पेत्र याचं दुसरं पत्र
२ पण ज्याप्रमाणे देवाच्या लोकांमध्ये खोटे संदेष्टे उठले होते, त्याचप्रमाणे तुमच्यामध्येही खोटे शिक्षक असतील.+ ते चोरून-लपून विनाशकारी पंथ निर्माण करतील आणि ज्याने त्यांना विकत घेतलं त्या आपल्या मालकालाही ते नाकारतील.+ अशा रितीने ते एकाएकी स्वतःवर विनाश ओढवून घेतील. २ शिवाय, पुष्कळ जण त्यांच्या निर्लज्ज वर्तनाचं* अनुकरण करतील+ आणि त्यांच्यामुळे सत्याच्या मार्गाची बदनामी होईल.+ ३ तसंच, ते कपटी शब्द बोलून लोभीपणाने तुमचा फायदा घेतील. पण, देवाने फार पूर्वीच ठरवलेल्या त्यांच्या न्यायदंडाला+ उशीर होणार नाही आणि त्यांचा विनाश नक्की येईल.+
४ कारण, ज्या स्वर्गदूतांनी पाप केलं त्यांचीसुद्धा देवाने गय केली नाही,+ तर त्याने त्यांना तार्तारसमध्ये* फेकून दिलं.+ त्यांचा न्याय करण्यासाठी त्याने त्यांना घोर अंधारात साखळ्यांनी बांधून* ठेवलं आहे.+ ५ प्राचीन काळातल्या जगाचीही त्याने गय केली नाही,+ तर त्याने अधार्मिक लोकांच्या जगावर जलप्रलय आणला.+ पण, त्याने नीतिमत्त्वाचा प्रचारक असलेल्या नोहाला+ इतर सात जणांसोबत सुखरूप ठेवलं.+ ६ तसंच, सदोम आणि गमोरा या शहरांना भस्म करून त्याने त्यांना शिक्षा दिली;+ आणि अशा रितीने, अधार्मिक लोकांचं पुढे काय होईल, याचा एक नमुना दाखवला.+ ७ पण, नीतिमान लोटला मात्र त्याने वाचवलं.+ तो दुष्ट* लोकांच्या निर्लज्ज वर्तनामुळे* खूप दुःखी होता. ८ कारण त्यांच्यामध्ये राहत असताना त्यांची दुष्ट कृत्यं पाहून आणि ऐकून त्या नीतिमान माणसाच्या जिवाला* दररोज यातना व्हायच्या. ९ तर मग, देवाची भक्ती करत जीवन जगणाऱ्या लोकांची परीक्षेतून सुटका कशी करावी+ आणि अनीतिमान लोकांना, न्यायाच्या दिवशी नाश करण्यासाठी कसं राखून ठेवावं हे यहोवाला* माहीत आहे.+ १० खासकरून अशांना जे इतरांची शरीरं भ्रष्ट करायचा प्रयत्न करतात+ आणि अधिकाराला तुच्छ लेखतात.+
उद्धटपणे आणि मनाला वाटेल तसं वागणाऱ्या या लोकांना, देवाने सन्मानित केलेल्यांबद्दल अपमानास्पद शब्द बोलायची मुळीच भीती वाटत नाही. ११ याउलट, माणसांपेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्तिशाली असलेले स्वर्गदूतसुद्धा, यहोवाबद्दल* असलेल्या आदरामुळे त्यांची निंदा करून त्यांच्यावर दोषारोप लावत नाहीत.+ १२ पण, ज्यांचा जन्म* फक्त पकडलं जाऊन नाश होण्यासाठी झालेला असतो, अशा उपजत बुद्धीप्रमाणे वागणाऱ्या निर्बुद्ध प्राण्यांसारखे हे लोक आहेत. कारण, त्यांना माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल ते अपमानास्पद रितीने बोलतात.+ ते विनाशाच्या मार्गावर चालत असल्यामुळे स्वतःवर नाश ओढवून घेतील. १३ स्वतःच्याच नुकसानकारक आचरणामुळे त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतील.
दिवसाही चैन करण्यात त्यांना मौज वाटते.+ ते डाग आणि कलंक असून तुमच्यासोबत मेजवान्या करताना आपल्या फसव्या शिकवणींनी इतरांची दिशाभूल करायला त्यांना आनंद होतो.+ १४ त्यांच्या नजरा व्यभिचाराने भरलेल्या आहेत+ आणि पाप करण्यापासून त्यांना स्वतःला आवरता येत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना भुरळ घालतात. त्यांच्या मनाला लोभीपणाची सवय झाली आहे. ते शापित आहेत. १५ सरळ मार्ग सोडून ते भरकटले आहेत. त्यांनी बौरचा मुलगा बलाम याच्या मार्गाचं अनुकरण केलं आहे.+ त्याला अपराधाची कमाई प्रिय होती.+ १६ पण, जे योग्य त्याच्या विरोधात वागल्यामुळे त्याचं ताडन करण्यात आलं.+ शेवटी, ओझं वाहणाऱ्या मुक्या जनावराने माणसाच्या आवाजात बोलल्यावर तो संदेष्टा आपल्या मूर्खपणाच्या मार्गावरून मागे फिरला.+
१७ ते कोरड्या झऱ्यांसारखे आणि जोरदार वादळाने वाहून जाणाऱ्या धुक्यासारखे आहेत; आणि त्यांच्यासाठी घोर अंधार राखून ठेवण्यात आला आहे.+ १८ ते मोठमोठ्या गोष्टी करतात, पण मुळात त्यांचं बोलणं पोकळ आहे. आणि जे नुकतेच वाईट कामं करणाऱ्यांमधून बाहेर आले आहेत, अशांच्या शारीरिक वासना चेतवून+ ते त्यांना निर्लज्ज वर्तनाने* मोहात पाडतात.+ १९ ते त्यांना स्वातंत्र्याचं आश्वासन तर देतात, पण ते स्वतःच भ्रष्टतेचे दास आहेत.+ कारण, जो कोणी एखाद्याच्या नियंत्रणाखाली येतो तो त्याचा दास बनतो.*+ २० खरंच, आपला प्रभू आणि तारणकर्ता येशू ख्रिस्त याच्याबद्दलचं अचूक ज्ञान घेण्याद्वारे, स्वतःला जगाच्या अशुद्धतेपासून दूर केल्यावर,+ जर ते पुन्हा त्याच गोष्टींमध्ये गुरफटले आणि त्यांच्या नियंत्रणाखाली आले, तर त्यांची शेवटची दशा पहिल्यापेक्षा वाईट होते.+ २१ नीतिमत्तेचा मार्ग माहीत असूनही, त्यांना मिळालेली पवित्र आज्ञा त्यांनी मोडली; यापेक्षा त्यांना तो मार्ग अचूकपणे समजलाच नसता तर जास्त बरं झालं असतं.+ २२ त्यांच्या बाबतीत ही म्हण अगदी खरी ठरली आहे: “कुत्रा आपल्या ओकारीकडे, तर धुतलेली डुकरीण परत चिखलात लोळायला जाते.”+