इब्री लोकांना पत्र
५ कारण लोकांमधून घेतलेल्या प्रत्येक महायाजकाला त्यांच्या वतीने देवाच्या सेवेसाठी नियुक्त केलं जातं,+ म्हणजे त्याने पापांसाठी अर्पणं आणि बलिदानं द्यावीत.+ २ अज्ञानामुळे चुका करणाऱ्यांशी* तो सहानुभूतीने* व्यवहार करू शकतो. कारण त्याला स्वतःलाही आपल्या दुर्बलतेला तोंड द्यावं लागतं.* ३ आणि त्यामुळे लोकांच्या पापांसाठी जशी तो अर्पणं देतो, तशीच स्वतःच्या पापांसाठीही त्याला द्यावी लागतात.+
४ कोणताही माणूस स्वतःहून हा सन्मान घेत नाही, तर अहरोनप्रमाणे देवाने बोलावल्यावरच त्याला तो मिळतो.+ ५ त्याच प्रकारे, ख्रिस्तानेही महायाजक बनून स्वतःचा गौरव केला नाही,+ तर, “तू माझा मुलगा आहेस; आज मी तुझा पिता बनलो आहे,”+ असं ज्याने त्याला म्हटलं त्याने त्याला गौरवलं. ६ जसं की, आणखी एका ठिकाणी तो असंही म्हणतो, “तू मलकीसदेकसारखा याजक आहेस आणि तू सर्वकाळासाठी याजक राहशील.”+
७ पृथ्वीवर असताना ख्रिस्ताने, त्याला मरणापासून वाचवायला समर्थ असलेल्या देवाला, आक्रोश करून आणि अश्रू गाळून याचना आणि विनंत्या केल्या;+ आणि त्याने देवाची भीती बाळगल्यामुळे त्याच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या. ८ देवाचा मुलगा असूनही, त्याला सोसाव्या लागलेल्या गोष्टींमधून तो आज्ञाधारकपणा शिकला.+ ९ आणि त्याला परिपूर्ण करण्यात आल्यावर,+ त्याच्या आज्ञांचं पालन करणाऱ्या सगळ्यांचं सर्वकाळासाठी तारण करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली.+ १० कारण देवाने त्याला मलकीसदेकसारखा याजक होण्यासाठी नेमलं आहे.+
११ त्याच्याबद्दल आमच्याजवळ सांगण्यासारखं बरंच काही आहे, पण तुम्हाला ते समजावून सांगणं कठीण आहे. कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. १२ खरंतर, आतापर्यंत* तुम्ही शिक्षक व्हायला हवं होतं. पण, तुम्हाला पुन्हा एकदा देवाच्या पवित्र वचनांच्या प्राथमिक गोष्टी*+ कोणीतरी समजावून सांगायची गरज आहे; आणि तुम्ही पुन्हा एकदा, जड अन्नाची नाही, तर दुधाची गरज असलेल्यांसारखे झाला आहात. १३ जो दूधच पीत राहतो त्याला देवाच्या नीतिमान वचनाचं ज्ञान मिळत नाही, कारण तो लहान मूल आहे.+ १४ पण जड अन्न हे प्रौढ लोकांसाठी आहे. म्हणजे अशा लोकांसाठी ज्यांनी आपल्या समजशक्तीचा उपयोग करून तिला चांगलं आणि वाईट यांतला फरक ओळखण्यासाठी प्रशिक्षित केलं आहे.