहेत? ३९ माझे हातपाय पाहा आणि मीच आहे याची खातरी करून घ्या. मला हात लावून पाहा, कारण जर हा भास असता तर तुम्ही माझ्या हाडामांसाच्या शरीराला हात लावू शकला नसता.” ४० असं म्हणून त्याने त्यांना आपले हात आणि पाय दाखवले. ४१ पण त्यांना इतका आनंद आणि आश्चर्य वाटत होतं, की त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता. तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुमच्याजवळ खायला काही आहे का?” ४२ त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा एक तुकडा दिला. ४३ तेव्हा त्याने तो घेतला आणि त्यांच्यासमोर खाल्ला.
४४ मग तो त्यांना म्हणाला: “तुमच्यासोबत असताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं ते आठवा.+ मी तुम्हाला सांगितलं होतं, की माझ्याबद्दल मोशेच्या नियमशास्त्रात, तसंच संदेष्ट्यांच्या लिखाणांत आणि स्तोत्रांत जे काही लिहिलंय, ते सगळं पूर्ण होणं आवश्यक आहे.”+ ४५ मग शास्त्रवचनांचा अर्थ समजून घेण्यासाठी त्याने त्यांची मनं पूर्णपणे उघडली.+ ४६ आणि तो त्यांना म्हणाला, “शास्त्रात हेच लिहिलंय, की ख्रिस्ताला दुःख सहन करावं लागेल आणि तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यांतून उठेल.+ ४७ आणि यरुशलेमपासून सुरुवात करून+ सगळ्या राष्ट्रांत अशी घोषणा केली जाईल,+ की त्याच्या नावाने पापांच्या क्षमेसाठी सगळ्यांनी पश्चात्ताप करावा.+ ४८ तुम्ही या गोष्टींची साक्ष द्याल.+ ४९ आणि पाहा! माझ्या पित्याने तुम्हाला जे द्यायचं वचन दिलं होतं, ते मी तुमच्यासाठी पाठवीन. पण, तुम्हाला स्वर्गातून ते सामर्थ्य मिळेपर्यंत याच शहरात राहा.”+
५० तिथून निघून त्याने त्यांना बेथानीपर्यंत नेलं. मग आपले हात वर करून त्याने त्यांना आशीर्वाद दिला. ५१ त्यानंतर, तो त्यांच्यापासून वेगळा झाला आणि देवाने त्याला स्वर्गात घेतलं.+ ५२ ते त्याला नमन करून खूप आनंदाने यरुशलेमला परत गेले+ ५३ आणि दररोज मंदिरात जाऊन देवाची स्तुती करू लागले.+