प्रेषितांची कार्यं
२ नंतर, पेन्टेकॉस्टच्या सणाच्या दिवशी+ सगळे शिष्य एकाच घरात जमले होते. २ तेव्हा अचानक आकाशातून सोसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज ऐकू आला आणि ते बसले होते त्या पूर्ण घरात तो आवाज घुमू लागला.+ ३ मग त्यांना आगीच्या ज्वालांसारखं काहीतरी दिसलं. त्या ज्वाला जिभेच्या आकाराच्या होत्या आणि अशी एकएक ज्वाला त्यांच्यापैकी प्रत्येकावर येऊन थांबली. ४ तेव्हा ते सगळे पवित्र शक्तीने* भरून गेले.+ आणि पवित्र शक्तीने त्यांना सामर्थ्य दिलं त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागले.+
५ त्या वेळी आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातले यहुदी उपासक यरुशलेममध्ये राहत होते.+ ६ त्यामुळे, हा आवाज ऐकू आला तेव्हा तिथे लोकांची गर्दी जमली आणि ते सगळे गोंधळून गेले. कारण प्रत्येक जण शिष्यांना आपल्या भाषेत बोलताना ऐकत होता. ७ यामुळे त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “हे सगळे बोलणारे गालीलचेच+ आहेत ना? ८ मग, ते आपल्यापैकी प्रत्येकाच्या मातृभाषेत* कसं काय बोलत आहेत? ९ आपण सगळे, म्हणजे पार्थी, मेदी,+ एलामी,+ तसंच मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत आणि आशिया प्रांताचे लोक,+ १० फ्रुगीया, पंफुल्या, इजिप्त* आणि कुरेनेजवळ असलेल्या लिबियाच्या प्रदेशाचे रहिवासी, रोमवरून आलेले यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेले लोक,+ ११ क्रेतचे रहिवासी आणि अरबी, असे आपण सगळे त्यांना आपल्या भाषांमध्ये देवाच्या अद्भुत गोष्टींबद्दल बोलताना ऐकतोय.” १२ अशा रितीने त्या सगळ्यांनाच खूप नवल वाटलं आणि ते गोंधळून एकमेकांना म्हणू लागले: “याचा काय अर्थ असेल?” १३ तर इतर लोक शिष्यांची टिंगल करू लागले आणि म्हणाले: “हे द्राक्षारसाच्या नशेत आहेत.”
१४ पण पेत्र ११ प्रेषितांसोबत उभा राहिला+ आणि मोठ्या आवाजात म्हणाला: “यहूदीयाच्या माणसांनो आणि यरुशलेमच्या सगळ्या रहिवाशांनो, माझं बोलणं लक्ष देऊन ऐका. १५ तुम्हाला वाटतंय तसं हे लोक प्यायलेले नाहीत. कारण आता सकाळचे फक्त नऊ वाजले आहेत.* १६ उलट योएल संदेष्ट्याद्वारे असं सांगण्यात आलं होतं: १७ ‘देव म्हणतो, “शेवटच्या दिवसांत मी माझी पवित्र शक्ती सर्व प्रकारच्या माणसांवर ओतीन. आणि तुमची मुलं आणि तुमच्या मुली भविष्यवाण्या करतील आणि तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील आणि तुमच्यातली वृद्ध माणसं स्वप्नं पाहतील.+ १८ आणि त्या दिवसांत मी माझ्या दासांवर आणि दासींवरही माझी पवित्र शक्ती ओतीन आणि ते भविष्यवाणी करतील.+ १९ मी वर आकाशात अद्भुत गोष्टी आणि खाली पृथ्वीवर चिन्हं घडवून आणीन. रक्त, आग आणि धुराचे लोट यांसारख्या गोष्टी दिसतील. २० यहोवाचा* महान आणि पराक्रमी दिवस येण्याआधी सूर्य काळवंडेल आणि चंद्र रक्तासारखा लाल होईल. २१ आणि जो कोणी यहोवाचं* नाव घेऊन त्याला हाक मारेल, त्याला वाचवलं जाईल.” ’*+
२२ इस्राएली लोकांनो, माझं ऐका: नासरेथकर येशू याला देवाने तुमच्याकडे पाठवलं. त्याच्याद्वारे त्याने सगळ्यांसमोर पुष्कळ अद्भुत कार्यं आणि चमत्कार करून याचा पुरावाही दिला,+ हे तुम्हाला तर माहीतच आहे. २३ या माणसाला देवाच्या इच्छेप्रमाणे* आणि त्याच्या पूर्वज्ञानाप्रमाणे दुष्टांच्या स्वाधीन करण्यात आलं+ आणि तुम्ही त्याला वधस्तंभावर* खिळून ठार मारलं.+ २४ पण देवाने त्याला मृत्यूच्या विळख्यातून* सोडवून पुन्हा जिवंत केलं.*+ कारण मृत्यूने त्याला बांधून ठेवावं हे शक्य नव्हतं.+ २५ दावीद त्याच्याबद्दल म्हणतो: ‘मी यहोवाला* सतत माझ्या डोळ्यांपुढे* ठेवतो. तो माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे माझी पावलं कधीही डळमळणार नाहीत. २६ म्हणूनच माझं हृदय आनंदित झालं आणि माझ्या तोंडून आनंदाचे शब्द निघाले. आणि म्हणूनच मी* आशा बाळगीन. २७ कारण तू मला* कबरेत* सोडून देणार नाहीस आणि तुझ्या एकनिष्ठ सेवकाचं शरीर तू कुजू देणार नाहीस.+ २८ तू मला जीवनाचे मार्ग दाखवले आहेत. आणि तुझ्या सहवासात* तू माझं मन खूप आनंदाने भरून टाकशील.’+
२९ माणसांनो, भावांनो, कुलप्रमुख असलेल्या दावीदबद्दल मी तुमच्याशी अगदी मोकळेपणाने बोलू शकतो. त्याचा मृत्यू झाला आणि त्याला पुरण्यात आलं+ आणि त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. ३० कारण तो एक संदेष्टा होता आणि देवाने शपथ घेऊन त्याला असं वचन दिलं होतं, की त्याच्या संततीपैकी एक जण त्याच्या राजासनावर बसेल.+ ३१ ख्रिस्त मेलेल्यांतून उठेल हे त्याला आधीच माहीत होतं. आणि देव ख्रिस्ताला कबरेत* राहू देणार नाही आणि त्याचं शरीर कुजणार नाही, असंही तो म्हणाला.+ ३२ या येशूला देवाने मेलेल्यांतून उठवलं आणि आपण सगळे या गोष्टीचे साक्षीदार आहोत.+ ३३ तो स्वर्गात जाऊन देवाच्या उजव्या हाताला बसल्यामुळे+ आणि पित्याकडून वचन दिलेली पवित्र शक्ती त्याला मिळाल्यामुळे,+ त्याने ही पवित्र शक्ती ओतली आहे. तुम्ही तिचं कार्य पाहताय आणि ऐकताय. ३४ कारण दावीद स्वर्गात गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, ‘यहोवा* माझ्या प्रभूला म्हणाला: ३५ “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखालचं आसन करेपर्यंत माझ्या उजव्या हाताला बस.” ’+ ३६ म्हणून इस्राएलच्या संपूर्ण घराण्याने हे पक्कं ओळखावं, की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर ठार मारलं+ त्याला देवाने प्रभू आणि ख्रिस्त केलंय.”+
३७ पेत्रचे हे शब्द त्यांच्या मनाला भिडले. ते पेत्रला आणि इतर प्रेषितांना म्हणाले: “माणसांनो, भावांनो, आता आम्ही काय करू?” ३८ पेत्र त्यांना म्हणाला: “पश्चात्ताप करा+ आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या पापांच्या क्षमेसाठी+ येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या,+ म्हणजे तुम्हाला पवित्र शक्तीचं मोफत दान मिळेल. ३९ कारण हे वचन+ तुम्हाला आणि तुमच्या मुलांना देण्यात आलंय. तसंच ज्यांना आपला देव, यहोवा* स्वतःकडे बोलावून घेईल अशा दूरदूरच्या ठिकाणी असलेल्या सगळ्या लोकांनाही देण्यात आलंय.”+ ४० पेत्रने अशा बऱ्याच गोष्टी सांगून, त्यांना अगदी पूर्णपणे साक्ष दिली आणि वारंवार अशी कळकळीची विनंती केली, की “या बिघडलेल्या पिढीपासून स्वतःला वाचवा.”+ ४१ तेव्हा ज्यांनी त्याचा संदेश आनंदाने स्वीकारला त्यांचा बाप्तिस्मा झाला+ आणि त्या दिवशी जवळजवळ ३,००० जणांची* त्यांच्यात भर पडली.+ ४२ त्यानंतर ते सतत प्रेषितांकडून शिकत राहिले. तसंच, ते एकत्र जमून सोबत जेवायचे+ आणि प्रार्थनाही करायचे.+
४३ प्रेषित बरीच चिन्हं आणि चमत्कार करू लागले+ आणि हे पाहून सगळ्या लोकांच्या* मनात भीती बसली. ४४ ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला असे सगळे जण सोबत असायचे आणि सगळ्या गोष्टी आपसात वाटून घ्यायचे. ४५ आणि ते आपल्या मालकीच्या वस्तू आणि जमिनी विकून,+ त्यातून मिळणारे पैसे ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे बांधवांमध्ये वाटायचे.+ ४६ ते एकदिलाने दररोज मंदिरात उपस्थित राहायचे आणि वेगवेगळ्या घरांत जेवायचे. तसंच, खूप आनंदाने आणि प्रामाणिक मनाने एकमेकांसोबत अन्न वाटून घ्यायचे. ४७ ते देवाची स्तुती करायचे आणि सगळ्या लोकांचंही त्यांच्याबद्दल चांगलं मत होतं. यासोबतच, यहोवा* तारण होत असलेल्यांची दररोज त्यांच्यात भर घालत राहिला.+