करिंथकर यांना पहिलं पत्र
१० बांधवांनो, तुम्हाला हे माहीत असावं असं मला वाटतं, की आपले सगळे पूर्वज ढगाखाली होते+ आणि ते सगळे समुद्रातून पलीकडे गेले.+ २ ढग आणि समुद्र यांच्याद्वारे त्या सगळ्यांचा मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला. ३ त्या सगळ्यांनी देवाने दिलेलं एकाच प्रकारचं अन्न खाल्लं+ ४ आणि ते सगळे देवाने दिलेलं एकाच प्रकारचं पाणी प्यायले.+ कारण देवाने दिलेल्या खडकातून ते पाणी प्यायचे. त्यांच्यामागे चालणारा तो खडक म्हणजे ख्रिस्त.*+ ५ पण त्यांच्यापैकी बऱ्याच जणांबद्दल देव संतुष्ट नव्हता; म्हणून, ओसाड रानात त्यांचा नाश करण्यात आला.+
६ त्यांनी जसा वाईट गोष्टींचा लोभ धरला, तसा आपण धरू नये म्हणून या गोष्टी आपल्यासाठी एक इशारा आहेत.+ ७ त्यांच्यातले काही जण मूर्तिपूजक होते, तसं तुम्ही असू नये. त्यांच्याबद्दल असं लिहिलं आहे: “लोक खायला-प्यायला बसले आणि त्यानंतर उठून मौजमजा करू लागले.”+ ८ तसंच, त्यांच्याप्रमाणे आपण अनैतिक लैंगिक कृत्यं* करू नये. त्यांच्यातल्या काहींनी ती केल्यामुळे, एकाच दिवशी २३,००० लोकांचा मृत्यू झाला.+ ९ आपण यहोवाची* परीक्षाही पाहू नये.+ त्यांच्यापैकी काहींनी त्याची परीक्षा पाहिली आणि सापांच्या दंशामुळे त्यांचा नाश झाला.+ १० तसंच त्यांच्यासारखी आपण कुरकुर करू नये. त्यांच्यापैकी काहींनी कुरकुर केली+ आणि विनाश करणाऱ्याने त्यांचा नाश केला.+ ११ त्यांच्या बाबतीत घडलेल्या या गोष्टी आपल्यासाठी उदाहरण आहेत. आपण जगाच्या व्यवस्थांच्या शेवटी पोहोचलो आहोत आणि आपल्याला इशारा देण्यासाठी या गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत.+
१२ म्हणून, आपण उभे आहोत असं ज्याला वाटतं त्याने पडू नये म्हणून सांभाळावं.+ १३ माणसांवर सहसा येते त्यापेक्षा वेगळी परीक्षा तुमच्यावर आली नाही.+ पण देव विश्वासू आहे आणि तुम्ही सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा तो तुमच्यावर येऊ देणार नाही.+ तर, परीक्षेच्या वेळी तिच्यातून बाहेर पडायचा मार्गही तो तयार करेल, म्हणजे तुम्हाला ती सहन करता येईल.+
१४ त्यामुळे, माझ्या प्रिय बांधवांनो, मूर्तिपूजेपासून दूर पळा.+ १५ तुम्ही समंजस माणसं आहात असं समजून मी तुमच्याशी बोलतो. मी जे बोलतो ते बरोबर आहे की नाही हे तुम्हीच ठरवा. १६ ज्या आशीर्वादाच्या प्याल्यावर आपण आशीर्वाद मागतो, त्यातून प्यायल्यामुळे आपण ख्रिस्ताच्या रक्ताचे भागीदार होत नाही का?+ आणि जी भाकर आपण मोडतो, ती खाल्ल्यामुळे आपण ख्रिस्ताच्या शरीराचे भागीदार होत नाही का?+ १७ भाकर एक असल्यामुळे, आपण पुष्कळ असूनही एकच शरीर आहोत,+ कारण आपण सगळे ती एकच भाकर खातो.
१८ शारीरिक रितीने इस्राएली असलेल्या लोकांचा विचार करा: जे अर्पण केलेल्या बलिदानांतून खातात, ते वेदीचे भागीदार नाहीत का?+ १९ तर मग, मूर्तीला किंवा तिला दाखवलेल्या नैवेद्याला काही महत्त्व आहे, असं मला म्हणायचं आहे का? २० नाही. उलट, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, की विदेशी लोक जी बलिदानं देतात ती देवाला नाही, तर दुष्ट स्वर्गदूतांना* देतात;+ आणि तुम्ही दुष्ट स्वर्गदूतांसोबत भागीदार व्हावं अशी माझी इच्छा नाही.+ २१ यहोवाच्या* प्याल्यातून प्यायचं आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या प्याल्यातूनही प्यायचं, असं तुम्ही करू शकत नाही. “यहोवाच्या* मेजावर” जेवायचं+ आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या मेजावरही जेवायचं, असं तुम्ही करू शकत नाही. २२ ‘आपण यहोवाला* ईर्ष्येला पेटवायचा प्रयत्न करत आहोत का’?+ आपण त्याच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहोत का?
२३ सगळ्या गोष्टी कायदेशीर असल्या,* तरी सगळ्याच गोष्टी फायद्याच्या असतात असं नाही. सगळ्या गोष्टी कायदेशीर असल्या, तरी सगळ्या गोष्टी प्रोत्साहन देणाऱ्या नाहीत.+ २४ प्रत्येकाने स्वतःचा नाही, तर नेहमी दुसऱ्याचा फायदा पाहावा.+
२५ मांसाच्या बाजारात जे काही विकलं जातं ते खा आणि आपल्या विवेकामुळे कोणतीही चौकशी करू नका. २६ कारण “पृथ्वी आणि तिच्यावर असलेलं सर्वकाही यहोवाचं* आहे.”+ २७ विश्वासात नसलेल्या एखाद्याने तुम्हाला आमंत्रण दिलं आणि तुम्हाला जायची इच्छा असेल, तर तुमच्यापुढे जे काही वाढलं जाईल ते खा आणि आपल्या विवेकामुळे कोणतीही चौकशी करू नका. २८ पण, जर कोणी तुम्हाला असं सांगितलं, की “हे बलिदान म्हणून अर्पण केलं होतं,” तर ज्याने हे सांगितलं त्याच्यामुळे आणि विवेकामुळे ते खाऊ नका.+ २९ मी तुमच्या विवेकाबद्दल नाही, तर त्या दुसऱ्या व्यक्तीच्या विवेकाबद्दल बोलत आहे. कारण माझ्या स्वातंत्र्याचा न्याय दुसऱ्याच्या विवेकाने का करावा?+ ३० मी जर उपकार मानून खात असेन, तर ज्यासाठी मी उपकार मानले त्यावरून माझी टीका का केली जावी?+
३१ म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सगळं देवाच्या गौरवासाठी करा.+ ३२ यहुद्यांसाठी, ग्रीक लोकांसाठी आणि देवाच्या मंडळीसाठी अडखळण बनू नका.+ ३३ तर, बऱ्याच जणांचं तारण व्हावं* म्हणून जसा मी स्वतःचा नाही तर बऱ्याच जणांचा फायदा पाहतो+ आणि सगळ्या बाबतींत सर्वांना संतुष्ट करायचा प्रयत्न करतो,+ तसं तुम्हीही करा.