थेस्सलनीकाकर यांना पहिलं पत्र
५ आता बांधवांनो, काळ आणि समय* यांबद्दल आम्ही तुम्हाला काही लिहायची गरज नाही. २ कारण, रात्रीच्या वेळी जसा चोर येतो, अगदी तसाच यहोवाचा* दिवस+ येत आहे, हे तुम्हाला स्वतःला चांगलं माहीत आहे.+ ३ “शांती आहे, सुरक्षा आहे!” असं जेव्हा ते म्हणत असतील तेव्हा एकाएकी, गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे प्रसूतिवेदना सुरू होतात, त्याप्रमाणे त्यांच्यावर अचानक नाश येईल,+ आणि त्यातून त्यांची सुटका होणारच नाही. ४ पण बांधवांनो, तुम्ही मात्र अंधारात नाही. त्यामुळे, दिवसाच्या प्रकाशाने चोराला गाठावं तसा तो दिवस तुम्हाला गाठणार नाही. ५ कारण तुम्ही सर्व प्रकाशाची आणि दिवसाची मुलं आहात.+ आपण रात्रीचे किंवा अंधाराचेही नाही.+
६ म्हणून, आपण इतरांप्रमाणे झोपेत राहू नये,+ तर जागं+ आणि सावध राहावं.+ ७ कारण झोप घेणारे, रात्री झोपतात आणि दारू पिऊन झिंगणारे रात्री झिंगतात.+ ८ पण आपण जे दिवसाचे आहोत, ते आपण सावध राहून विश्वासाचं आणि प्रेमाचं कवच* आणि तारणाच्या आशेचा टोप घालू या.+ ९ कारण देवाने आपल्याला क्रोधासाठी नाही, तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तारण मिळवण्यासाठी निवडलं आहे.+ १० ख्रिस्त आपल्याकरता मरण पावला.+ हे यासाठी, की आपण जागे असलो किंवा झोपलो,* तरी आपण त्याच्यासोबत राहावं.+ ११ त्यामुळे, आता जसं तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन* देत आहात आणि एकमेकांना बळकट करत आहात, तसंच पुढेही करत राहा.+
१२ आता बांधवांनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो, की तुमच्यामध्ये जे मेहनत घेतात आणि प्रभूच्या सेवेत जे तुमचं नेतृत्व करतात आणि तुम्हाला शिकवतात त्यांचा आदर करा. १३ आणि ते करत असलेल्या कामाबद्दल प्रेमळपणे त्यांची आणखी जास्त कदर करा.+ एकमेकांबरोबर शांतीने राहा.+ १४ त्याच वेळी बांधवांनो, आम्ही तुम्हाला अशीही विनंती करतो, की जे शिस्तीने वागत नाहीत त्यांना ताकीद द्या,*+ निराश झालेल्यांचं सांत्वन करा, दुर्बळांना आधार द्या आणि सर्वांशी सहनशीलतेने वागा.+ १५ कोणीही वाइटाची फेड वाइटाने करणार नाही, याची काळजी घ्या.+ आणि नेहमी एकमेकांचं आणि एकंदरीत सगळ्यांचंच भलं करायचा प्रयत्न करत राहा.+
१६ नेहमी आनंदी राहा.+ १७ प्रार्थना करत राहा.+ १८ सर्व गोष्टींसाठी आभार माना.+ तुमच्यासाठी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. १९ पवित्र शक्तीची* आग विझवू नका.+ २० भविष्यवाण्यांना तुच्छ लेखू नका.+ २१ सगळ्या गोष्टींची खातरी करा;+ जे चांगलं आहे त्याला धरून राहा. २२ सगळ्या प्रकारच्या दुष्टपणापासून दूर राहा.+
२३ शांतीच्या देवाने स्वतः तुम्हाला पूर्णपणे पवित्र करावं. आणि बांधवांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळी तुमची मनोवृत्ती,* जीव* आणि शरीर सर्व बाबतींत निर्दोष राखलं जावं.+ २४ तुम्हाला बोलावणारा विश्वासू असून तो नक्कीच असं करेल.
२५ बांधवांनो, आमच्यासाठी प्रार्थना करत राहा.+
२६ सर्व बांधवांना भेटताना बंधुप्रेमाचं चुंबन घ्या.
२७ मी तुम्हाला प्रभूच्या नावाने आग्रह करतो, की हे पत्र सर्व बांधवांना वाचून दाखवा.+
२८ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुमच्यावर असो.