वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr25 जुलै पृ. १-११
  • “जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका” संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका” संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ—२०२५
  • उपशिर्षक
  • ७-१३ जुलै
  • १४-२० जुलै
  • २१-२७ जुलै
  • २८ जुलै–३ ऑगस्ट
  • ४-१० ऑगस्ट
  • ११-१७ ऑगस्ट
  • १८-२४ ऑगस्ट
  • २५-३१ ऑगस्ट
जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ—२०२५
mwbr25 जुलै पृ. १-११

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ

© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

७-१३ जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं २१

आनंदी विवाहासाठी सुज्ञ सल्ले

टेहळणी बुरूज०३ १०/१५ ४ ¶५

सुज्ञ निर्णय कसे घेता येतील?

घाईघाईत घेतलेले निर्णय मूर्खपणाचे ठरू शकतात. नीतिसूत्रे २१:५ असा इशारा देते: “उद्योग्याचे विचार समृद्धि करणारे असतात. जो कोणी उतावळी करितो तो दारिद्र्‌याकडे धाव घेतो.” उदाहरणार्थ, प्रेमवेडे असलेल्या किशोरवयीनांनी लग्नाची घाई करण्याआधी नीट विचार करून निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर, १८ व्या शतकाच्या सुरवातीचे इंग्रज नाटककार विल्यम काँग्रीव यांच्या शब्दांचा प्रत्यय त्यांना येईल; त्यांनी म्हटले होते: “घाईघाईत लग्न करून सवडीने पस्तावा करावा लागेल.”

टेहळणी बुरूज०५ ३/१ १४ ¶१९

आजच्या जगातही यशस्वी वैवाहिक जीवन शक्य आहे

१९ विचारांची देवाणघेवाण करताना कधीकधी असे प्रसंगही येऊ शकतात, की जेव्हा पती किंवा पत्नीला क्षमा मागावी लागते. हे नेहमीच सोपे नसते. स्वतःची चूक कबूल करण्यासाठी नम्रतेची गरज आहे. पण असे केल्यास वैवाहिक जीवन किती सुखी होऊ शकते! प्रामाणिकपणे क्षमा मागितल्याने भविष्यात वारंवार वादविवाद होण्याचे कारण उरत नाही आणि मनापासून क्षमा करणे व समस्येवर कायमचा तोडगा काढणे शक्य होते. पौलाने म्हटले: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरूद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा; पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.”—कलस्सैकर ३:१३, १४.

टेहळणी बुरूज०६ १०/१ १५ ¶१३

“तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस”

१३ समजा, विवाह सोबती एकमेकांना ज्याप्रकारे वागवतात त्यामुळे विवाह तणावाखाली असेल तर काय? यावर उपाय शोधण्याकरता प्रयत्न करावे लागतील. जसे की, पतीपत्नी एकमेकांना टोचून बोलू लागले असतील व हळूहळू आता त्यांची ती बोलण्याची पद्धतच बनली असेल. (नीतिसूत्रे १२:१८) मागच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे या अशाप्रकारच्या बोलण्यामुळे विवाहावर हानीकारक परिणाम घडू शकतात. एका बायबल नीतिसूत्रात असे म्हटले आहे: “भांडखोर बायकोजवळ राहून संताप करून घ्यावा त्यापेक्षा अरण्यवास पुरवला.” (नीतिसूत्रे २१:१९) तुम्ही पत्नी असाल तर स्वतःला विचारा: ‘माझ्या वागण्यामुळे तर माझ्या नवऱ्‍याला माझ्याबरोबर वेळ घालवायला आवडत नसेल?’ बायबल पतींना असा सल्ला देते: “पतींनो, तुम्ही आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका.” (कलस्सैकर ३:१९) तुम्ही पती असाल तर स्वतःला विचारा: ‘माझी वागणूक इतकी भावनारहित आहे की ज्यामुळे माझ्या पत्नीला इतरत्र जाऊन सांत्वन मिळवावे लागते?’ अर्थात ही, लैंगिक अनैतिकतेसाठी एक सबब नाही. तरीपण, विवाहात अशी शोकांतिका घडू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या समस्या एकमेकांसमोर मनमोकळेपणाने बोलून दाखवल्या पाहिजेत.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज०५ १/१५ १७ ¶९

देवाच्या राज्याविषयीचे पूर्वसंकेत वास्तवात उतरतात

९ येशू हा आता शिंगरावर बसलेला साधा मनुष्य नसून एक सामर्थ्यशाली राजा आहे. बायबलमध्ये त्याला लढाईचे प्रतीक असलेल्या घोड्यावर बसलेला असे चित्रित केले आहे. (नीतिसूत्रे २१:३१) प्रकटीकरण ६:२ म्हणते: “एक पांढरा घोडा, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुगूट देण्यात आला; तो विजय मिळवीत मिळवीत आणखी विजयावर विजय मिळविण्यास निघून गेला.” शिवाय, येशूच्या संदर्भात स्तोत्रकर्ता दावीद याने लिहिले: “परमेश्‍वर तुझे बलवेत्र सीयोनेतून पुढे नेईल; तो म्हणतो, तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.”—स्तोत्र ११०:२.

१४-२० जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं २२

मुलांना वाढवण्यासाठी सुज्ञ सल्ले

टेहळणी बुरूज२०.१० २७ ¶७

तुमची मुलं मोठी झाल्यावर यहोवाची सेवा करतील का?

७ तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्ही जर आता बाळाचा विचार करत असाल, तर स्वतःला असं विचारा: ‘यहोवावर आणि त्याच्या वचनावर आपलं प्रेम आहे का? आपण नम्र आहोत का? एका अनमोल जिवाची आपण चांगली काळजी घेऊ असा भरवसा यहोवाला आपल्याबद्दल आहे का?’ (स्तो. १२७:३, ४) आणि तुम्हाला जर मुलं असतील तर तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘मेहनत करणं किती महत्त्वाचं आहे, हे मी माझ्या मुलांना शिकवतो का?’ (उप. ३:१२, १३) ‘सैतानाच्या जगातल्या शारीरिक आणि नैतिक धोक्यांपासून मी माझ्या मुलांचं होता होईल तितकं संरक्षण करतो का?’ (नीति. २२:३) हे खरं आहे, की तुम्ही तुमच्या मुलांचं सगळ्याच समस्यांपासून संरक्षण करू शकत नाही. तसं करणं शक्यही नाही. पण जीवनात येणाऱ्‍या समस्यांचा सामना करण्यासाठी तुम्ही त्यांना तयार करू शकता. त्यासाठी बायबल कशी मदत करतं हे त्यांना प्रेमळपणे शिकवत राहा. (नीतिसूत्रे २:१-६ वाचा.) उदाहरणार्थ, तुमच्या कुटुंबातला एखादा सदस्य यहोवाला सोडून देतो, तेव्हा यहोवाला एकनिष्ठ राहणं का महत्त्वाचं आहे हे तुमच्या मुलांना बायबलमधून शिकवा. (स्तो. ३१:२३) किंवा जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्या दुःखाचा सामना करण्यासाठी आणि आपलं मन शांत ठेवण्यासाठी बायबल आपल्याला कशी मदत करू शकतं, हे आपल्या मुलांना दाखवा.—२ करिंथ. १:३, ४; २ तीम. ३:१६.

टेहळणी बुरूज१९.१२ २६ ¶१७-१९

आईवडिलांनो, मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा!

१७ मुलांना लहानपणापासूनच प्रशिक्षण द्या. आईवडील जितक्या लवकर आपल्या मुलांना प्रशिक्षण देतील तितकं मुलांसाठी ते फायद्याचं ठरेल. (नीति. २२:६) तीमथ्यचंच उदाहरण घ्या! मोठं झाल्यावर तो प्रेषित पौलसोबत प्रचारासाठी ठिकठिकाणी गेला. त्याची आई युनीके आणि आजी लोईस यांनी त्याला “बालपणापासून” प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली होती.—२ तीम. १:५; ३:१५.

१८ कोट-दि-वार इथे राहणारे जीनक्लॉड आणि त्यांच्या पत्नीला सहा मुलं आहेत. सर्वांना त्यांनी यहोवावर प्रेम करायला आणि त्याची सेवा करायला शिकवलं. या जोडप्याला कशामुळे यश मिळालं? त्यांनी युनीके आणि लोईस यांच्या उदाहरणाचं अनुकरण केलं. ते म्हणतात: “आमच्या मुलांच्या जन्माच्या काही काळानंतरच, म्हणजे त्यांच्या बालपणापासूनच आम्ही देवाच्या वचनातल्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवू लागलो.”—अनु. ६:६, ७.

१९ यहोवाचं वचन तुमच्या मुलांच्या मनावर ‘बिंबवण्याचा’ काय अर्थ होतो? “बिंबव” या शब्दाचा अर्थ ‘एखादी गोष्ट पुन्हापुन्हा सांगून किंवा शिकवून मनात ठसवणे’ असा होतो. असं करण्यासाठी आईवडिलांनी आपल्या लहान मुलांना नियमितपणे वेळ देणं गरजेचं आहे. कधीकधी मुलांना एकच गोष्ट अनेक वेळा सांगावी लागते आणि यामुळे आईवडील कदाचित निराश होतील. पण या गोष्टीला त्यांनी एक संधी म्हणून पाहायला हवं; एक अशी संधी ज्यामुळे ते मुलांना देवाचं वचन समजवण्यासाठी आणि जीवनात लागू करण्यासाठी मदत करू शकतील.

टेहळणी बुरूज०७ ९/१ २३-२४ ¶७, ९

पालकांनो आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा

७ पौलाने लिहिले की “प्रीति . . . दयाळू आहे.” (१ करिंथकर १३:४, NW) जे पालक खरोखर दयाळू असतात ते आपल्या मुलांना सातत्याने शिक्षा देतात. असे करताना ते यहोवाचे अनुकरण करत असतात. पौलाने लिहिले: “ज्यावर परमेश्‍वर प्रीति करितो, त्याला तो शिक्षा करतो.” पण बायबलमध्ये शिक्षा देण्याचा अर्थ केवळ शासन करणे असा होत नाही. तर मुलांना शिकवण्याचा व प्रशिक्षण देण्याचाही त्यात समावेश आहे. अशाप्रकारच्या शिक्षेचा उद्देश काय असतो? पौल सांगतो, “ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व व शांतिकारक फळ देते.” (इब्री लोकांस १२:६, ११) मुलांना देवाच्या इच्छेनुसार दयाळुपणे शिकवण्याद्वारे आईवडील त्यांना शांतीप्रिय व सात्त्विक व्यक्‍ती बनण्याची संधी देत असतात. मुलांनी “परमेश्‍वराचे शिक्षण” स्वीकारल्यास त्यांना बुद्धी, ज्ञान व सुज्ञता प्राप्त होते. हे गुण सोन्यारुप्यापेक्षाही मौल्यवान आहेत.—नीतिसूत्रे ३:११-१८.

९ मुलांना दयाळू व प्रेमळ पद्धतीने वळण लावण्यात कशाचा समावेश आहे? मुलांकडून आपण नेमकी काय अपेक्षा करतो याविषयी आईवडिलांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. उदाहरणार्थ, अगदी बालपणापासून ख्रिस्ती आईवडिलांच्या मुलांना बायबलमधील मूलभूत तत्त्वांविषयी तसेच खऱ्‍या उपासनेच्या निरनिराळ्या कार्यांत सहभाग घेण्याविषयी शिकवले जाते. (निर्गम २०:१२-१७; मत्तय २२:३७-४०; २८:१९; इब्री लोकांस १०:२४, २५) या गोष्टींचे पालन करणे आपल्या इच्छेवर अवलंबून नाही, तर ते अनिवार्य आहे हे मुलांना माहीत असले पाहिजे.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज२१.०८ २२ ¶११

यहोवासाठी तुम्ही जे काही करू शकता त्यातून आनंद मिळवा

११ दुसऱ्‍या दासाप्रमाणे, आपल्याला जे काही काम दिलं जातं, ते पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. आपण प्रचारकार्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं पाहिजे आणि मंडळीची कामं मनापासून केली पाहिजेत. (प्रे. कार्यं १८:५; इब्री १०:२४, २५) त्यासाठी सभांची चांगली तयारी करा. त्यामुळे इतरांना प्रोत्साहन मिळेल अशी उत्तरं तुम्हाला देता येतील. सभांमध्ये जे काही भाग दिले जातात ते महत्त्वाचे समजून पूर्ण करा. मंडळीत तुम्हाला एखादं काम सोपवलं गेलं, तर ते वेळेवर आणि चांगल्या प्रकारे करा. कुठल्याही कामाबद्दल असा विचार करू नका की ‘हे इतकं महत्त्वाचं नाही. त्यासाठी इतका वेळ द्यायची गरज नाहीए.’ आपल्या कामातली कौशल्यं वाढवत राहा. (नीति. २२:२९) तुम्ही यहोवाच्या सेवेत जितकी मेहनत घ्याल, तितकं त्याच्यासोबत तुमचं नातं घट्ट होईल आणि तितका जास्त तुम्हाला आनंद मिळेल. (गलती. ६:४) इतकंच नाही, तर तुम्हाला हवी असलेली जबाबदारी दुसऱ्‍या कुणाला मिळाली तरीसुद्धा तुम्हाला आनंद होईल.—रोम. १२:१५; गलती. ५:२६.

२१-२७ जुलै

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं २३

मद्यपानाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवण्यासाठी सुज्ञ सल्ले

टेहळणी बुरूज०४ १२/१ १९ ¶५-६

मद्यपानाविषयी माफक दृष्टिकोन बाळगा

५ कदाचित एखादी व्यक्‍ती मद्य पीत असेल, पण आपल्याला नशा चढली आहे हे लोकांच्या लक्षात येईल इतके न पिण्याची ती काळजी घेत असेल. हे योग्य आहे का? काही व्यक्‍तींमध्ये, मद्याचे बरेच प्याले प्यायल्यानंतरही नशा चढली आहे हे अजिबात दिसून येत नाही. पण ही सवय अनपायकारक आहे असा विचार करणे म्हणजे एकप्रकारे स्वतःलाच फसवण्यासारखे आहे. (यिर्मया १७:९) हळूहळू, वाढत वाढत, त्या व्यक्‍तीचे मद्यावर अवलंबित्व निर्माण होऊ शकते आणि शेवटी ती “मद्यपानासक्‍त” बनते. (तीत २:३) मद्यासक्‍त बनण्याच्या प्रक्रियेविषयी लेखिका कॅरलाइन नॅप म्हणतात: “ही एक संथ, हळुवार, बेमालूमपणे घडणारी प्रक्रिया आहे.” अतिमद्यपान खरोखर किती घातक पाश आहे!

६ येशूने दिलेला इशाराही लक्षात घ्या: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल; कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्‍या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल.” (लूक २१:३४, ३५) एक व्यक्‍ती नशा चढेपर्यंत मद्य पीत नसली तरीसुद्धा शारीरिकरित्या, तसेच आध्यात्मिकरित्या तिला गुंगी व आळस येऊ शकतो. विचार करा, ही व्यक्‍ती अशा अवस्थेत असताना यहोवाचा दिवस अकस्मात आला तर?

टेहळणी बुरूज२३.१२ १४ ¶४

मद्य आणि देवाचा दृष्टिकोन

पण ख्रिश्‍चनांसाठी आपल्या प्रेमळ देवाने खूप चांगला सल्ला दिला आहे. उदाहरणार्थ, अतिप्रमाणात दारू पिल्यामुळे काय वाईट परिणाम होतात याबद्दल त्याने आपल्याला सावध केलंय. नीतिवचनं २३:२९-३५ मध्ये दारूच्या नशेत धुंद असलेल्या माणसाचं वर्णन केलंय आणि दारू पिल्यामुळे काय वाईट परिणाम होतात हेसुद्धा त्यात सांगितलंय. युरोपमधल्या एका मंडळीत वडील म्हणून सेवा करणारा डॅनिएल नावाचा एक भाऊ सत्यात येण्याआधी त्याचं जीवन कसं होतं ते सांगतो. तो म्हणतो, “मी खूप जास्त प्यायचो आणि त्यामुळे मी बरेच चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे मला खूप वाईट परिणामही भोगावे लागले. ते आठवून मला आजपण खूप त्रास होतो.”

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज०४ ११/१ ३१ ¶२

वाचकांचे प्रश्‍न

उदाहरणार्थ, लठ्ठपणा हे खादाडपणाचे एक चिन्ह असू शकते; परंतु असे नेहमीच नसते. एखादी व्यक्‍ती अमुक एखाद्या आजारपणामुळे लठ्ठ असू शकते. आनुवंशिक कारणांमुळे देखील एखादी व्यक्‍ती लठ्ठ असेल. आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे, की लठ्ठपणा शारीरिक अवस्था आहे परंतु खादाडपणा मानसिक प्रवृत्ती आहे. लठ्ठपणाचा अर्थ, “शरीरात प्रमाणापेक्षा अधिक चरबी साठल्यामुळे झालेली अवस्था” असा होतो तर खादाडपणाचा अर्थ, “हावऱ्‍यासारखे किंवा अधाशासारखे खाणे” असा होतो. तेव्हा, एखादी व्यक्‍ती तिच्या शरीराच्या आकारामुळे खादाड ठरत नाही तर अन्‍नाबाबत तिच्या मनोवृत्तीमुळे ठरते. एखादी व्यक्‍ती सर्वसामान्य आकाराची किंवा कदाचित अगदी सडपातळ असेल परंतु ती खादाड असेल. शिवाय, शरीराचे आदर्श वजन किंवा आकार यांविषयीचे मत, एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी वेगळे असू शकते.

२८ जुलै–३ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं २४

कठीण परिस्थितीसाठी स्वतःला तयार करा

इन्साइट-२ ६१० ¶८

छळ

छळाचा धीराने सामना करणाऱ्‍यांना जे प्रतिफळ मिळणार आहे त्याची ख्रिस्ती वाट पाहतात. या प्रतिफळाबद्दल येशूने म्हटलं: “नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झालाय ते सुखी आहेत, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे.” (मत्त ५:१०) पुनरुत्थानाच्या आणि ती आशा देणाऱ्‍या देवाच्या ज्ञानामुळे ख्रिश्‍चनांना हिंमत मिळते. तसंच, त्यांना विरोधकांकडून जीवे मारायची धमकी मिळते, तेव्हाही त्यांना देवाला एकनिष्ठ राहायचं बळ मिळतं. येशूच्या मृत्यूमुळे ज्या गोष्टी साध्य होऊ शकतात त्यावर विश्‍वास असल्यामुळे अशा क्रूर मृत्यूच्या भीतीतून ते मुक्‍त होतात. (इब्री २:१४, १५) जर विरोधाचा सामना करत असताना एका ख्रिस्ती व्यक्‍तीला आपला विश्‍वास टिकवून ठेवायचा असेल, तर त्याच्यामध्ये योग्य मनोवृत्ती असणं गरजेचं आहे. बायबल म्हणतं: “ख्रिस्त येशूमध्ये असलेली ही मनोवृत्ती नेहमी आपल्यामध्ये असू द्या. . . . मरण सोसण्याइतपत, हो, वधस्तंभावरचं मरण सोसण्याइतपत तो आज्ञाधारक झाला.” (फिली २:५-८) “कारण, जो आनंद [येशूसमोर] होता त्यासाठी त्याने लज्जेची पर्वा न करता वधस्तंभ सोसला.”—इब्री १२:२; २कर १२:१०; २थेस १:४; १पेत्र २:२१-२३ सुद्धा पाहा.

टेहळणी बुरूज०९ १२/१५ १८ ¶१२-१३

कठीण परिस्थितीतही आनंद टिकवून ठेवा

१२ नीतिसूत्रे २४:१० मध्ये असे म्हटले आहे: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्‍ति अल्प होय.” आणखी एका नीतिसूत्रात असे म्हटले आहे: “मनांतील खेदाने हृदय भंग पावते.” (नीति. १५:१३) आपल्या समस्यांमुळे काही ख्रिस्ती इतके खचून जातात की ते वैयक्‍तिक बायबल वाचन व मनन करण्याचे सोडून देतात. त्यांच्या प्रार्थनाही अगदी यांत्रिक बनतात व ते बांधवांपासून दूरदूर राहू लागतात. निश्‍चितच, दीर्घ काळापर्यंत निराशावस्थेत राहणे घातक ठरू शकते.—नीति. १८:१, १४.

१३ दुसरीकडे पाहता, आशावादी दृष्टिकोन बाळगल्याने जीवनात आनंद व समाधान देणाऱ्‍या इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आपल्याला शक्य होईल. दाविदाने असे लिहिले: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे.” (स्तो. ४०:८) जीवनात समस्या येतात तेव्हा आपल्या उपासनेचा नित्यक्रम सोडून देण्याचा आपण विचारही करू नये. वास्तविक पाहता, निराशेवर मात करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्याला आनंद देणाऱ्‍या कार्यात स्वतःला झोकून देणे. बायबलचे नियमित वाचन केल्याने व त्यावर मनन केल्याने आपल्याला आनंद व समाधान लाभेल असे यहोवा म्हणतो. (स्तो. १:१, २; याको. १:२५) पवित्र शास्त्रवचनांतून तसेच ख्रिस्ती सभांमधून आपल्याला वाचायला व ऐकायला मिळणाऱ्‍या ‘मनोरम वचनांमुळे’ आपल्या मनाला उभारी मिळेल व आपल्याला सुखसमाधान लाभेल.—नीति. १२:२५; १६:२४, पं.र.भा.

टेहळणी बुरूज२०.१२ १५

वाचकांचे प्रश्‍न

नीतिवचनं २४:१६ असं म्हणतं: “नीतिमान सात वेळा जरी पडला, तरी तो पुन्हा उठेल.” इथे अशा व्यक्‍तीबद्दल म्हटलं आहे का जी वारंवार पाप करते आणि जिला देव नंतर माफ करतो?

नाही. या वचनात वारंवार पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल सांगितलेलं नाही; तर अशा व्यक्‍तीबद्दल सांगितलं आहे जी वारंवार संकटांचा सामना करूनही सावरते. त्या अर्थाने, ती व्यक्‍ती खाली पडूनसुद्धा पुन्हा उठते.

तर या सगळ्यावरून दिसून येतं, की नीतिवचनं २४:१६ हे वचन पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल बोलत नाही. तर अशा व्यक्‍तीबद्दल बोलतं जिला जीवनात मोठमोठ्या संकटांचा सामना करावा लागतो; तिला कदाचित वारंवारही त्यांचा सामना करावा लागू शकतो. या दुष्ट जगात एका नीतिमान व्यक्‍तीला आरोग्याच्या किंवा इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. किंवा आपल्या विश्‍वासासाठी तिला कदाचित सरकाराकडून छळाचाही सामना करावा लागू शकतो. पण ती हा भरवसा ठेवू शकते, की देव तिला सांभाळेल आणि टिकून राहण्यासाठी मदत करेल. आपण स्वतः बऱ्‍याचदा हे पाहिलं आहे, की देवाच्या लोकांवर कितीही संकटं आली तरी ते त्यात टिकून राहिले आहेत. कारण, “पडत असलेल्या सर्वांना यहोवा सावरतो; तो वाकलेल्या सर्वांना उभं करतो.”—स्तो. ४१:१-३; १४५:१४-१९.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज०९ १०/१५ १२

वाचकांचे प्रश्‍न

बायबलच्या काळात, एखाद्या मनुष्याला आपले ‘घर बांधायचे’ किंवा लग्न करून स्वतःचा संसार थाटायचा असल्यास त्याने स्वतःला हा प्रश्‍न विचारणे जरुरीचे होते: ‘पत्नीची व भविष्यात मुले झाली तर या सगळ्यांची जबाबदारी पेलण्याची माझी तयारी आहे का?’ लग्न करण्याआधी त्याला आपल्या शेतातली कामे करायची होती अर्थात उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला काम करायचे होते. म्हणूनच, टुडेज इंग्लिश व्हर्शन अगदी सरळ व स्पष्टपणे या वचनाचा अनुवाद असा करते: “तुझी शेते कापणीसाठी तयार आहेत व तुझा उदरनिर्वाह होईल याची खातरी झाल्याशिवाय तू आपले घर बांधू नको आणि संसार थाटू नको.” हे तत्त्व आजही लागू होते का?

होय. लग्नाचा विचार करणाऱ्‍या मनुष्याने लग्नासोबत येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या पेलण्यासाठी आधी पुरेशी तयारी केली पाहिजे. धडधाकट असल्यास त्याने काम करणे जरुरीचे आहे. अर्थात, कुटुंबाचे पालनपोषण करण्यामध्ये केवळ भौतिक गरजा तृप्त करणे इतकेच समाविष्ट नाही. तर जो मनुष्य आपल्या कुटुंबाच्या भौतिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजा तृप्त करत नाही तो विश्‍वास न ठेवणाऱ्‍या मनुष्यापेक्षा वाईट आहे असे बायबल म्हणते. (१ तीम. ५:८) तेव्हा, लग्न करून स्वतःचा संसार थाटण्याचा विचार करणाऱ्‍या मनुष्याने प्रथम स्वतःला विचारले पाहिजे: ‘माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यास मी खरोखर तयार आहे का? कुटुंबात आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत पुढाकार घेण्यास मी तयार आहे का? माझ्या पत्नी व मुलांसह नियमितपणे बायबल अभ्यास करण्याची जबाबदारी मी पूर्ण करू शकेन का?’ या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत असे बायबल सांगते.—अनु. ६:६-८; इफिस. ६:४.

तर मग, लग्नाचा विचार करणाऱ्‍या तरुणाने नीतिसूत्रे २४:२७ मध्ये दिलेल्या तत्त्वाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे, लग्नाचा विचार करणाऱ्‍या तरुणीनेसुद्धा, एक पत्नी व आई होण्याची जबाबदारी पेलण्यास मी तयार आहे का हा प्रश्‍न स्वतःला विचारणे जरुरीचे आहे. तसेच, लग्नानंतर मुलांचा विचार करणाऱ्‍या तरुण दांपत्यानेही वरील प्रश्‍नांचा विचार करावा. (लूक १४:२८) बायबलमध्ये दिलेल्या या सल्ल्याचे पालन केल्यास देवाचे लोक अनेक दुःखद परिणाम टाळू शकतात व समृद्ध कौटुंबिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतात.

४-१० ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं २५

बोलण्याच्या बाबतीत सुज्ञ सल्ले

टेहळणी बुरूज१५ १२/१५ १९ ¶६-७

आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा इतरांच्या भल्यासाठी वापर करा

६ बोलण्यासाठी आपण योग्य वेळ निवडणं किती महत्त्वाचं आहे, याबद्दल नीतिसूत्रे २५:११ असं म्हणतं, “रुपेरी करंड्यांत सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.” विचार करा सोन्याची फळं किती सुंदर दिसतील. आणि तीच फळं जर एका चांदीच्या भांड्यात ठेवली, तर त्यांचं सौंदर्य आणखी जास्त वाढणार नाही का? त्याचप्रमाणे, इतरांना सांगता येण्यासारखी चांगली गोष्ट आपल्याजवळ असेल. पण, त्यासाठी आपण जर योग्य वेळ निवडली तर त्या व्यक्‍तीला त्याचा आणखी जास्त फायदा होईल. आपण हे कसं करू शकतो?

७ आपलं बोलणं कदाचित योग्य असेल. पण, त्यासाठी आपण जर चुकीची वेळ निवडली तर आपल्या बोलण्याचा काहीच फायदा होणार नाही. (नीतिसूत्रे १५:२३ वाचा.) उदाहरणार्थ, मार्च २०११ रोजी एका मोठ्या भूकंपामुळे आणि त्सुनामीमुळे पूर्व जपानच्या अनेक शहरांची मोठी नासधूस झाली. त्यात १५,००० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. तसंच, अनेक यहोवाच्या साक्षीदारांनीही आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना आणि आपल्या मित्रांना गमवलं. असं असलं तरी, बायबलचा वापर करून त्यांच्यासारख्याच स्थितीत असलेल्या लोकांना त्यांना मदत करायची होती. पण, त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली की तिथले बहुतेक लोक बौद्ध आहेत आणि त्यांना बायबलविषयी खूप कमी माहिती आहे. त्यामुळे, पुनरुत्थानाविषयी सांगण्याऐवजी त्यांनी चांगल्या लोकांसोबत अशा भयंकर गोष्टी का घडतात याविषयी बोलून त्यांचं सांत्वन केलं.

टेहळणी बुरूज१५ १२/१५ २१ ¶१५-१६

आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा इतरांच्या भल्यासाठी वापर करा

१५ आपण इतरांशी काय बोलतो हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच आपण कसं बोलतो हेदेखील खूप महत्त्वाचं आहे. लोकांना येशूचं बोलणं ऐकायला आवडायचं कारण तो नेहमी प्रेमळपणे आणि दयाळूपणे बोलायचा. (लूक ४:२२) आपण जर इतरांशी दयाळूपणे बोललो तर ते आपलं ऐकून घ्यायला तयार असतील. (नीति. २५:१५) आपण जर इतरांचा आदर करून त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याशी दयाळूपणे बोलणं आपल्याला शक्य होईल. येशूनंही तेच केलं. उदाहरणार्थ, जेव्हा लोकांचा मोठा लोकसमुदाय आपलं ऐकण्यासाठी धडपडत आहे हे त्यानं पाहिलं, तेव्हा त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी आणि त्यांना शिकवण्यासाठी तो प्रवृत्त झाला. (मार्क ६:३४) काही वेळा लोकांनी येशूचा अपमानही केला. पण त्या वेळीही येशू त्यांच्याशी कठोरपणे वागला नाही.—१ पेत्र २:२३.

१६ दयाळूपणे आणि विचार करून बोलणं आपल्याला खासकरून तेव्हा कठीण जातं, जेव्हा आपण आपल्या मित्रांशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोलत असतो. आपण विचार करू की मी त्यांना जवळून ओळखतो तर मग मी काहीही बोललं तरी ते खपवून घेतील. पण, हे लक्षात घ्या की येशू आपल्या मित्रांशी बोलताना कधीही कठोरतेनं बोलला नाही. उदाहरणार्थ जेव्हा त्याचे मित्र, ‘आपल्यापैकी मोठा कोण’ या विषयावर वादविवाद करत होते, तेव्हा त्यानं अगदी दयाळूपणे त्यांना समजावलं. एका लहान मुलाचं उदाहरण देऊन त्यांची विचारसरणी सुधारण्याचा प्रयत्न त्यानं केला. (मार्क ९:३३-३७) मंडळीचे वडीलसुद्धा इतरांना सल्ला देताना येशूच्या उदाहरणाचं पालन करून त्यांच्याशी दयाळूपणे बोलतात.—गलती. ६:१.

टेहळणी बुरूज९५ ४/१ १७ ¶८

प्रीती व सत्कर्मे करण्यासाठी उत्तेजन द्या—कशाप्रकारे?

८ देवाची सेवा करताना, उदाहरणाद्वारे आपण सर्वजण एकमेकांना उत्तेजन देऊ शकतो. येशूने निश्‍चितच आपल्या श्रोत्यांना उत्तेजन दिले. त्याला ख्रिस्ती सेवेचे कार्य आवडत होते आणि त्याने सेवेची स्तुती केली. त्याच्यासाठी ते अन्‍नासारखे होते असे त्याने म्हटले. (योहान ४:३४; रोमकर ११:३३) असा उत्साह संसर्गजन्य असू शकतो. अशाचप्रकारे तुम्ही सेवेमधील तुमचा आनंद इतरांसमोर प्रकट होऊ देता का? काळजीपूर्वकपणे बढाईखोर आवाज टाळून मंडळीत इतरांसोबत तुमच्या चांगल्या अनुभवांची सहभागिता करा. तुमच्यासोबत कार्य करण्यासाठी इतरांना तुम्ही आमंत्रित करता, तेव्हा आपला महान निर्माणकर्ता, यहोवाबद्दल इतरांशी बोलण्यात अस्सल आनंद घेण्यास त्यांना मदत करु शकता का हे पाहा.—नीतीसूत्रे २५:२५.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज०० ८/१५ २३ ¶३

तुम्ही मतभेद कसे हाताळता?

आणखी एक म्हण अशी आहे: “ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गावकुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे.” (नीतिसूत्रे २५:२८) आपण वाईट गोष्टींचा विचार करावा, वाईट कामे करावीत, स्वतःला आणि इतरांना दुःख द्यावे असे कोणालाच वाटत नाही. आपण स्वतःवर ताबा ठेवला नाही, रागराग केला तर आपल्याकडून ही चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येशूने डोंगरावरील आपल्या प्रवचनात म्हटले, की आपण नेहमी आपल्या मनोवृत्तीचे परीक्षण केले पाहिजे. कारण त्यावरच इतरांबरोबरचे आपले मतभेद आपण कसे सोडवतो हे अवलंबून असते. (मत्तय ७:३-५) इतरांची टीका करण्याऐवजी आपण विविध दृष्टिकोन असलेल्या, विविध पार्श्‍वभूमीच्या लोकांबरोबर मैत्री करून ती कायम कशी टिकवू शकतो याचा नेहमी विचार करू शकतो.

११-१७ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं २६

‘मूर्खापासून’ दूर राहा

इन्साइट-२ ७२९ ¶६

पाऊस

ऋतू. वचन दिलेल्या देशात मुख्यतः दोन ऋतू होते; उन्हाळा आणि हिवाळा. उन्हाळा कोरडा ऋतू असायचा आणि हिवाळ्यात पाऊस पडायचा. (स्तो ३२:४; गीत २:११, तळटीप सोबत तुलना करा.) एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यांपासून ते ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यांपर्यंत खूप कमी पाऊस पडायचा. हा कापणीचा काळ असायचा आणि या काळात क्वचितच पाऊस पडायचा. त्यामुळे या काळात पाऊस पडलेला लोकांना आवडायचा नाही.

टेहळणी बुरूज८७-E १०/१ १९ ¶१२

शिस्त लावल्यामुळे चांगलं फळ मिळतं

१२ काही लोकांना कडक शिस्त लावावी लागू शकते. हीच गोष्ट आपल्याला नीतिवचनं २६:३ मध्ये पाहायला मिळते. तिथे म्हटलंय: “घोड्यासाठी चाबूक आणि गाढवासाठी लगाम, तशीच मूर्खांच्या पाठीसाठी काठी असते.” कधीकधी यहोवाने इस्राएली लोकांवर संकटं येऊ दिली. कारण ती त्यांनीच स्वतःवर ओढावून घेतली होती. बायबलमध्ये म्हटलंय: “त्यांनी देवाच्या शब्दाविरुद्ध बंड केलं होतं; त्यांनी सर्वोच्च देवाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केलं होतं. तेव्हा त्याने त्यांचं हृदय संकटाने नम्र केलं; ते अडखळले पण त्यांना सावरणारं कोणी नव्हतं. ते आपल्या संकटात यहोवाला मदतीसाठी हाक मारत राहिले; त्यांच्या दयनीय स्थितीतून त्याने त्यांना सोडवलं.” (स्तोत्र १०७:११-१३) पण काही मूर्ख लोक इतके हट्टी बनतात की त्यांना कितीही शिस्त लावली तरी ते स्वतःमध्ये बदल करत नाहीत. एका नीतिवचनात म्हटलंय: “बरंच ताडन दिल्यावरही जो माणूस आपला हट्ट सोडत नाही, तो अचानक असा चिरडला जाईल, की पुन्हा कधीच उठणार नाही.”—नीतिवचनं २९:१.

इन्साइट-२ १९१ ¶४

लंगडा, लंगडेपणा

नीतिवचनांमध्ये वापर. बुद्धिमान राजा शलमोनने असं म्हटलं: “जो मूर्खावर कामं सोपवतो, तो स्वतःचे पाय कापून टाकणाऱ्‍या [यामुळे तो लंगडा बनतो] आणि स्वतःचं नुकसान करणाऱ्‍या माणसासारखा असतो.” एखाद्या ‘मूर्खाला’ कामावर ठेवणारा व्यक्‍ती स्वतःचंच नुकसान करून घेतो. त्याने ठरवलेलं काम कधीच पूर्ण होणार नाही आणि त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील.—नीत २६:६.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-१ ८४६

मूर्ख

नीतिवचनं २६:४ मध्ये म्हटलंय: “मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नकोस.” याचा अर्थ, आपण जर एखाद्या मूर्खाशी त्याच्याप्रमाणे वाद घातला, तर आपणही मूर्ख ठरू. कारण तसं केल्यामुळे असं वाटेल की आपल्याला त्याचे चुकीचे विचार पटत आहेत. पण नीतिवचनं २६:५ मध्ये म्हटलंय: “मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणेच उत्तर दे.” हा विरोधाभास नाही. उलट याचा अर्थ असा होतो की आपण त्याला अशा प्रकारे उत्तर दिलं पाहिजे, ज्यावरून त्याचा वाद मूर्खपणाचा आहे हे दिसून येईल. तसंच, आपण त्याला हेसुद्धा दाखवून दिलं पाहिजे की तो जसा विचार करतोय आणि जे बोलतोय त्यात खूप फरक आहे.

१८-२४ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं २७

खऱ्‍या मित्रांमुळे आपल्याला कसा फायदा होतो?

टेहळणी बुरूज१९.०९ ५ ¶१२

यहोवा आपल्या नम्र सेवकांची कदर करतो

१२ नम्र व्यक्‍ती दिलेल्या सल्ल्याची कदर करते. उदाहरणार्थ, विचार करा की तुम्ही ख्रिस्ती सभेमध्ये आहात. भाऊबहीणींशी बोलल्यानंतर त्यांच्यापैकी एक जण तुम्हाला जरा बाजूला घेऊन म्हणतो की तुमच्या दातात काहीतरी अडकलं आहे. यात काही शंका नाही की हे ऐकून तुम्हाला नक्कीच अवघडल्यासारखं वाटेल. पण त्या व्यक्‍तीने तुम्हाला त्याबद्दल सांगितलं म्हणून तुम्ही तिचे आभार मानणार नाही का? खरंतर, तुम्हाला असंही वाटेल की आधीच कुणीतरी याबद्दल सांगितलं असतं तर बरं झालं असतं! त्याचप्रमाणे, आपल्याला गरज असताना जर एका भावाने किंवा बहिणीने धैर्य दाखवून सल्ला दिला, तर त्या वेळी आपण नम्रपणे त्यांच्याबद्दल कदर बाळगली पाहिजे. कारण आपण त्या व्यक्‍तीला आपला शत्रू नाही तर मित्र समजतो.—नीतिसूत्रे २७:५, ६ वाचा; गलती. ४:१६.

इन्साइट-२ ४९१ ¶३

शेजारी

नीतिवचनं २७:१० मध्ये म्हटलंय: “संकटाच्या काळात तुझ्या मित्राला किंवा तुझ्या वडिलांच्या मित्राला सोडून देऊ नकोस आणि संकटाच्या दिवशी आपल्या भावाच्या घरी पाऊल ठेवू नकोस; दूर राहणाऱ्‍या भावापेक्षा जवळ असलेला शेजारी बरा!” या नीतिवचनावरून कळतं की दूर राहणाऱ्‍या नातेवाइकापेक्षा आपल्या जवळ राहणाऱ्‍या मित्राकडून आपल्याला लवकर मदत मिळू शकते. कारण कदाचित दूर राहणाऱ्‍या नातेवाइकांना आपल्याला मदत करता येणार नाही. म्हणून आपण अशा मित्रांना मोलाचं समजलं पाहिजे आणि त्यांच्याकडून मदत घेतली पाहिजे.

टेहळणी बुरूज२३.०९ १० ¶७

तरुणांनो, तुम्हाला कशा प्रकारचं आयुष्य जगायला आवडेल?

७ यहोआशने घेतलेल्या चुकीच्या निर्णयातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे, आपण नेहमी चांगले मित्र निवडले पाहिजेत; असे मित्र ज्यांचं यहोवावर प्रेम आहे आणि ज्यांना यहोवाला आनंदित करायचं आहे. कारण त्यांचा आपल्यावर चांगला प्रभाव पडतो. पण चांगले मित्र निवडण्यासाठी मित्र तुमच्याच वयाचे असावेत असं काही नाही. लक्षात घ्या, यहोआश हासुद्धा यहोयादापेक्षा खूप लहान होता. मित्रांच्या बाबतीत तुम्ही स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकता: ‘माझे मित्र यहोवावरचा माझा विश्‍वास मजबूत करायला मला मदत करतात का? ते मला देवाच्या स्तरांनुसार चालायचं प्रोत्साहन देतात का? ते नेहमी यहोवाबद्दल किंवा सत्याबद्दल बोलतात का? त्यांच्या मनातही देवाच्या स्तरांबद्दल आदर आहे का? मला ज्या गोष्टी ऐकाव्याश्‍या वाटतात अशाच गोष्टी ते माझ्याशी बोलतात का, की जेव्हा मी चुकतो तेव्हा मला सुधारण्याचाही प्रयत्न करतात?’ (नीति. २७:५, ६, १७) स्पष्ट सांगायचं झालं, जर तुमच्या मित्रांचं यहोवावर प्रेम नसेल तर असे मित्र नसलेलेच बरे. पण जर तुमच्या मित्रांचं यहोवावर प्रेम असेल तर त्यांना कधीही सोडू नका. कारण त्यांच्यामुळे तुमचं नक्कीच भलं होईल.—नीति. १३:२०.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज०६ १०/१ ६ ¶६

नीतिसूत्रे पुस्तकातील ठळक मुद्दे

२७:२१. इतरजण जेव्हा आपली प्रशंसा करतात तेव्हा आपले खरे व्यक्‍तिमत्त्व उजेडात येऊ शकते. जर इतरांची प्रशंसा आपल्याला यहोवाच्या अपार कृपेची जाणीव करून देत असेल, व त्याची सेवा करत राहण्याची प्रेरणा देत असेल तर यातून आपला नम्रपणा दिसून येतो. पण जर इतरांनी प्रशंसा केल्यामुळे आपण सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहोत असे आपल्याला वाटू लागले तर मग आपल्या व्यक्‍तिमत्त्वात नम्रतेचा गुण नाही हे दिसून येईल.

२५-३१ ऑगस्ट

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं २८

दुष्ट माणसातला आणि नीतिमान माणसातला फरक

टेहळणी बुरूज९३-E ५/१५ २६ ¶२

तुम्ही पूर्णपणे यहोवाच्या मागे चालत आहात?

“नीतिमान सिंहासारखे धैर्यवान असतात.” (नीतिवचनं २८:१) ते विश्‍वासाने चालतात, देवाच्या वचनावर भरवसा ठेवतात आणि कोणतंही संकट आलं तरी ते धैर्याने यहोवाची सेवा करत राहतात.

इन्साइट-२ ११३९ ¶३

समजशक्‍ती, समज

जे देवाकडे पाठ फिरवतात. देवाकडे पाठ फिरवणारा दुष्ट माणूस निर्णय घेताना देवाच्या तत्त्वांकडे दुर्लक्ष करतो. (ईयो ३४:२७) तो करत असलेल्या गोष्टी त्याला चुकीच्या वाटत नाही आणि तो आपली समजशक्‍ती गमावतो. (स्तो ३६:१-४) तो देवाची उपासना करण्याचा दावा करतो, पण तो देवाच्या विचारांऐवजी मानवी विचारांप्रमाणे चालतो. (यश २९:१३, १४) तो आपल्या चुकीच्या वागण्याला ‘खेळाचं’ नाव देतो. (नीत १०:२३) तसंच खोटे तर्क करून तो दुष्ट माणूस स्वतःच मूर्ख ठरतो. त्याला वाटतं की देव अदृष्य असल्यामुळे तो त्याच्या चुकीच्या गोष्टी पाहणार नाही. (स्तो ९४:४-१०; यश २९:१५, १६; यिर्म १०:२१) अशा प्रकारे वागून तो जणू म्हणतो की “यहोवा अस्तित्वात नाही.” (स्तो १४:१-३) यामुळे त्याला योग्य-अयोग्य समजत नाही आणि चांगले निर्णय घेता येत नाहीत.—नीत २८:५.

इन्साइट-१ १२११ ¶४

खरेपणा

नीतिमान माणूस गरीब असला तरी त्याचं मोल श्रीमंत असलेल्या दुष्ट माणसापेक्षा जास्त असतं. त्याचा यहोवावर भरवसा असल्यामुळे त्याला विश्‍वासू राहायला मदत होते. (स्तो २५:२१) खरेपणाने चालणाऱ्‍यांसाठी यहोवा “ढाल” आणि ‘बुरूज’ बनण्याचं वचन देतो. (नीत २:६-८; १०:२९; स्तो ४१:१२) खरेपणाने चालणारा माणूस नेहमी यहोवाची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्याच्या जीवनात स्थिरता येते. (स्तो २६:१-३; नीत ११:५; २८:१८) निर्दोष लोकांना दुष्ट लोकांमुळे दुःख भोगावं लागू शकतं. पण यहोवा सर्वकाही पाहतो आणि भविष्यात तो अशा लोकांना शांतीचं जीवन द्यायचं वचन देतो. (ईयो ९:२०-२२; स्तो ३७:१८, १९, ३७; ८४:११; नीत २८:१०) खरेपणाने जगण्यात ईयोबने खूप चांगलं उदाहरण मांडलं. त्यावरून आपल्याला कळतं की संपत्तीपेक्षा यहोवाला विश्‍वासू राहणं जास्त मोलाचं आहे.—नीत १९:१; २८:६.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज०१ १२/१ ११ ¶३

तुम्ही आध्यात्मिक हार्ट अटॅक टाळू शकता

फाजील आत्मविश्‍वास. हार्ट अटॅक आलेल्या बऱ्‍याच जणांना अटॅक येण्यापूर्वी आपल्या आरोग्याविषयी पूर्ण खात्री होती. तपासणी करण्याविषयी किंवा वैद्यकीय चाचण्या घेण्याविषयी उल्लेख केल्यास कदाचित ते टाळाटाळ करत असतील किंवा याची काही गरज नाही असे म्हणून हा विषय हसण्यावारी नेत असतील. त्याचप्रकारे काहीजणांना असा ग्रह असतो की ते बऱ्‍याच काळापासून ख्रिस्ती असल्यामुळे त्यांना काही होऊ शकत नाही. कदाचित प्रत्यक्ष धोका संभवेपर्यंत ते स्वतःची आध्यात्मिक तपासणी करण्याविषयी किंवा आत्मपरीक्षण करण्याविषयी टाळाटाळ करत असतील. अशाप्रकारे फाजील आत्मविश्‍वास बाळगण्यासंबंधी प्रेषित पौलाने दिलेला उत्तम सल्ला नेहमी ध्यानात ठेवणे आवश्‍यक आहे: “आपण उभे आहो असे ज्याला वाटते, त्याने पडू नये म्हणून संभाळावे.” आपण मुळात अपरिपूर्ण आहोत हे कबूल करून वेळोवेळी स्वतःचे आध्यात्मिक परीक्षण करण्यातच सुज्ञता आहे.—१ करिंथकर १०:१२; नीतिसूत्रे २८:१४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा