प्रेषितांची कार्यं
५ त्या वेळी, हनन्या नावाचा एक माणूस आणि त्याची बायको सप्पीरा यांनीही आपल्या मालकीची काही जमीन विकली. २ पण हनन्याने मिळालेल्या पैशांतून काही पैसे गुपचूप आपल्याजवळच ठेवले आणि त्याच्या बायकोलाही याबद्दल माहीत होतं. मग त्याने बाकीचे पैसे आणून प्रेषितांच्या पायांजवळ ठेवले.+ ३ तेव्हा पेत्र त्याला म्हणाला: “हनन्या, शेताच्या पैशांतले काही स्वतःजवळच ठेवून, पवित्र शक्तीशी*+ खोटं बोलण्याइतकं सैतानाने तुला धीट कसं काय बनवलं?+ ४ ते शेत विकण्याआधी तुझ्याच मालकीचं नव्हतं का? आणि ते विकल्यानंतरही त्या पैशांवर तुझाच हक्क नव्हता का? मग तू असं काम करायचा विचार मनात का आणलास? तू माणसांशी नाही तर देवाशी खोटं बोलला आहेस.” ५ हे शब्द ऐकताच हनन्या खाली पडला आणि मेला. आणि ज्यांनी ज्यांनी याबद्दल ऐकलं त्या सगळ्यांच्या मनात खूप भीती बसली. ६ मग काही तरुणांनी उठून त्याला कापडांत गुंडाळलं आणि बाहेर नेऊन पुरलं.
७ सुमारे तीन तासांनंतर त्याची बायको तिथे आली. पण काय घडलं आहे हे तिला माहीत नव्हतं. ८ पेत्र तिला म्हणाला: “तुम्ही ते शेत इतक्याच किंमतीत विकलं का?” ती म्हणाली: “हो, इतक्याच किंमतीत.” ९ तेव्हा पेत्र तिला म्हणाला: “तुम्ही दोघांनी मिळून यहोवाच्या* पवित्र शक्तीची परीक्षा पाहायचं का ठरवलं? बघ! ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरलं ते दाराजवळच आहेत आणि ते तुलाही बाहेर नेतील.” १० त्याच क्षणी ती त्याच्या पायांजवळ पडली आणि मेली. तरुणांनी आत येऊन तिला मेलेलं पाहिलं आणि त्यांनी तिला बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याच्या शेजारी पुरलं. ११ या घटनेमुळे मंडळीतल्या बांधवांना आणि ज्यांनी याबद्दल ऐकलं त्या सर्वांना खूप भीती वाटली.
१२ पुढे प्रेषितांनी अजून बरीच चिन्हं आणि चमत्कार केले.+ आणि ते सगळे शलमोनच्या वऱ्हांड्यात+ एकत्र जमायचे. १३ त्यांच्यात सामील होण्याचं आणखी कोणाचंही धैर्य होत नव्हतं, पण सगळे लोक त्यांच्याबद्दल खूप आदराने बोलायचे. १४ शिवाय, प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि त्यांच्यात आणखी स्त्रीपुरुषांची भर पडत गेली.+ १५ लोक तर आजारी माणसांना पलंगांवर आणि अंथरुणांवर आणून मुख्य रस्त्यांवर ठेवायचे. पेत्र तिथून जाईल तेव्हा कमीतकमी त्याची सावली त्यांच्यावर पडेल या आशेने ते असं करायचे.+ १६ तसंच, यरुशलेमच्या आसपासच्या शहरांतूनही मोठ्या संख्येने लोक आजारी माणसांना आणि दुष्ट स्वर्गदूतांनी* पछाडलेल्यांना आणायचे आणि ते सगळे बरे व्हायचे.
१७ तेव्हा महायाजक आणि त्याच्यासोबत सदूकी पंथाचे जितके लोक होते, ते सगळे ईर्ष्येने पेटून उठले. १८ आणि त्यांनी प्रेषितांना पकडून* तुरुंगात टाकलं.+ १९ पण रात्री यहोवाच्या* दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले+ आणि त्यांना बाहेर आणलं. तो त्यांना म्हणाला: २० “मंदिरात जा आणि लोकांना जीवनाचा* संदेश सांगत राहा.” २१ म्हणून दिवस उजाडल्यावर ते मंदिरात जाऊन लोकांना शिकवू लागले.
मग महायाजक आणि त्याच्यासोबतचे लोक आले, तेव्हा त्यांनी न्यायसभेच्या* सदस्यांना आणि इस्राएली लोकांच्या सगळ्या वडीलजनांना एकत्र केलं. त्यांनी प्रेषितांना त्यांच्यासमोर हजर करण्यासाठी काही माणसांना तुरुंगाकडे पाठवलं. २२ पण ती माणसं तुरुंगात आली तेव्हा त्यांना प्रेषित तिथे सापडले नाहीत. त्यामुळे ती माणसं परत आली आणि म्हणाली: २३ “आम्हाला तुरुंगाचे दरवाजे कुलूप लावून नीट बंद केलेले दिसले आणि दरवाजांवर पहारेकरीही उभे असलेले दिसले. पण दरवाजे उघडल्यावर आम्हाला आत कोणीच सापडलं नाही.” २४ मंदिराचा अधिकारी आणि मुख्य याजक यांनी हे ऐकलं तेव्हा ते गोंधळात पडले आणि आता पुढे काय होईल याचा विचार करू लागले. २५ पण इतक्यात एक जण तिथे येऊन म्हणाला: “तुम्ही ज्या माणसांना तुरुंगात टाकलं होतं, ते मंदिरात उभे राहून लोकांना शिकवत आहेत.” २६ तेव्हा अधिकारी आपल्या शिपायांसोबत तिथे गेला आणि ते त्यांना आपल्यासोबत घेऊन आले. पण शिपायांनी त्यांना मारहाण केली नाही, कारण लोक आपल्याला दगडमार करतील अशी भीती त्यांना होती.+
२७ मग त्यांनी त्यांना आणलं आणि न्यायसभेपुढे उभं केलं. तेव्हा महायाजकाने त्यांना काही प्रश्न विचारले आणि तो म्हणाला: २८ “या नावाने लोकांना शिकवू नका अशी आम्ही तुम्हाला सक्त ताकीद दिली होती.+ पण तुम्ही तर संपूर्ण यरुशलेम शहरात तुमच्या शिकवणी पसरवल्या आहेत. आणि या माणसाच्या रक्ताचा दोष आमच्या माथी मारायचं तुम्ही जसं काही ठरवूनच टाकलंय!”+ २९ तेव्हा पेत्र आणि इतर प्रेषितांनी उत्तर दिलं: “आम्ही माणसांपेक्षा देवाची* आज्ञा पाळली पाहिजे.+ ३० ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर* लटकवून ठार मारलं, त्याला आमच्या पूर्वजांच्या देवाने उठवलं.+ ३१ इस्राएलला पश्चात्ताप करायला आणि आपल्या पापांची क्षमा मिळवायला मदत करण्यासाठी,+ देवाने येशूचा गौरव करून त्याला आपल्या उजव्या हाताला बसवलं+ आणि त्याला मुख्य प्रतिनिधी+ आणि तारण करणारा+ म्हणून नेमलं. ३२ आणि आम्ही या गोष्टींचे साक्षीदार आहोत.+ शिवाय, देवाला आपला शासक म्हणून जे स्वीकारतात त्यांना त्याने दिलेली पवित्र शक्तीसुद्धा या गोष्टींची साक्षीदार आहे.”+
३३ हे ऐकून ते खूप संतापले आणि त्यांना ठार मारायचा विचार करू लागले. ३४ पण त्या वेळी गमलियेल+ नावाचा एक परूशी न्यायसभेत उठून उभा राहिला. तो नियमशास्त्राचा शिक्षक होता आणि सगळे त्याचा आदर करायचे. त्याने प्रेषितांना काही वेळ बाहेर पाठवायची आज्ञा दिली. ३५ मग तो इतरांना म्हणाला: “इस्राएलच्या लोकांनो, या माणसांसोबत जे काही कराल ते विचारपूर्वक करा. ३६ कारण काही दिवसांपूर्वी थुदास नावाचा एक माणूस उठला होता. आपण कोणीतरी आहोत असं तो सांगायचा आणि बरेच, म्हणजे जवळजवळ ४०० जण त्याच्या गटात सामील झाले. पण तो मारला गेला आणि त्याच्यामागे चालणाऱ्यांची पांगापांग झाली आणि शेवटी त्याचं काहीच उरलं नाही. ३७ मग त्याच्यानंतर नावनोंदणीच्या दिवसांत गालीलचा यहूदाही उठला होता आणि त्यानेही काही माणसांना आपल्यामागे ओढलं. पण त्या माणसाचाही नाश झाला आणि त्याच्यामागे जाणाऱ्यांची पांगापांग झाली. ३८ म्हणूनच आताही मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही या माणसांच्या भानगडीत पडू नका, त्यांना जाऊ द्या. कारण ही योजना किंवा हे कार्य माणसांचं असेल तर ते नष्ट होईल. ३९ पण जर का ते देवाचं असलं, तर तुम्ही त्यांच्यावर कधीच विजय मिळवू शकणार नाही.+ शिवाय, तुम्ही खुद्द देवाशी लढणारे ठराल.”+ ४० म्हणून त्यांनी त्याचा सल्ला मानला आणि प्रेषितांना बोलावून त्यांना फटके मारले+ आणि येशूच्या नावाने न बोलण्याची आज्ञा देऊन त्यांना जाऊ दिलं.
४१ तेव्हा, आपल्याला येशूच्या नावासाठी अनादर करायच्या लायकीचं समजण्यात आलं, म्हणून ते आनंदाने न्यायसभेतून बाहेर गेले.+ ४२ आणि दररोज मंदिरात आणि घरोघरी+ जाऊन लोकांना शिकवण्यात आणि ख्रिस्त, म्हणजे येशू याच्याबद्दलचा आनंदाचा संदेश सांगण्यात त्यांनी खंड पडू दिला नाही.+