यहेज्केल
३६ “मनुष्याच्या मुला, इस्राएलच्या डोंगरांबद्दल भविष्यवाणी कर आणि म्हण, ‘हे इस्राएलच्या डोंगरांनो! यहोवा काय म्हणतो ते ऐका. २ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “तुमच्याबद्दल शत्रू असं म्हणालेत, ‘अरे वाह! प्राचीन काळातली उच्च स्थानंही* आपलीच झालीत!’”’+
३ म्हणून तू भविष्यवाणी करून असं म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “इतर राष्ट्रांतल्या उरलेल्या लोकांनी तुमचा ताबा घ्यावा, म्हणून शत्रूंनी सगळीकडून तुमच्यावर हल्ला केला आणि तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकलं. शिवाय, लोक तुमच्याबद्दल बोलत आहेत, तुमची निंदा करत आहेत.+ ४ म्हणून इस्राएलच्या डोंगरांनो! सर्वोच्च प्रभू यहोवा काय म्हणतो ते ऐका. सर्वोच्च प्रभू यहोवा डोंगरांना आणि टेकड्यांना, झऱ्यांना आणि दऱ्या-खोऱ्यांना, उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणांना;+ तसंच, लुटल्या गेलेल्या शहरांना, आसपासच्या राष्ट्रांतल्या उरलेल्या लोकांनी थट्टा केलेल्या ओसाड शहरांना म्हणतो;+ ५ या सगळ्यांना सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘मी आपल्या ज्वलंत आवेशाने+ राष्ट्रांतल्या उरलेल्या लोकांविरुद्ध आणि संपूर्ण अदोमविरुद्ध बोलीन. देशातल्या कुरणांचा ताबा घ्यायला आणि देश लुटायला, त्यांनी मोठ्या आनंदाने आणि तुच्छपणे बोलून+ माझा देश आपला असल्याचा दावा केलाय.’”’+
६ म्हणून तू इस्राएल देशाबद्दल भविष्यवाणी कर. त्याच्या डोंगरांना, टेकड्यांना, झऱ्यांना आणि दऱ्या-खोऱ्यांना असं म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “तुम्हाला राष्ट्रांच्या हातून अपमान सहन करावा लागला.+ म्हणून बघा! मी क्रोधाने आणि आवेशाने बोलीन.”’
७ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘मी हात पुढे करून शपथ घेतो आणि म्हणतो, की आता तुमच्या आजूबाजूच्या राष्ट्रांना अपमान सहन करावा लागेल.+ ८ पण हे इस्राएलच्या डोंगरांनो! तुमच्यावर मात्र झाडं उगवतील. माझ्या इस्राएली लोकांसाठी त्या झाडांना पुष्कळ फांद्या फुटतील आणि भरपूर फळं येतील.+ कारण माझे लोक लवकरच परत येणार आहेत. ९ मी तुमच्यासोबत आहे. मी तुमच्याकडे लक्ष देईन. तुमच्या जमिनींवर बी पेरलं जाईल आणि तिथे शेतीवाडी होईल. १० मी तुमच्या लोकांची, मी संपूर्ण इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांची संख्या अनेक पटींनी वाढवीन. उद्ध्वस्त झालेली ठिकाणं पुन्हा बांधली जातील+ आणि शहरांत लोकवस्ती होईल.+ ११ हो, मी तुमच्या लोकांची आणि तुमच्या गुराढोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवीन;+ त्यांची संख्या खूप वाढेल आणि ते फलदायी होतील. मी तुमच्यावर पूर्वीसारखीच लोकवस्ती होऊ देईन,+ आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त समृद्ध करीन;+ मग तुम्हाला कळून येईल, की मी यहोवा आहे.+ १२ मी लोकांना, माझ्या इस्राएली लोकांना तुमच्यामधून ये-जा करायला लावीन, आणि ते तुमचा ताबा घेतील.+ तुम्ही त्यांचा वारसा व्हाल, आणि पुन्हा कधीच तुम्ही त्यांच्या मुलांना त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकणार नाहीत.’”+
१३ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘ते तुम्हाला असं म्हणतात, “तू लोकांना खाऊन टाकणारा आणि आपल्याच राष्ट्रांच्या मुलांना हिरावून घेणारा देश आहेस.”’ १४ ‘म्हणून यापुढे तू लोकांना खाणार नाहीस किंवा आपल्याच राष्ट्रांच्या मुलांना हिरावून घेणार नाहीस,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो. १५ ‘मी राष्ट्रांना तुझा आणखी अपमान करू देणार नाही किंवा तुला लोकांच्या टिकेचा विषय होऊ देणार नाही.+ आणि पुन्हा कधीच तू तुझ्या राष्ट्रांसाठी अडखळण्याचं कारण बनणार नाहीस,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”
१६ मग यहोवाकडून मला परत एकदा असा संदेश मिळाला: १७ “मनुष्याच्या मुला, इस्राएलच्या घराण्यातले लोक जेव्हा त्यांच्या देशात राहायचे, तेव्हा त्यांनी आपल्या कामांनी आणि वागणुकीने तो देश अशुद्ध करून टाकला होता.+ माझ्यासाठी त्यांची सगळी कामं मासिक पाळीच्या अशुद्धतेसारखी होती.+ १८ त्यांनी देशात रक्तपात केला आणि आपल्या घृणास्पद मूर्तींनी* देश अशुद्ध करून टाकला.+ म्हणून मी त्यांच्यावर माझ्या क्रोधाचा वर्षाव केला.+ १९ मी इतर राष्ट्रांमध्ये त्यांची पांगापांग केली आणि वेगवेगळ्या देशांत त्यांना विखरून टाकलं.+ मी त्यांना त्यांच्या वागणुकीप्रमाणे आणि कामांप्रमाणे शिक्षा केली. २० पण ते जेव्हा इतर राष्ट्रांमध्ये गेले, तेव्हा तिथले लोक त्यांच्याबद्दल म्हणाले, ‘हे यहोवाचे लोक आहेत; पण तरीसुद्धा त्यांना त्याचा देश सोडावा लागला.’ असं म्हणून त्यांनी माझ्या पवित्र नावाची बदनामी केली.+ २१ इस्राएलच्या घराण्यातले लोक ज्या-ज्या राष्ट्रांमध्ये गेले, तिथे-तिथे त्यांनी माझ्या पवित्र नावाला कलंक लावला.+ म्हणून आता मी माझ्या नावासाठी पाऊल उचलीन.”
२२ तू इस्राएलच्या घराण्याला म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो! मी तुमच्यासाठी नाही, तर माझ्या पवित्र नावासाठी पाऊल उचलतोय; तुम्ही राष्ट्रांमध्ये जाऊन कलंकित केलेल्या माझ्या नावासाठी मी पाऊल उचलतोय.”’+ २३ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘तुम्ही राष्ट्रांमध्ये जाऊन अपवित्र केलेलं माझं महान नाव मी नक्कीच पवित्र करीन.+ आणि त्या राष्ट्रांना दाखवून देईन, की मी एक पवित्र देव आहे. तेव्हा त्यांना कळून येईल, की मी यहोवा आहे.+ २४ मी तुम्हाला राष्ट्रांमधून, सगळ्या देशांमधून गोळा करून परत तुमच्या देशात आणीन.+ २५ मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन आणि तुम्ही शुद्ध व्हाल;+ मी तुम्हाला तुमच्या सगळ्या अशुद्धतेपासून आणि तुमच्या सगळ्या घृणास्पद मूर्तींपासून शुद्ध करीन.+ २६ मी तुम्हाला एक नवीन हृदय देईन+ आणि तुमच्यात नवीन मनोवृत्ती निर्माण करीन.+ मी तुमच्यातून दगडाचं हृदय काढून टाकीन+ आणि तुम्हाला मांसाचं हृदय* देईन. २७ मी तुम्हाला माझी पवित्र शक्ती* देईन, आणि माझ्या कायद्यांप्रमाणे तुम्हाला चालवीन.+ तुम्ही माझे न्याय-निर्णय* पाळाल आणि त्यांप्रमाणे वागाल. २८ मग, जो देश मी तुमच्या वाडवडिलांना दिला होता, त्यात तुम्ही राहाल. तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा देव होईन.’+
२९ ‘मी तुमची सगळी अशुद्धता दूर करून तुम्हाला वाचवीन. मी बियांना भरघोस पीक द्यायची आज्ञा करीन. मी तुमच्यावर दुष्काळ आणणार नाही.+ ३० मी झाडांना भरपूर फळ द्यायला आणि शेतांना भरपूर पीक द्यायला लावीन. म्हणजे, राष्ट्रांमध्ये पुन्हा कधीच तुम्हाला दुष्काळामुळे अपमानित व्हावं लागणार नाही.+ ३१ तेव्हा तुम्हाला तुमच्या सगळ्या दुष्ट कामांची आणि चुकीच्या कृत्यांची आठवण होईल. आणि तुमच्या अपराधांच्या दोषामुळे आणि घृणास्पद कामांमुळे तुम्हाला स्वतःचीच किळस वाटेल.+ ३२ पण एक गोष्ट लक्षात ठेवा: हे सगळं मी तुमच्यासाठी करत नाही,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो. ‘उलट, हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो! लज्जित व्हा आणि आपल्या वाईट कामांमुळे शरमेने मान खाली घाला.’
३३ सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘ज्या दिवशी मी तुमच्या अपराधांचा दोष दूर करून तुम्हाला शुद्ध करीन, त्या दिवशी मी उद्ध्वस्त झालेली शहरं पुन्हा बांधीन+ आणि शहरांमध्ये लोकवस्ती व्हायला लावीन.+ ३४ जो देश येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना उद्ध्वस्त झालेला दिसायचा, त्या देशात शेतीवाडी केली जाईल. ३५ मग लोक म्हणतील: “जो देश उद्ध्वस्त झाला होता, तो आता एदेन बागेसारखा+ बनलाय; आणि जी शहरं पाडून टाकण्यात आली होती, उद्ध्वस्त व ओसाड करण्यात आली होती, ती आता बांधून मजबूत करण्यात आली आहेत आणि तिथे लोकवस्ती झाली आहे.”+ ३६ तेव्हा तुमच्या आजूबाजूला जी राष्ट्रं उरली आहेत त्यांना कळून येईल, की जे पाडण्यात आलं होतं ते मी स्वतः यहोवाने बांधून काढलंय; आणि उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणी मी स्वतः झाडं लावली आहेत. मी यहोवा स्वतः हे बोललोय आणि मी ते पूर्णही केलंय.’+
३७ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘मी इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांची संख्या मेंढरांसारखी वाढवावी, अशी विनंती मी त्यांना माझ्याकडे करू देईन. ३८ उद्ध्वस्त झालेली शहरं लोकांच्या कळपांनी भरून जातील; ती पवित्र जनांच्या समूहासारखी, यरुशलेममध्ये तिच्या सणाच्या वेळी+ असलेल्या तिच्या कळपासारखी* भरून जातील.+ त्या वेळी त्यांना कळून येईल, की मी यहोवा आहे.’”