मत्तयने सांगितलेला संदेश
११ आपल्या १२ शिष्यांना सूचना दिल्यावर, येशू त्यांच्या शहरांत शिकवायला आणि राज्याची घोषणा करायला निघाला.+
२ जेव्हा ख्रिस्ताने केलेल्या सर्व गोष्टींबद्दल योहानने तुरुंगात ऐकलं,+ तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना त्याच्याकडे पाठवून+ ३ त्याला विचारलं: “जो येणार होता तो तूच आहेस का, की आम्ही दुसऱ्या कोणाची वाट पाहावी?”+ ४ तेव्हा येशूने त्यांना असं उत्तर दिलं: “तुम्ही जे काही ऐकताय आणि पाहताय ते जाऊन योहानला सांगा.+ ५ आंधळे पाहत आहेत,+ लंगडे चालत आहेत, कुष्ठरोगी+ शुद्ध केले जात आहेत, बहिऱ्यांना ऐकू येतंय, मेलेल्यांना जिवंत केलं जातंय आणि गोरगरिबांना आनंदाचा संदेश सांगितला जातोय.+ ६ ज्याला माझ्यात अडखळण्याचं कारण सापडत नाही* तो माणूस सुखी!”+
७ ते तिथून जात होते, तेव्हा येशू जमलेल्या लोकांशी योहानबद्दल बोलू लागला: “ओसाड रानात तुम्ही काय पाहायला गेला होता?+ वाऱ्याने हलणारी गवताची काडी?+ ८ मग काय पाहायला गेला होता? मऊ मखमली कपडे* घातलेला माणूस? असे कपडे घालणारे तर राजमहालात असतात. ९ मग, कशाला गेला होता तुम्ही? संदेष्ट्याला पाहायला? हो, मी तुम्हाला सांगतो, जो संदेष्ट्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे त्याला.+ १० हा तोच आहे ज्याच्याबद्दल असं लिहिलंय: ‘पाहा! मी माझ्या दूताला तुझ्यापुढे* पाठवतोय. तो तुझ्यापुढे जाऊन तुझ्यासाठी मार्ग तयार करेल.’+ ११ मी तुम्हाला खरं सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा देणारा योहान याच्यापेक्षा श्रेष्ठ, अजूनपर्यंत कोणी आलेला नाही. पण स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.+ १२ बाप्तिस्मा देणाऱ्या योहानच्या दिवसांपासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्याचं ध्येय गाठण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहेत आणि जे असे प्रयत्न करत आहेत ते त्याला मिळवतात.+ १३ कारण संदेष्ट्यांच्या आणि नियमशास्त्राच्या सगळ्या भविष्यवाण्या योहानच्या काळापर्यंत होत्या.+ १४ तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण ‘संदेष्ट्यांनी ज्याच्याबद्दल सांगितलं होतं तो एलीया’ हाच आहे.+ १५ ज्याला कान आहेत त्याने ऐकावं.
१६ या पिढीची तुलना मी कोणाशी करू?+ बाजारात बसलेल्या लहान मुलांसारखी ही पिढी आहे. ते आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात: १७ ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजवली, पण तुम्ही नाचला नाहीत. आम्ही मोठ्याने रडलो, पण तुम्ही छाती बडवून शोक केला नाही.’ १८ त्याचप्रमाणे, योहान खातपीत आला नाही, तरी लोक असं म्हणतात की ‘त्याच्यात दुष्ट स्वर्गदूत* आहे.’ १९ मनुष्याचा मुलगा खातपीत आला+ आणि तरी लोक म्हणतात, ‘पाहा! हा खादाड आणि दारुडा! जकातदारांचा आणि पापी लोकांचा मित्र!’+ पण, बुद्धी कार्यांनी* सिद्ध होते.”*+
२० मग, ज्या शहरांमध्ये त्याने सगळ्यात जास्त चमत्कार* केले होते, त्यांनी पश्चात्ताप न केल्यामुळे तो त्यांचा धिक्कार करत म्हणाला: २१ “हे खोराजिन! तुझा धिक्कार असो! हे बेथसैदा! तुझा धिक्कार असो! कारण तुमच्यामध्ये जी अद्भुत कार्यं घडली ती सोरमध्ये आणि सीदोनमध्ये घडली असती, तर त्यांनी केव्हाच गोणपाट घालून आणि राखेत बसून पश्चात्ताप केला असता.+ २२ मी तर तुम्हाला सांगतो न्यायाच्या दिवशी सोर आणि सीदोन यांना तुमच्यापेक्षा जास्त सोपं जाईल.+ २३ आणि हे कफर्णहूम!+ तुला काय स्वर्गापर्यंत उंच केलं जाईल? नाही, तू खाली कबरेत* जाशील.+ कारण तुझ्यामध्ये जी अद्भुत कार्यं घडली ती सदोममध्ये घडली असती, तर ते आजपर्यंत राहिलं असतं. २४ मी तर तुला सांगतो, न्यायाच्या दिवशी सदोम देशाला तुझ्यापेक्षा जास्त सोपं जाईल.”+
२५ त्या वेळी येशू म्हणाला: “हे पित्या, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, मी सर्वांसमोर तुझी स्तुती करतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून लपवून, लहान मुलांना प्रकट केल्या आहेत.+ २६ हो पित्या, कारण तुला हेच योग्य वाटलं.” २७ येशू असंही म्हणाला, “माझ्या पित्याने सर्व गोष्टी माझ्या स्वाधीन केल्या आहेत+ आणि पित्याशिवाय कोणीही मुलाला पूर्णपणे ओळखत नाही.+ तसंच, पित्यालाही कोणी पूर्णपणे ओळखत नाही, फक्त मुलगा त्याला ओळखतो. आणि ज्या कोणाला तो पित्याबद्दलचं ज्ञान प्रकट करू इच्छितो, तोच पित्याला ओळखतो.+ २८ कष्ट करणाऱ्या आणि ओझ्याने दबलेल्या सर्व लोकांनो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला तजेला देईन. २९ माझं जू* आपल्या खांद्यावर घ्या आणि माझ्याकडून शिका, म्हणजे तुमच्या जिवाला* विश्रांती मिळेल. कारण मी प्रेमळ* आणि नम्र आहे.+ ३० माझं जू वाहायला सोपं आणि माझं ओझं हलकं आहे.”