मत्तयने सांगितलेला संदेश
२६ येशूचं हे सगळं बोलणं संपल्यावर तो आपल्या शिष्यांना म्हणाला: २ “आजपासून दोन दिवसांनंतर वल्हांडणाचा सण आहे+ आणि मनुष्याच्या मुलाला वधस्तंभावर* मृत्युदंड देण्यासाठी पकडून दिलं जाईल+ हे तुम्हाला माहीत आहे.”
३ तेव्हा मुख्य याजक आणि वडीलजन, महायाजक कयफा याच्या घराच्या अंगणात जमले,+ ४ आणि त्यांनी धूर्तपणे* येशूला अटक करून ठार मारायचा कट रचला.+ ५ पण ते म्हणाले: “सणाच्या वेळी नको, नाहीतर लोक गोंधळ माजवतील.”
६ मग, येशू बेथानी इथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होता,+ ७ तेव्हा एक स्त्री मौल्यवान सुगंधी तेलाची बाटली* घेऊन त्याच्याजवळ आली आणि तो जेवत असताना ती त्याच्या डोक्यावर ते तेल ओतू लागली. ८ हे पाहून शिष्य संतापले आणि म्हणाले: “ही स्त्री तेल वाया का घालवत आहे? ९ हेच तेल विकलं असतं तर बरेच पैसे मिळाले असते आणि ते गरिबांना देता आले असते.” १० ते काय बोलत आहेत हे ओळखून येशू त्यांना म्हणाला: “या स्त्रीला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक चांगलं काम केलंय. ११ कारण गरीब तर नेहमीच तुमच्यासोबत असतील,+ पण मी नेहमी तुमच्यासोबत असणार नाही.+ १२ तिने माझ्या शरीराला सुगंधी तेल लावून माझ्या दफनविधीची तयारी केली आहे.+ १३ मी तुम्हाला खरं सांगतो, जगात जिथे जिथे आनंदाच्या संदेशाची घोषणा केली जाईल तिथे तिथे या स्त्रीची आठवण करून, तिने जे केलं तेही सांगितलं जाईल.”+
१४ मग त्या १२ शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत+ नावाचा एक जण मुख्य याजकांकडे गेला+ १५ आणि म्हणाला: “जर मी त्याला पकडून दिलं तर तुम्ही मला काय द्याल?”+ ते त्याला चांदीची ३० नाणी+ द्यायला तयार झाले. १६ तेव्हापासून तो त्याला पकडून देण्याची एखादी चांगली संधी शोधू लागला.
१७ बेखमीर भाकरींच्या सणाच्या+ पहिल्या दिवशी, शिष्य येशूजवळ येऊन म्हणाले: “आम्ही तुझ्यासाठी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी कुठे करू?”+ १८ तो म्हणाला: “शहरात अमुक अमुक माणसाकडे जाऊन म्हणा, की ‘गुरू म्हणतात: “माझ्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे; मी माझ्या शिष्यांसोबत तुझ्या घरी वल्हांडण साजरा करीन.”’” १९ तेव्हा येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी केलं आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.
२० संध्याकाळ झाली+ तेव्हा तो १२ शिष्यांसोबत मेजाभोवती जेवायला बसला.+ २१ ते जेवत असताना तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, तुमच्यापैकीच एक जण मला पकडून देईल.”+ २२ हे ऐकून त्यांना फार दुःख झालं आणि प्रत्येक जण त्याला म्हणू लागला: “प्रभू, तो मी तर नाही ना?” २३ तेव्हा त्याने उत्तर दिलं: “ज्याने माझ्यासोबत ताटात हात घातलाय, तोच माझा विश्वासघात करेल.+ २४ मनुष्याच्या मुलाबद्दल लिहिण्यात आल्याप्रमाणे तो तर जाणारच आहे, पण जो मनुष्याच्या मुलाचा विश्वासघात करून त्याला पकडून देईल,+ त्या माणसाची किती दुर्दशा होईल!+ तो जन्मालाच आला नसता तर बरं झालं असतं!”+ २५ तेव्हा यहूदा, जो काही वेळातच त्याला पकडून देणार होता, तो म्हणाला: “रब्बी,* तो मी तर नाही ना?” येशू त्याला म्हणाला: “तू स्वतःच बोललास.”
२६ नंतर, ते जेवत असताना येशूने भाकर घेतली आणि धन्यवाद देऊन ती मोडली.+ ती शिष्यांना देऊन तो म्हणाला: “ही भाकर घ्या आणि खा. ही माझ्या शरीराला सूचित करते.”+ २७ मग एक प्याला घेऊन त्याने देवाचे उपकार मानले आणि तो प्याला त्यांना देऊन तो म्हणाला: “तुम्ही सगळे यातून प्या,+ २८ कारण द्राक्षारसाचा हा प्याला माझ्या ‘कराराच्या+ रक्ताला’ सूचित करतो.+ ते पुष्कळ लोकांच्या+ पापांच्या क्षमेसाठी+ ओतलं जाणार आहे. २९ पण मी तुम्हाला सांगतो, की जोपर्यंत मी आपल्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस पीत नाही, तोपर्यंत मी पुन्हा कधी हा द्राक्षारस पिणार नाही.”+ ३० शेवटी, स्तुतिगीतं* गायल्यानंतर ते तिथून निघून जैतुनांच्या डोंगरावर गेले.+
३१ मग येशू त्यांना म्हणाला: “आज रात्री तुम्ही सगळे मला सोडून जाल,* कारण असं लिहिलंय: ‘मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची पांगापांग होईल.’+ ३२ पण मला उठवण्यात आल्यानंतर मी तुमच्यापुढे गालीलमध्ये जाईन.”+ ३३ पेत्र त्याला म्हणाला: “बाकीचे सगळे तुला सोडून गेले तरी मी तुला कधीही सोडून जाणार नाही!”*+ ३४ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “मी तुला खरं सांगतो, आज रात्री कोंबडा आरवण्याआधी तू तीन वेळा मला नाकारशील.”+ ३५ पेत्र त्याला म्हणाला: “मला तुझ्यासोबत मरावं लागलं तरी मी तुला मुळीच नाकारणार नाही.”+ इतर सगळ्या शिष्यांनीही तसंच म्हटलं.
३६ मग येशू त्यांच्यासोबत गेथशेमाने या ठिकाणी आला+ आणि तो शिष्यांना म्हणाला: “मी तिथे जाऊन प्रार्थना करेपर्यंत इथेच बसा.”+ ३७ त्याने पेत्रला आणि जब्दीच्या दोन मुलांना आपल्यासोबत घेतलं. मग तो खूप अस्वस्थ झाला आणि त्याचं मन दुःखाने व्याकूळ होऊ लागलं.+ ३८ तो त्यांना म्हणाला: “मी* फार दुःखी आहे, माझ्या मनाला मरणासारख्या यातना होत आहेत. तुम्ही इथेच थांबा आणि माझ्यासोबत जागे राहा.”+ ३९ मग तिथून जरासं पुढे जाऊन त्याने गुडघे टेकले आणि जमिनीपर्यंत वाकून तो अशी प्रार्थना करू लागला:+ “माझ्या पित्या, शक्य असेल तर हा प्याला+ माझ्यापासून काढून घे. तरी, माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”+
४० तो शिष्यांजवळ परत आला आणि त्यांना झोपलेलं पाहून तो पेत्रला म्हणाला: “तुम्ही माझ्यासोबत थोडा वेळसुद्धा जागू शकला नाहीत का?+ ४१ मोहात पडू नये म्हणून+ जागे राहा+ आणि प्रार्थना करत राहा.+ कारण मन तर उत्सुक* आहे, पण शरीर दुर्बळ आहे.”+ ४२ मग पुन्हा त्याने जाऊन अशी प्रार्थना केली: “माझ्या पित्या, जर हा प्याला मला प्यावाच लागणार असेल आणि तो माझ्यापासून काढून घेणं शक्य नसेल, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”+ ४३ मग त्याने पुन्हा येऊन त्यांना झोपलेलं पाहिलं, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. ४४ म्हणून त्यांना सोडून तो पुन्हा निघून गेला आणि त्याने तिसऱ्यांदा तशीच प्रार्थना केली. ४५ नंतर तो शिष्यांकडे परत येऊन त्यांना म्हणाला: “अशा वेळी तुम्ही झोपत आहात आणि विश्रांती घेत आहात! पाहा! मनुष्याच्या मुलाला विश्वासघाताने पापी लोकांच्या हाती धरून देण्याची वेळ जवळ आली आहे. ४६ उठा, आपण जाऊ या. पाहा! माझा विश्वासघात करणारा जवळ आलाय!” ४७ तो बोलत होता, इतक्यात यहूदा, जो १२ शिष्यांपैकी एक होता, तो आला आणि त्याच्यासोबत तलवारी आणि काठ्या घेतलेल्या लोकांचा मोठा जमाव होता. त्यांना मुख्य याजकांनी आणि वडीलजनांनी पाठवलं होतं.+
४८ त्याचा विश्वासघात करणाऱ्या यहूदाने त्यांना अशी खूण दिली होती, की “मी ज्याचं चुंबन घेईन, तोच येशू आहे. त्याला अटक करा.” ४९ मग थेट येशूजवळ जाऊन तो म्हणाला: “रब्बी, सलाम!” आणि त्याने प्रेमाने त्याचं चुंबन घेतलं. ५० पण येशू त्याला म्हणाला: “तू इथे काय करायला आला आहेस?”+ तेव्हा ते पुढे आले आणि त्यांनी येशूला पकडून त्याला अटक केली. ५१ पण तेवढ्यात, येशूसोबत असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढून महायाजकाच्या दासावर हल्ला केला आणि त्याचा कान कापून टाकला.+ ५२ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “आपली तलवार जागच्या जागी ठेव,+ कारण जे तलवार हातात घेतात त्यांचा तलवारीने नाश होईल.+ ५३ तुला काय वाटतं, मी या क्षणी माझ्या पित्याला, माझ्यासाठी स्वर्गदूतांच्या १२ फौजा+ पाठवण्याची विनंती करू शकत नाही का? ५४ पण तसं झालं, तर या गोष्टी घडणं आवश्यक आहे असं शास्त्रात जे लिहिलंय, ते कसं पूर्ण होईल?” ५५ मग येशू लोकांच्या जमावाला म्हणाला: “मी काय चोर आहे, की तुम्ही मला तलवारी आणि काठ्या घेऊन पकडायला आलात? दररोज मी मंदिरात बसून शिकवत होतो,+ तेव्हा तुम्ही मला पकडलं नाही.+ ५६ पण, संदेष्ट्यांनी जे लिहिलंय* ते पूर्ण व्हावं म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत.”+ तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.+
५७ ज्यांनी येशूला पकडलं होतं त्यांनी त्याला महायाजक कयफा+ याच्याकडे नेलं. तिथे शास्त्री आणि वडीलजन एकत्र जमले होते.+ ५८ पण पेत्र बरंच अंतर ठेवून त्याच्या मागेमागे चालत गेला. महायाजकाच्या अंगणापर्यंत आल्यावर तो आत गेला आणि पुढे काय होतं हे पाहायला घराच्या नोकरचाकरांसोबत बसला.+
५९ आता मुख्य याजक आणि संपूर्ण न्यायसभा,* येशूला मृत्युदंड देता यावा म्हणून त्याच्याविरुद्ध खोटा पुरावा शोधत होती.+ ६० पण बरेच खोटे साक्षीदार पुढे आले+ तरीसुद्धा त्यांना असा पुरावा सापडला नाही. मग, दोन साक्षीदार आले ६१ आणि म्हणाले: “हा माणूस म्हणतो, की ‘मी देवाचं मंदिर पाडून तीन दिवसांत पुन्हा उभं करू शकतो.’”+ ६२ हे ऐकताच महायाजक उभा राहिला आणि तो येशूला म्हणाला: “तू काहीच कसं बोलत नाहीस? ही माणसं तुझ्याविरुद्ध काय आरोप लावत आहेत हे तू ऐकलं नाहीस का?”+ ६३ पण तरीही येशू शांतच राहिला.+ तेव्हा महायाजक त्याला म्हणाला: “मी तुला जिवंत देवाची शपथ घालून विचारतो, तू देवाचा मुलगा, ख्रिस्त आहेस का हे आम्हाला सांग!”+ ६४ येशू त्याला म्हणाला: “तुम्ही स्वतःच बोललात. पण मी तुम्हाला सांगतो: यापुढे तुम्ही मनुष्याच्या मुलाला+ सामर्थ्यशाली देवाच्या उजव्या हाताला बसलेला+ आणि आकाशातल्या ढगांवर स्वार होऊन येताना पाहाल.”+ ६५ तेव्हा महायाजक आपलं बाहेरचं वस्त्र फाडून म्हणाला: “याने देवाची निंदा केली आहे! आता आणखी साक्षीदारांची काय गरज? बघा, त्याने देवाची केलेली निंदा तुम्ही स्वतः ऐकली आहे. ६६ तुमचं काय म्हणणं आहे?” त्यांनी उत्तर दिलं: “याला मृत्युदंड दिला पाहिजे.”+ ६७ तेव्हा, ते त्याच्या तोंडावर थुंकले+ आणि त्याला बुक्क्या मारू लागले.+ काही जणांनी त्याच्या थोबाडीत मारल्या,+ ६८ आणि ते म्हणू लागले: “ख्रिस्त आहेस ना तू? मग भविष्यवाणी कर आणि तुला कोणी मारलं ते सांग.”
६९ मग, पेत्र अंगणात बसलेला असताना एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली: “तूसुद्धा त्या गालीलच्या येशूसोबत होतास ना!”+ ७० पण तो सगळ्यांसमोर ते नाकारून म्हणाला: “तू काय बोलत आहेस, मला माहीत नाही.” ७१ तो बाहेर फाटकाजवळ गेला तेव्हा आणखी एका मुलीने त्याला ओळखलं आणि जवळ उभे असलेल्यांना ती म्हणाली: “हा माणूस नासरेथकर येशूसोबत होता!”+ ७२ त्याने पुन्हा एकदा शपथ घेऊन ती गोष्ट नाकारली: “मी त्या माणसाला ओळखत नाही!” ७३ थोड्या वेळाने तिथे उभे असलेले लोक पेत्रजवळ येऊन म्हणाले: “नक्कीच तूपण त्यांच्यातलाच एक आहेस, खरंतर तुझ्या बोलण्यावरून* लगेच कळून येतं.” ७४ तेव्हा, आपण खोटं बोलत असलो, तर आपल्याला शाप लागावा असं म्हणून तो शपथ घेऊन म्हणाला: “मी त्या माणसाला ओळखत नाही!” आणि तेवढ्यात कोंबडा आरवला. ७५ तेव्हा, “कोंबडा आरवण्याआधी तू तीन वेळा मला नाकारशील,” हे येशूचे शब्द+ पेत्रला आठवले आणि तो बाहेर जाऊन ढसाढसा रडू लागला.