योहान
३ परूश्यांपैकी निकदेम नावाचा एक माणूस होता. तो यहुदी लोकांचा एक अधिकारी होता. २ हा माणूस रात्रीच्या वेळी येशूजवळ आला आणि त्याला म्हणाला: “रब्बी,* तुम्ही देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला माहीत आहे. कारण, देव एखाद्या मनुष्यासोबत असल्याशिवाय, तुम्ही करत आहात तशी अद्भुत कार्ये तो करूच शकत नाही.” ३ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “मी तुला खरं सांगतो, जोपर्यंत एखाद्याचा नव्याने जन्म* होत नाही तोपर्यंत तो देवाचं राज्य पाहू शकत नाही.” ४ निकदेम त्याला म्हणाला: “माणूस मोठा झाल्यानंतर त्याचा नव्याने जन्म होणं कसं शक्य आहे? तो दुसऱ्यांदा आपल्या आईच्या उदरात जाऊन जन्म घेऊ शकतो का?” ५ येशूने उत्तर दिले: “मी तुला खरं सांगतो, पाण्याने व आत्म्याने जन्म होईपर्यंत कोणीही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. ६ जो शरीरापासून जन्मला आहे, तो शारीरिक आहे आणि जो आत्म्याने जन्मला आहे तो आत्मिक आहे. ७ तुमचा नव्याने जन्म झाला पाहिजे, असं मी तुला सांगितलं म्हणून आश्चर्य करू नकोस. ८ वारा पाहिजे तिथे वाहतो आणि तू त्याचा आवाज ऐकतोस, पण तो कुठून येतो आणि कुठे जातो हे तुला माहीत नसतं. ज्या कोणाचा आत्म्याने जन्म झाला आहे त्याच्या बाबतीतही असंच आहे.”
९ निकदेम त्याला म्हणाला: “असं कसं होऊ शकतं?” १० येशू म्हणाला: “तू इस्राएली लोकांचा गुरू असूनही तुला या गोष्टी माहीत नाहीत का? ११ मी तुला खरं सांगतो, आम्हाला जे माहीत आहे त्याविषयी आम्ही सांगतो, आणि जे पाहिलं आहे त्याविषयी साक्ष देतो, पण आम्ही दिलेली साक्ष तुम्ही स्वीकारत नाही. १२ मी तुला पृथ्वीविषयीच्या गोष्टी सांगितल्यावर जर तू विश्वास ठेवत नाहीस, तर स्वर्गाविषयीच्या गोष्टी सांगितल्यावर तू काय विश्वास ठेवशील? १३ शिवाय, जो स्वर्गातून खाली उतरला, त्या मनुष्याच्या पुत्राला सोडून दुसरा कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. १४ आणि ज्या प्रकारे मोशेने रानात सर्पाला उंच केलं होतं, त्याच प्रकारे मनुष्याच्या पुत्राला उंच केलं जाईल, १५ यासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला सर्वकाळाचं जीवन मिळावं.
१६ कारण देवाने जगावर इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो* त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं. १७ कारण देवाने जगाचा न्याय करण्यासाठी आपल्या पुत्राला जगात पाठवलं नाही, तर त्याच्याद्वारे जगाचं तारण व्हावं म्हणून पाठवलं. १८ जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय केला जाणार नाही. जो कोणी विश्वास ठेवत नाही, त्याचा आधीच न्याय करण्यात आला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही. १९ आणि न्याय केला जातो तो याच आधारावर, की प्रकाश जगात आला, पण माणसांनी प्रकाशापेक्षा अंधाराला जास्त पसंत केलं कारण त्यांची कार्ये दुष्ट होती. २० कारण जो कोणी वाईट कामे करतो त्याला प्रकाश नकोसा वाटतो आणि त्याची कार्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून तो प्रकाशाकडे येत नाही. २१ पण जो योग्य ते करतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की त्याने देवाच्या इच्छेनुसार कार्ये केली आहेत हे उघड व्हावं.”
२२ यानंतर येशू व त्याचे शिष्य यहूदीयाच्या खेड्यापाड्यांत गेले आणि तिथे तो काही काळ त्यांच्यासोबत राहून बाप्तिस्मा देत होता. २३ पण त्याच वेळी योहानसुद्धा शालिमजवळ एनोन इथे बाप्तिस्मा देत होता. तिथे भरपूर पाणी होते आणि लोक त्याच्याकडे येत होते व तो त्यांना बाप्तिस्मा देत होता; २४ कारण योहानला अजून तुरुंगात टाकण्यात आले नव्हते.
२५ मग योहानच्या शिष्यांचा एका यहुदी माणसाबरोबर शुद्धीकरणावरून वाद झाला. २६ त्यामुळे ते योहानकडे आले आणि त्याला म्हणाले: “हे गुरू, यार्देनच्या पलीकडे जो मनुष्य तुझ्यासोबत होता आणि ज्याच्याविषयी तू साक्ष दिली होती, तो बाप्तिस्मा देत आहे आणि सर्व लोक त्याच्याकडे जात आहेत.” २७ योहानने उत्तर दिले: “कोणत्याही माणसाला देवाने दिल्याशिवाय एकही गोष्ट मिळू शकत नाही. २८ ‘मी ख्रिस्त नाही, तर मला त्याच्यापुढे पाठवण्यात आलं आहे,’ असं मी म्हटल्याचे तुम्ही स्वतः साक्षी आहात. २९ ज्याची वधू असते तोच वर असतो. पण वराचा मित्र उभा राहून त्याचं बोलणं ऐकतो, तेव्हा वराचा आवाज ऐकून त्याला खूप आनंद होतो. त्याच प्रकारे माझा आनंद परिपूर्ण झाला आहे. ३० त्याने वाढत जावं आणि मी कमी होत जावं हे आवश्यक आहे.”
३१ जो वरून येतो तो इतर सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. जो पृथ्वीपासून आहे तो पृथ्वीचा आहे आणि तो पृथ्वीवरील गोष्टींबद्दल बोलतो. जो स्वर्गातून येतो तो इतर सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. ३२ त्याने जे पाहिलं व ऐकलं आहे त्याची तो साक्ष देतो, पण कोणीही त्याची साक्ष स्वीकारत नाही. ३३ ज्याने त्याची साक्ष स्वीकारली आहे त्याने देव खरा आहे या गोष्टीची खातरी दिली आहे.* ३४ देवाने ज्याला पाठवले तो देवाची वचने बोलतो; कारण देव उदारपणे आपला आत्मा देतो.* ३५ पित्याचे पुत्रावर प्रेम आहे आणि त्याने सर्व गोष्टी त्याच्या हातात दिल्या आहेत. ३६ जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळतं; जो पुत्राच्या आज्ञा मोडतो त्याला जीवन मिळणार नाही, तर देवाचा क्रोध त्याच्यावर कायम राहील.