वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt पृ. २५०८-२५४८
  • बायबलची शब्दार्थसूची

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबलची शब्दार्थसूची
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • उपशिर्षक
  • अ
  • आ
  • इ
  • उ
  • ऊ
  • ए
  • ओ
  • क
  • ख
  • ग
  • च
  • ज
  • झ
  • ट
  • ड
  • त
  • द
  • ध
  • न
  • प
  • फ
  • ब
  • भ
  • म
  • य
  • र
  • ल
  • व
  • श
  • ष
  • स
  • ह
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
बायबलची शब्दार्थसूची

बायबलची शब्दार्थसूची

अ आ इ उ ऊ ए ओ क ख ग च ज झ ट ड त द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह

अ

  • अखया.

    ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, दक्षिण ग्रीसचा रोमी प्रांत; त्याची राजधानी करिंथ इथे होती. अखया प्रांतात, संपूर्ण पेलोपोनीस आणि ग्रीस खंडाचा मध्य भाग यायचा. (प्रेका १८:१२)—अति. ख१३ पाहा.

  • अग्नीचं सरोवर.

    एक लाक्षणिक ठिकाण; तिथे “अग्नी आणि गंधक” जळत राहतात; याला “दुसरं मरण” असंही म्हटलं आहे. पश्‍चात्ताप न करणारे पापी लोक, सैतान, इतकंच नाही तर मृत्यू आणि कबर (किंवा, हेडीस) यांनाही त्यात फेकून दिलं जाईल. खरं पाहिलं तर, सैतान हा एक अदृश्‍य प्राणी असल्यामुळे त्याच्यावर, तसंच मृत्यू व कबर यांच्यावर आगीचा कोणताही परिणाम होऊ शकत नाही; तरीसुद्धा त्यांना या अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल असं म्हटलं आहे. याचाच अर्थ असा होतो, की हे सरोवर सर्वकाळाच्या यातनेला नाही, तर सर्वकाळाच्या नाशाला सूचित करतं.—प्रक १९:२०; २०:१४, १५; २१:८.

  • अजाजेल.

    एक हिब्रू नाव. या शब्दाचा अर्थ कदाचित “नाहीसा होणारा बकरा” असा असावा. प्रायश्‍चित्ताच्या दिवशी जो बकरा अजाजेलसाठी निवडला जायचा, तो ओसाड रानात सोडून दिला जायचा. इस्राएल राष्ट्राने आदल्या वर्षी केलेली पापं तो लाक्षणिक अर्थाने वाहून न्यायचा.—लेवी १६:८, १०.

  • अथांग डोह.

    यासाठी असलेला ग्रीक शब्द ॲबिसोस  असून त्याचा अर्थ “अतिशय खोल” किंवा “ज्याचा तळ गाठता येत नाही, ज्याला सीमा नाही,” असा होतो. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत या शब्दाचा उपयोग, कैदेत असण्याच्या स्थितीला किंवा त्या ठिकाणाला सूचित करण्यासाठी केला आहे. हा शब्द कबरेलाही सूचित करतो, पण त्याचा तेवढाच अर्थ होत नाही.—लूक ८:३१; रोम १०:७; प्रक २०:३.

  • अदार.

    बाबेलच्या बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांच्या पवित्र कॅलेंडरचा १२ वा महिना आणि कृषी कॅलेंडरचा ६ वा महिना. हा महिना, फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्चच्या मध्यापर्यंत असायचा. (एस्ते ३:७)—अति. ख१५ पाहा.

  • अदोम.

    इसहाकचा मुलगा एसाव याला दिलेलं दुसरं नाव. एसावच्या (अदोमच्या) वंशजांनी, मृत समुद्र आणि अकाबाचं आखात यांच्या मधे असलेल्या डोंगराळ प्रदेशावर, म्हणजे सेईरच्या प्रदेशावर कब्जा केला. तो प्रदेश अदोम या नावाने ओळखला जाऊ लागला. (उत्प २५:३०; ३६:८)—अति. ख३ आणि ख४ पाहा.

  • अधिकारी.

    बाबेलच्या शासनात, अधिकारी हे प्रांताचे नगर-अधिकारी होते. त्यांना कायदा माहीत असून त्यांच्याकडे काही प्रमाणात न्यायिक अधिकारही होते. रोमी शासनात नगर-अधिकारी हे सरकारी प्रशासक होते. व्यवस्था राखणं, अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणं, कायदे मोडणाऱ्‍यांचा न्याय करणं आणि शिक्षा देण्याचा हुकूम देणं व तो अंमलात आणणं या त्यांच्या काही जबाबदाऱ्‍या होत्या.—दान ३:२; प्रेका १६:२०.

  • अनैतिक लैंगिक कृत्यं.

    पोर्निया  या ग्रीक शब्दावरून. हा शब्द, बायबलमध्ये अशा काही लैंगिक कृत्यांना सूचित करतो जी देवाच्या नजरेत चुकीची आहेत. यात व्यभिचार, वेश्‍याव्यवसाय, लग्न न झालेल्या व्यक्‍तींमधले लैंगिक संबंध, समलैंगिक संबंध आणि प्राण्यांसोबत ठेवलेले लैंगिक संबंध या गोष्टींचा समावेश होतो. प्रकटीकरणात हा शब्द लाक्षणिक अर्थाने वापरण्यात आला आहे. त्यात धर्मांची तुलना वेश्‍येशी करण्यात आली आहे आणि या वेश्‍येला “मोठी बाबेल” असं म्हणण्यात आलं आहे. ती सत्तेसाठी आणि आर्थिक लाभासाठी या जगाच्या शासकांसोबत संबंध ठेवते असं सांगितलं आहे. (प्रक १४:८; १७:२; १८:३; मत्त ५:३२; प्रेका १५:२९; गल ५:१९)—वेश्‍या पाहा.

  • अपार कृपा.

    यासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा मूळ अर्थ, एखादी चांगली किंवा मन जिंकून घेणारी गोष्ट असा होतो. दयाळूपणे दिलेल्या एखाद्या भेटवस्तूला किंवा ती दयाळूपणे देण्याच्या पद्धतीला सहसा हा शब्द सूचित करतो. देवाच्या अपार कृपेच्या बाबतीत, हा शब्द देवाने उदारपणे आणि कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता दिलेल्या कृपादानाला सूचित करतो. त्याअर्थी हा शब्द मानवांसाठी देवाची उदारता, प्रेम आणि दयाळूपणा व्यक्‍त करतो. यासाठी असलेल्या मूळ ग्रीक शब्दाचं भाषांतर “कृपा” आणि “कृपादान” असंही करण्यात आलं आहे. ज्याच्यावर अपार कृपा केली जाते, त्याने ती स्वतः कमावलेली नसते; किंवा, ती मिळण्यासाठी तो पात्र नसतो. तर फक्‍त समोरच्या व्यक्‍तीच्या उदारतेमुळे त्याच्यावर अपार कृपा केली जाते.—२कर ६:१; इफि १:७.

  • अब.

    बाबेलच्या बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांच्या पवित्र कॅलेंडरचा ५ वा महिना आणि कृषी कॅलेंडरचा ११ वा महिना. हा महिना, जुलैच्या मध्यापासून ऑगस्टच्या मध्यापर्यंत असायचा. बायबलमध्ये या महिन्याचं नाव दिलेलं नाही, तर त्याला फक्‍त ‘पाचवा महिना’ असं म्हटलं आहे. (गण ३३:३८; एज ७:९)—अति. ख१५ पाहा.

  • अबीब.

    हे यहुदी लोकांच्या पवित्र कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याचं आणि कृषी कॅलेंडरच्या सातव्या महिन्याचं जुनं नाव आहे. या नावाचा अर्थ “(धान्याची) हिरवी कणसं” असा असून, हा महिना मार्चच्या मध्यापासून एप्रिलच्या मध्यापर्यंत असायचा. यहुदी लोक बाबेलच्या बंदिवासातून परत आले, तेव्हा या महिन्याला ‘निसान’ असं नाव दिलं गेलं. (अनु १६:१)—अति. ख१५ पाहा.

  • अभिषेक.

    यासाठी असलेल्या मूळ हिब्रू शब्दाचा अर्थ, “द्रव लावणं” असा होतो. एखाद्या व्यक्‍तीला किंवा वस्तूला खास सेवेसाठी समर्पित करण्यात आलं आहे, हे दाखवायला त्या व्यक्‍तीला किंवा वस्तूला तेल लावलं जायचं. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, स्वर्गीय आशेसाठी निवडलेल्या लोकांवर पवित्र शक्‍ती ओतण्याच्या बाबतीतही या शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे.—निर्ग २८:४१; १शमु १६:१३; २कर १:२१.

  • अराम; अरामी लोक.

    शेमचा मुलगा अराम याचे वंशज. ते लबानोनच्या डोंगराळ प्रदेशापासून मेसोपटेम्यापर्यंत, आणि उत्तरेकडच्या टॉरस पर्वतरांगांपासून खाली दिमिष्कपर्यंत आणि पुढे पार दक्षिणेकडच्या प्रदेशापर्यंत राहायचे. हिब्रू भाषेत या प्रदेशाला ‘अराम’ म्हटलं जायचं. नंतर हा प्रदेश सीरिया या नावाने, आणि तिथले लोक सीरियाचे लोक या नावाने ओळखले जाऊ लागले.—उत्प २५:२०; अनु २६:५; होशे १२:१२.

  • अरामी भाषा.

    ही भाषा हिब्रूशी मिळतीजुळती असून या दोन्ही भाषांची एकच वर्णमाला आहे. ही मुळात अरामी लोकांची भाषा असली, तरी पुढे ती एक आंतरराष्ट्रीय भाषा बनली. अश्‍शूर व बाबेलच्या साम्राज्यांत व्यापार व दळणवळण यांसाठी या भाषेचा उपयोग होऊ लागला. तसंच, ही पारसच्या साम्राज्याचीही अधिकृत भाषा होती. (एज ४:७) एज्रा, यिर्मया आणि दानीएल या पुस्तकांचा काही भाग अरामी भाषेत लिहिण्यात आला होता.—एज ४:८–६:१८; ७:१२-२६; यिर्म १०:११; दान २:४ख–७:२८.

  • अरीयपग.

    अथेन्समधली एक उंच टेकडी. ती एक्रोपोलिसच्या उत्तर-पश्‍चिमेकडे होती. तिथे जी सभा (न्यायसभा) भरायची तिलासुद्धा हेच नाव देण्यात आलं होतं. पौलने आपल्या विश्‍वासांचं स्पष्टीकरण द्यावं म्हणून स्तोयिक व एपिकूर पंथातल्या काही तत्त्वज्ञानी लोकांनी त्याला इथे आणलं होतं.—प्रेका १७:१९.

  • अर्पणाच्या भाकरी.

    उपासना मंडपाच्या आणि मंदिराच्या पवित्र स्थानात, सहा-सहाच्या दोन थप्पींमध्ये ठेवलेल्या बारा भाकरी. त्यांना “भाकरींची थप्पी” आणि “पवित्र भाकरी” असंही म्हणण्यात आलं आहे. प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी देवाला अर्पण केलेल्या या भाकरी बदलून ताज्या भाकरी ठेवल्या जायच्या. काढून टाकलेल्या भाकरी सहसा फक्‍त याजक खायचे. (२इत २:४; मत्त १२:४; निर्ग २५:३०; लेवी २४:५-९; इब्री ९:२)—अति. ख५ पाहा.

  • अलाबास्त्र.

    इजिप्तमध्ये ॲलाबॅस्ट्रोन नावाच्या जागेजवळ सापडणारा एक प्रकारचा दगड. त्यापासून अत्तराच्या छोट्या-छोट्या बाटल्या किंवा कुप्या बनवल्या जायच्या. त्यांतलं मौल्यवान अत्तर बाहेर पडू नये, म्हणून त्या सहसा तोंडाशी निमुळत्या असून घट्ट बंद केल्या जाऊ शकत होत्या. पुढे त्या दगडालासुद्धा अलाबास्त्र हेच नाव पडलं.—मार्क १४:३.

  • अलामोथ.

    संगीताशी संबंधित असलेला एक शब्द. त्याचा अर्थ, “कुमारी; तरुण मुली,” असा असून तो कदाचित तरुण मुलींच्या सर्वात उच्च स्वरात गाणं गाण्याला सूचित करत असावा. संगीत सगळ्यात उच्च स्वरात वाजवलं जावं, हे सुचवण्यासाठी कदाचित अलामोथ हा शब्द वापरला जायचा.—१इत १५:२०; स्तो ४६:उपरीलेखन.

  • अलूल.

    बाबेलच्या बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांच्या पवित्र कॅलेंडरचा ६ वा महिना आणि कृषी कॅलेंडरचा १२ वा महिना. हा महिना, ऑगस्टच्या मध्यापासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत असायचा. (नहे ६:१५)—अति. ख१५ पाहा.

  • अल्फा आणि ओमेगा.

    ग्रीक वर्णमालेतलं पहिलं आणि शेवटचं अक्षर; प्रकटीकरणाच्या पुस्तकात देवाची एक पदवी म्हणून या शब्दांचा तीन वेळा एकत्र उपयोग करण्यात आला आहे. या तिन्ही ठिकाणी, या शब्दांचा अर्थ, “पहिला आणि शेवटला,” व “सुरुवात आणि अंत,” असा होतो.—प्रक १:८; २१:६; २२:१३.

  • अशुद्ध.

    या शब्दावरून शरीर अस्वच्छ असणं किंवा नैतिक नियमांचं उल्लंघन करणं असं सूचित होऊ शकतं. पण, बायबलमध्ये सहसा हा शब्द मोशेच्या नियमशास्त्रानुसार योग्य नसलेल्या किंवा शुद्ध समजल्या जात नसलेल्या गोष्टींना सूचित करतो. (लेवी ५:२; १३:४५; मत्त १०:१; प्रेका १०:१४; इफि ५:५)—शुद्ध पाहा.

  • अष्टारोथ.

    कनानी लोकांची एक देवी. तिला युद्धाची आणि प्रजननाची देवी, तसंच बआल दैवताची पत्नी मानलं जायचं.—१शमु ७:३.

  • अहरोनची मुलं.

    लेवीचा नातू अहरोन याचे वंशज. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे, सर्वात पहिला महायाजक म्हणून अहरोनची निवड झाली होती. अहरोनची मुलं उपासना मंडपात आणि यरुशलेमच्या मंदिरात याजक म्हणून आपल्या जबाबदाऱ्‍या पार पाडायची.—१इत २३:२८.

  • अंगण.

    उपासना मंडपाच्या सभोवती कुंपण घातलेली मोकळी जागा. नंतर, मंदिराच्या मुख्य इमारतीच्या सभोवती मोकळ्या असलेल्या आणि चारही बाजूंनी भिंती असलेल्या जागेला अंगण म्हटलं जाऊ लागलं. उपासना मंडपाच्या अंगणात आणि मंदिराच्या आतल्या अंगणात होमार्पणाची वेदी होती. (अति. ख५, ख८, ख११.) बायबलमध्ये, घरांच्या व राजमहालांच्या संदर्भातही अंगण हा शब्द वापरण्यात आला आहे.—निर्ग ८:१३; २७:९; १रा ७:१२; एस्ते ४:११; मत्त २६:३.

  • ॲसेल्गेया.—

    निर्लज्ज वर्तन पाहा.

आ

  • आग विझवायची कातरी.

    सोन्यापासून किंवा तांब्यापासून बनवलेलं आणि उपासना मंडपात व मंदिरात वापरलं जाणारं एक साधन. दिव्यांची वात कापून टाकायला यांचा उपयोग केला जात असावा.—२रा २५:१४.

  • आनंदाचा संदेश.

    ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये हे शब्द देवाच्या राज्याबद्दलच्या संदेशाला, तसंच येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवल्यामुळे मिळणाऱ्‍या तारणाबद्दलच्या संदेशाला सूचित करतात.—लूक ४:१८, ४३; प्रेका ५:४२; प्रक १४:६.

  • आभार मानण्याचं अर्पण.

    देवाने केलेल्या तरतुदींसाठी आणि त्याने दाखवलेल्या एकनिष्ठ प्रेमासाठी त्याची स्तुती करायला दिलेलं शांती-अर्पण. या वेळी बलिदान दिलेल्या प्राण्याचं मांस, तसंच बेखमीर आणि खमीर असलेली भाकर खाल्ली जायची. अर्पण केलेल्या प्राण्याचं मांस त्याच दिवशी खायचं होतं.—२इत २९:३१.

  • आमेन.

    म्हणजे “असेच होवो,” किंवा “नक्कीच.” हा शब्द, ॲमन  या मूळ हिब्रू शब्दावरून आला आहे. याचा अर्थ, “विश्‍वासू, भरवशालायक असणं,” असा होतो. एखाद्या शपथेला, प्रार्थनेला किंवा विधानाला सहमती दाखवण्यासाठी “आमेन” हा शब्द वापरला जायचा. प्रकटीकरणाच्या पुस्तकात, येशूसाठी एक पदवी म्हणून या शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे.—अनु २७:२६; १इत १६:३६; प्रक ३:१४.

  • आशिया.

    ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, एका रोमी प्रांताचं नाव. यात आजच्या तुर्कीएच्या (आधीचं नाव टर्की किंवा तुर्कस्थान) पश्‍चिमेकडचा भाग आणि समुद्रकिनाऱ्‍याजवळची बेटं, म्हणजे सामा व पात्म यांसारखी बेटं येतात. इफिस ही आशिया प्रांताची राजधानी होती. (प्रेका २०:१६; प्रक १:४)—अति. ख१३ पाहा.

इ

  • इथियोपिया.

    इजिप्तच्या दक्षिणेला असलेलं प्राचीन काळातलं एक राष्ट्र. त्यात आजच्या इजिप्तचा दक्षिणेकडच्या टोकाचा भाग आणि आजचा सुदान देश असायचा. हिब्रू भाषेत हा शब्द काही वेळा “कूश” यासाठीही वापरण्यात आला आहे.—एस्ते १:१.

  • इब्री.

    अब्राम (अब्राहाम) हा त्याच्या आसपास राहणाऱ्‍या अमोरी लोकांपासून वेगळा आहे, हे दाखवायला सगळ्यात आधी त्याला “इब्री” म्हणण्यात आलं होतं. पुढे अब्राहामचा नातू याकोब याच्यापासून झालेल्या त्याच्या वंशजांना इब्री आणि त्यांच्या भाषेला इब्री भाषा म्हणण्यात आलं. येशूच्या काळापर्यंत, इब्री भाषेत अनेक अरामी भाषेतल्या शब्दांचा समावेश झाला होता आणि येशू व त्याचे शिष्य हीच भाषा बोलायचे.—उत्प १४:१३; निर्ग ५:३; प्रेका २६:१४.

  • इल्लूरिकम.

    ग्रीसच्या उत्तर-पश्‍चिमेकडे असलेला एक रोमी प्रांत. पौलने आपल्या सेवाकार्याच्या वेळी इथपर्यंत प्रवास केला; पण, त्याने इल्लूरिकम या ठिकाणी प्रचार केला की नाही, की तो फक्‍त तिथपर्यंत पोहोचला हे मात्र सांगण्यात आलेलं नाही. (रोम १५:१९)—अति. ख१३ पाहा.

  • इस्राएल.

    देवाने याकोबला दिलेलं नाव. पुढे याकोबच्या सर्व वंशजांचा एक समूह म्हणून उल्लेख करताना त्यांना इस्राएल म्हटलं जायचं. याकोबच्या १२ मुलांच्या वंशजांना सहसा इस्राएलची मुलं, इस्राएलचं घराणं, इस्राएली लोक किंवा इस्राएली म्हटलं जायचं. दक्षिणेच्या राज्यापासून वेगळ्या झालेल्या उत्तरेकडच्या दहा वंशाच्या राज्यालासुद्धा इस्राएल म्हटलं जायचं. आणि पुढे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी ‘देवाचं इस्राएल’ हे शब्द वापरण्यात आले.—गल ६:१६; उत्प ३२:२८; २शमु ७:२३; रोम ९:६.

उ

  • उच्च स्थान.

    उपासनेची जागा; ही जागा सहसा एखाद्या टेकडीवर, डोंगरावर किंवा माणसांनी बांधलेल्या ओट्यांवर असायची. काही वेळा उच्च स्थानं खऱ्‍या देवाची उपासना करण्यासाठी वापरली गेली असली, तरी त्यांचा संबंध सहसा खोट्या दैवतांच्या उपासनेशीच होता.—गण ३३:५२; १रा ३:२; यिर्म १९:५.

  • उपपत्नी.

    एखाद्याची दुसरी बायको. ती सहसा दासी असायची.—निर्ग २१:८; २शमु ५:१३; १रा ११:३.

  • उपरीलेखन.

    काही स्तोत्रांच्या सुरुवातीला असलेली ओळ. यात स्तोत्र लिहिणाऱ्‍याचं नाव, ते कोणत्या परिस्थितीत लिहिण्यात आलं, संगीताबद्दल सूचना किंवा स्तोत्र लिहिण्यामागचा हेतू काय आहे हे सांगितलेलं असतं.—स्तोत्रं ३, ४, ५, ६, ७, ३०, ३८, ६०, ९२, १०२ यांचे उपरीलेखन पाहा.

  • उपस्थिती.

    हा शब्द, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतल्या काही भागांत मसीही राजा या नात्याने येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीला सूचित करतो. तो स्वर्गात राजासनावर बसला तेव्हापासून हा काळ सुरू होतो, आणि या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटल्या दिवसांतही चालू राहतो. ‘ख्रिस्ताची उपस्थिती’ या शब्दांवरून त्याचं येणं आणि लगेच निघून जाणं सूचित होत नाही. तर हा बराच काळ चालणारा एक खास कालावधी आहे हे सूचित होतं.—मत्त २४:३.

  • उपास.

    ठरवलेल्या काळापर्यंत काहीही न खाणं. इस्राएली लोक प्रायश्‍चित्ताच्या दिवशी, दुःखाच्या काळात आणि देवाकडून मार्गदर्शन हवं असेल तेव्हा उपास करायचे. पूर्वीच्या काळी आपल्यावर आलेल्या संकटांची आठवण राहावी, म्हणून यहुदी लोकांनी वर्षातून चार वेळा उपास करायचा नियम बनवला होता. उपास करणं ख्रिश्‍चनांसाठी गरजेचं नाही.—एज ८:२१; यश ५८:६; लूक १८:१२.

  • उपासना मंडप.

    इजिप्तमधून बाहेर आल्यावर इस्राएली लोकांनी उपासनेसाठी वापरलेला तंबू. हा तंबू एका जागेवरून दुसऱ्‍या जागी नेला जाऊ शकत होता. यात, देवाची उपस्थिती दर्शवणारी यहोवाच्या कराराची पेटी ठेवली जायची. शिवाय, या ठिकाणी बलिदानं दिली जायची आणि देवाची उपासना केली जायची. याला काही वेळा ‘भेटमंडप’ असंही म्हटलं आहे. हा मंडप लाकडाच्या चौकटींचा बनलेला असून तो मलमलीच्या कापडाने झाकलेला होता; या कापडावर करुबांच्या आकृत्यांचं भरतकाम केलेलं होतं. उपासना मंडपात दोन खोल्या होत्या, पहिल्या खोलीला पवित्र स्थान म्हटलं जायचं, तर दुसऱ्‍या खोलीला परमपवित्र स्थान. (यहो १८:१; निर्ग २५:९)—अति. ख५ पाहा.

  • उरलेलं धान्य वेचणं.

    शेतात कापणी करणाऱ्‍यांनी मुद्दामहून मागे सोडलेली किंवा नकळत मागे पडलेली धान्याची कणसं गोळा करणं. मोशेच्या नियमशास्त्रात अशी आज्ञा दिली होती, की लोकांनी आपल्या शेताच्या काठावरच्या सगळ्या पिकाची कापणी करू नये किंवा झाडांवरची सगळी जैतूनाची फळं आणि द्राक्षं काढून घेऊ नयेत. कापणीनंतर जे काही उरेल ते वेचण्याचा हक्क देवाने गरिबांना, पीडितांना, देशात राहणाऱ्‍या विदेशी लोकांना, अनाथांना आणि विधवांना दिला होता.—रूथ २:७.

  • उरीम आणि थुम्मीम.

    हे कदाचित दगडांपासून बनवलेले असावेत; संपूर्ण राष्ट्राला जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या विषयावर यहोवाकडून मार्गदर्शन हवं असायचं, तेव्हा महायाजक यांचा वापर करायचा. देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी जसा चिठ्ठ्यांचा वापर केला जायचा, तसंच महायाजक उरीम आणि थुम्मीमचा वापर करायचा. महायाजक जेव्हा उपासना मंडपात जायचा तेव्हा तो आपल्या ऊरपटात उरीम आणि थुम्मीम ठेवायचा. असं दिसतं की बाबेलने यरुशलेमचा नाश केल्यावर यांचा वापर करणं बंद झालं.—निर्ग २८:३०; नहे ७:६५.

ऊ

  • ऊद.

    बोसवेलीया  जातीच्या काही झाडाझुडपांचा वाळवलेला रस (डिंक). तो जाळल्यावर सुगंध यायचा. उपासना मंडपात आणि मंदिरात जो पवित्र धूप जाळला जायचा त्यातला हा एक घटक होता. तो अन्‍नार्पणांसोबतही दिला जायचा आणि पवित्र स्थानात ठेवल्या जाणाऱ्‍या अर्पणाच्या भाकरीच्या प्रत्येक थप्पीवरसुद्धा ठेवला जायचा.—निर्ग ३०:३४-३६; लेवी २:१; २४:७; मत्त २:११.

  • ऊरपट.

    हा पसरट बटव्यासारखा असून तो मौल्यवान रत्नांनी जडलेला होता. इस्राएलचा महायाजक जेव्हा जेव्हा पवित्रस्थानात जायचा तेव्हा तेव्हा आपल्या छातीवर हा ऊरपट बांधायचा. याला “न्यायाचा ऊरपट” असं म्हटलं जायचं, कारण यात यहोवाचे निर्णय जाणून घेण्यासाठी वापरलं जाणारं उरीम आणि थुम्मीम ठेवलं जायचं. (निर्ग २८:१५-३०)—अति. ख५ पाहा.

ए

  • एकनिष्ठ प्रेम.

    हिब्रू शब्द कसद  याचं भाषांतर सहसा एकनिष्ठ प्रेम असं करण्यात आलं आहे. याचा अर्थ, असं प्रेम जे विश्‍वासूपणा, निष्ठा, जिव्हाळा आणि नेहमी साथ देण्याचा निश्‍चय यांनी प्रवृत्त झालेलं असतं. ‘एकनिष्ठ प्रेम’ हे शब्द सहसा देवाचं माणसांवर असलेल्या प्रेमाच्या बाबतीत वापरले जातात. पण लोकांचं एकमेकांवर असलेल्या प्रेमासाठीही ते वापरले जातात.—निर्ग ३४:६; रूथ ३:१०.

  • एजोब.

    बारीक फांद्या आणि पानं असलेलं एक झुडूप. याचा उपयोग, शुद्धीकरणाच्या विधींमध्ये रक्‍त किंवा पाणी शिंपडण्यासाठी केला जायचा. ही बहुतेक मरवा (ओरिगॅनम मारू; ओरिगॅनम सिरियाकम ) वनस्पती असावी. योहान १९:२९ मध्ये सांगितल्याप्रमाणे, मरवाची फांदी एक प्रकारच्या ज्वारीच्या (सोरघम वल्गेर ) ताटाला बांधण्यात आली असावी. त्या ज्वारीचं ताट लांब असल्यामुळे, त्यावर आंबट द्राक्षारसाचा बोळा ठेवून तो येशूच्या तोंडाला लावणं शक्य झालं असावं.—निर्ग १२:२२; स्तो ५१:७.

  • एथानीम.

    यहुद्यांच्या पवित्र कॅलेंडरचा सातवा महिना आणि कृषी कॅलेंडरचा पहिला महिना. हा महिना, सप्टेंबरच्या मध्यापासून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत असायचा. यहुदी लोक बाबेलच्या बंदिवासातून परत आल्यानंतर या महिन्याला तिशरी असं नाव पडलं. (१रा ८:२)—अति. ख१५ पाहा.

  • एपिकूर पंथातले तत्त्वज्ञानी.

    ग्रीक तत्त्वज्ञानी एपिक्युरस (इ.स.पू. ३४१-२७०) याचे शिष्य. मौजमजा करणं हाच माणसाच्या आयुष्याचा एकमेव उद्देश आहे, या कल्पनेवर त्यांचं तत्त्वज्ञान आधारित होतं.—प्रेका १७:१८.

  • एफा.

    एक प्रकारचं घन माप आणि धान्य मोजायचं भांडं. ते एक बथ द्रव मापाइतकं, म्हणजे २२ लिटर इतकं असायचं. (निर्ग १६:३६; यहे ४५:१०)—अति. ख१४ पाहा.

  • एफोद.

    कपड्यांच्या वर घालायचं याजकांचं एक वस्त्र. महायाजक जे एफोद घालायचा ते खास प्रकारचं एफोद होतं. कारण त्या एफोदला समोरच्या बाजूने १२ मौल्यवान रत्नांनी जडलेला ऊरपट बांधला जायचा. (निर्ग २८:४, ६)—अति. ख५ पाहा.

  • एफ्राईम.

    योसेफच्या दुसऱ्‍या मुलाचं नाव; नंतर इस्राएलच्या वंशांपैकी एका वंशाला हे नाव देण्यात आलं. इस्राएल देशाची विभागणी झाल्यावर, एफ्राईमचा वंश प्रबळ ठरला. त्यामुळे दहा वंशांचं राज्य हे एफ्राईम या नावाने ओळखलं जाऊ लागलं.—उत्प ४१:५२; यिर्म ७:१५.

ओ

  • ओमर.

    २.२ लिटर द्रव मावेल इतकं एक घन माप. किंवा एफाचा दहावा भाग. (निर्ग १६:१६, १८)—अति. ख१४ पाहा.

  • ओवाळण्याचं अर्पण.

    हे अर्पण देताना याजक अर्पण हातात घेऊन उभ्या असलेल्या व्यक्‍तीच्या हातांखाली आपले हात ठेवायचा आणि ते मागेपुढे हलवायचा. किंवा याजक स्वतः ते अर्पण ओवाळायचा. या क्रियेतून बलिदानाचं अर्पण यहोवाला वाहिलं  जात आहे हे सूचित व्हायचं.—लेवी ७:३०.

क

  • कडूदवणा.

    अतिशय कडू चव आणि उग्र वास असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या वनस्पती. बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे, की अनैतिक कामं, गुलामी, अन्याय आणि धर्मत्याग यांचे परिणाम कडूदवण्यासारखे नेहमी कडूच असतात. प्रकटीकरण ८:११ या वचनात “कडूदवणा” एका कडू आणि विषारी पदार्थाला सूचित करतो.—प्रक ८:११; अनु २९:१८; नीत ५:४; यिर्म ९:१५; आम ५:७.

  • कनान.

    नोहाचा नातू आणि हामचा चौथा मुलगा. कनानपासून आलेल्या ११ वंशांनी नंतर इजिप्त आणि सीरियाच्या मधे, म्हणजे भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडे असलेल्या प्रदेशात वस्ती केली. या प्रदेशाला ‘कनान देश’ म्हटलं जायचं. (लेवी १८:३; उत्प ९:१८; प्रेका १३:१९)—अति. ख४ पाहा.

  • कबर.

    मेलेल्या व्यक्‍तीला पुरलं जातं ते ठिकाण. पण बऱ्‍याच शास्त्रवचनांत हा शब्द, मृत्यूनंतर सगळी माणसं जातात अशा एका लाक्षणिक कबरेला सूचित करतो. या वचनांमध्ये, कबरेसाठी हिब्रू शब्द “शिओल” आणि ग्रीक शब्द “हेडीस” वापरला आहे. बायबलमध्ये वर्णन केल्याप्रमाणे ती एक अशी स्थिती आहे किंवा लाक्षणिक ठिकाण आहे, जिथे कोणतंही काम केलं जात नाही आणि कोणत्याही प्रकारच्या जाणिवा व भावना नसतात.—उत्प ४७:३०; उप ९:१०; प्रेका २:३१.

  • कमोश.

    मवाबी लोकांचं एक प्रमुख दैवत.—१रा ११:३३.

  • करार.

    देवामध्ये आणि माणसांमध्ये, किंवा दोन माणसांमध्ये, एखादी गोष्ट करण्याचा किंवा न करण्याचा झालेला रीतसर ठराव. काही वेळा, कराराच्या अटी पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ एकाच पक्षावर असायची; याला एकतर्फी करार म्हणतात (म्हणजे, अभिवचन). इतर वेळा, दोन्ही पक्षांना कराराच्या अटी पाळाव्या लागायच्या; याला द्विपक्षी करार म्हणतात. देवाने माणसांशी केलेल्या करारांशिवाय व्यक्‍तींमध्ये, वंशांमध्ये, राष्ट्रांमध्ये किंवा लोकांच्या समूहांमध्येसुद्धा करार झाल्याचं बायबलमध्ये सांगितलं आहे. असे काही करार होते ज्यांचे परिणाम बऱ्‍याच काळापर्यंत राहिले, आणि ते पुढेही राहतील. उदाहरणार्थ: देवाने अब्राहामसोबत, दावीदसोबत, इस्राएल राष्ट्रासोबत (नियमशास्त्राचा करार) आणि देवाच्या इस्राएलसोबत (नवा करार) केलेला करार.—उत्प ९:११; १५:१८; २१:२७; निर्ग २४:७; २इत २१:७.

  • कराराची पेटी.

    बाभळीच्या लाकडापासून बनवलेली आणि सोन्याचा मुलामा दिलेली पेटी. ती उपासना मंडपाच्या परमपवित्र स्थानात आणि नंतर शलमोनने बांधलेल्या मंदिराच्या परमपवित्र स्थानात ठेवण्यात आली होती. पेटीचं झाकण सोन्याचं असून त्यावर समोरासमोर तोंड असलेले दोन करूब होते. या पेटीत खासकरून, दहा आज्ञा लिहिलेल्या दोन पाट्या ठेवल्या जायच्या. (अनु ३१:२६; १रा ६:१९; इब्री ९:४)—अति. ख५ आणि ख८ पाहा.

  • करूब.

    उच्च श्रेणीचे आणि खास जबाबदाऱ्‍या पार पाडणारे स्वर्गदूत. ते सराफ स्वर्गदूतांपेक्षा वेगळे आहेत.—उत्प ३:२४; निर्ग २५:२०; यश ३७:१६; इब्री ९:५.

  • कर्णा.

    धातूपासून बनवलेलं एक वायुवाद्य. याचा उपयोग सूचना देण्यासाठी आणि संगीतासाठी केला जायचा. गणना १०:२ मध्ये सांगितलं आहे, की यहोवाने मोशेला चांदीचे दोन कर्णे बनवायच्या सूचना दिल्या. हे कर्णे लोकांना एकत्र करायला, तळ हलवण्याचा इशारा द्यायला आणि युद्धाची घोषणा करायला वापरले जाणार होते. प्राण्यांच्या शिंगांपासून बनवलेली ‘शिंगं’ अर्धवर्तुळाकार असायची, पण कर्णे कदाचित सरळ आकाराचे होते. मंदिरात वाजवल्या जाणाऱ्‍या वाद्यांमध्ये कर्णेही होते. पण त्यांच्या रचनेबद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही. सहसा यहोवाच्या न्यायसंदेशाच्या घोषणेसोबत किंवा देवाकडून असलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांसोबत लाक्षणिक अर्थाने कर्णे वाजवले जात असल्याचा उल्लेख आढळतो.—२इत २९:२६; एज ३:१०; १कर १५:५२; प्रक ८:७–११:१५.

  • कळस.

    स्तंभाच्या सगळ्यात वर नक्षीकाम केलेला भाग. शलमोनच्या मंदिरासमोर याखीन आणि बवाज नावाचे जे दोन स्तंभ होते, त्यांच्यावर दोन अतिशय मोठे कळस होते. (१रा ७:१६)—अति. ख८ पाहा.

  • कापणीचा सण; सप्ताहांचा सण.—

    पेन्टेकॉस्ट पाहा.

  • काब.

    १.२२ लिटर द्रव मावेल इतकं घन माप; हे बथच्या अंदाजे मापानुसार मोजण्यात आलं आहे. (२रा ६:२५)—अति. ख१४ पाहा.

  • किसलेव.

    बाबेलच्या बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांच्या पवित्र कॅलेंडरचा ९ वा महिना आणि कृषी कॅलेंडरचा ३ रा महिना. हा महिना, नोव्हेंबरच्या मध्यापासून डिसेंबरच्या मध्यापर्यंत असायचा. (नहे १:१; जख ७:१)—अति. ख१५ पाहा.

  • कुष्ठरोग; कुष्ठरोगी.

    एक गंभीर त्वचारोग. शास्त्रवचनांत उल्लेख करण्यात आलेला कुष्ठरोग आजच्या कुष्ठरोगासारखा नाही; कारण तो फक्‍त माणसांनाच नाही, तर कपड्यांना आणि घरांनासुद्धा व्हायचा. हा रोग झालेल्या व्यक्‍तीला कुष्ठरोगी म्हणतात.—लेवी १४:५४, ५५; लूक ५:१२.

  • कैसर.

    एक रोमी आडनाव. पुढे ते एक पदवी म्हणून रोमी सम्राटांसाठी वापरलं जाऊ लागलं. बायबलमध्ये औगुस्त, तिबिर्य आणि क्लौद्य या तीन कैसरांची नावं देण्यात आली आहेत. बायबलमध्ये नीरोच्या नावाचा उल्लेख नसला, तरी त्यालासुद्धा कैसर म्हटलं आहे. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, राजकीय अधिकाराला किंवा सरकाराला सूचित करण्यासाठीही “कैसर” या शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे.—मार्क १२:१७; प्रेका २५:१२.

  • कोपऱ्‍याचा दगड.

    इमारतीच्या दोन भिंती जिथे एकत्र येतात तिथे भिंतींना एकमेकांशी जोडायला आणि मजबूत करायला इमारतीच्या कोनात किंवा कोपऱ्‍यात ठेवला जाणारा दगड. इमारतीच्या पायाच्या कोपऱ्‍यात ठेवलेला दगड हा मुख्य दगड असायचा; सार्वजनिक इमारतींच्या आणि शहराच्या भिंती बांधताना पायाच्या कोपऱ्‍यात ठेवण्यासाठी सहसा एक मजबूत दगड वापरला जायचा. लाक्षणिक अर्थाने, पृथ्वीचा पाया घालण्याच्या बाबतीत या शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे. ख्रिस्ती मंडळीची तुलना देवाच्या घराशी करण्यात आली आहे, आणि येशूला या मंडळीच्या “पायातला कोपऱ्‍याचा दगड” म्हटलं आहे.—इफि २:२०; ईयो ३८:६.

  • कोर.

    घन आणि द्रव माप. हे माप २२० लिटर इतकं असून बथच्या अंदाजे मापानुसार मोजण्यात आलं आहे. (१रा ५:११)—अति. ख१४ पाहा.

  • कुंभार.

    यासाठी असलेल्या हिब्रू शब्दाचा शब्दशः अर्थ “आकार देणारा” असा होतो. मातीला कोणताही आकार देण्याचा कुंभाराला अधिकार असतो. म्हणूनच, यहोवाला प्रत्येक व्यक्‍तीवर आणि राष्ट्रावर सर्वोच्च अधिकार आहे हे समजावण्यासाठी बऱ्‍याचदा कुंभाराच्या उदाहरणाचा वापर करण्यात आला आहे.—यश ६४:८; रोम ९:२१.

ख

  • खपली गहू.

    एक हलक्या प्रतीचा गहू (ट्रायटीकम स्पेल्टा ); या गव्हाला त्याच्या सालांतून वेगळं करणं कठीण असतं.—यहे ४:९.

  • खमीर.

    पीठ किंवा एखादं पेय आंबवण्यासाठी त्यात टाकला जाणारा पदार्थ; खासकरून नवीन पिठाचा गोळा आंबवण्यासाठी आधीच्या आंबवलेल्या पिठातला काही भाग. बायबलमध्ये सहसा पाप आणि भ्रष्टतेचं प्रतीक म्हणून खमीर या शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे. तसंच, उघडपणे दिसून न येणाऱ्‍या, पण मोठ्या प्रमाणात होणाऱ्‍या वाढीला सूचित करण्यासाठीही त्याचा उपयोग करण्यात आला आहे.—निर्ग १२:२०; मत्त १३:३३; गल ५:९.

  • खरा देव.

    हिब्रू शब्द हा-एलोहिम आणि हा-एल  यांचं भाषांतर “खरा देव” असं करण्यात आलं आहे. बऱ्‍याच वचनांमध्ये हे शब्द यहोवा हाच खरा देव आहे आणि बाकीचे देव खोटे आहेत यावर जोर देण्यासाठी वापरण्यात आले आहेत. या वचनांमध्ये “खरा देव”  असं जे भाषांतर करण्यात आलं आहे, ते मूळ हिब्रू शब्दांचा अर्थ अगदी स्पष्ट करतं.—उत्प ५:२२, २४; ४६:३; अनु ४:३९.

  • खळं; मळणी.

    धान्याला कणसापासून आणि टरफलांपासून वेगळं केलं जातं त्या ठिकाणाला खळं म्हणतात; आणि या कामाला मळणी म्हणतात. धान्य कमी असेल तर दांडा घेऊन मळणी केली जायची आणि धान्य जास्त असेल तर काही खास अवजारांचा वापर केला जायचा; जसं की प्राण्यांनी ओढली जाणारी मळणीची फळी किंवा मळणीची चाकं. खळं ही गोल आणि सपाट जागा असून सहसा अशा उंच ठिकाणी असायची जिथे वारा वाहतो. तिथे धान्य पसरवलं जायचं आणि त्यावरून मळणीची अवजारं फिरवली जायची.—लेवी २६:५; यश ४१:१५; मत्त ३:१२.

  • खास्द्यांचा देश; खास्दी लोक.

    सुरुवातीला हे शब्द, टायग्रीस आणि फरात नद्यांच्या मुखाजवळ असलेल्या प्रदेशासाठी आणि तिथे राहणाऱ्‍या लोकांसाठी वापरले जायचे. काही काळाने ते, संपूर्ण बाबेल देशासाठी आणि तिथल्या लोकांसाठी वापरले जाऊ लागले. विज्ञान, इतिहास, भाषा आणि खगोलशास्त्र यांचा अभ्यास करणाऱ्‍या सुशिक्षित लोकांच्या गटालाही “खास्दी लोक” असं म्हटलं जायचं; हे लोक, जादूटोणाही करायचे आणि ज्योतिषसुद्धा पाहायचे.—एज ५:१२; दान ४:७; प्रेका ७:४.

  • खोडे.

    शिक्षा द्यायला वापरलं जाणारं एक साधन; खोड्यांत अडकवलेल्या व्यक्‍तीला हालचाल करता येत नव्हती. काही खोड्यांत एखाद्याचे फक्‍त पाय अडकवले जायचे, तर इतर प्रकारच्या खोड्यांत पायांसोबतच हात आणि मानही अडकवली जायची. त्यामुळे संपूर्ण शरीर अवघडलेल्या स्थितीत राहायचं.—यिर्म २०:२; प्रेका १६:२४.

  • खोरं.

    नदी वाहायची अशी एक दरी किंवा नदीचं पात्र. पावसाळा सोडला तर इतर वेळी हे खोरं कोरडं असायचं. हिब्रू भाषेत खोरं हा शब्द ओढा किंवा नदीलाही सूचित करू शकतो. काही ओढ्यांना आणि नद्यांना झऱ्‍याचं पाणी मिळायचं आणि ते वर्षभर वाहत राहायचे.—उत्प २६:१९; गण ३४:५; अनु ८:७; १रा १८:५; ईयो ६:१५.

  • खंडणी.

    बंदिवास, शिक्षा, दुःख, पाप किंवा एखाद्या जबाबदारीतून सुटका मिळवायला दिलेली किंमत. ही किंमत नेहमी पैशांच्याच रूपात असेल असं नाही. (यश ४३:३) वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितींमध्ये खंडणी द्यावी लागायची. उदाहरणार्थ, इस्राएलमध्ये प्रत्येक कुटुंबातला पहिला जन्मलेला मुलगा किंवा प्राण्याचा पहिला जन्मलेला नर हा यहोवाच्या सेवेसाठी असायचा. पण त्या सेवेपासून सुटका मिळवायची असेल तर त्याच्यासाठी खंडणी किंवा सुटकेची किंमत द्यावी लागायची. (गण ३:४५, ४६; १८:१५, १६) तसंच, एखाद्या मारकुट्या बैलाला बांधून ठेवलं नाही आणि त्याने जर एखाद्या व्यक्‍तीचा जीव घेतला, तर बैलाच्या मालकाला मृत्युदंड दिला जावा असा नियम होता; या शिक्षेपासून सुटका मिळवायला त्या मालकाला खंडणी भरावी लागायची. (निर्ग २१:२९, ३०) मात्र जाणूनबुजून खून करणाऱ्‍याला सोडवण्यासाठी खंडणी स्वीकारली जायची नाही. (गण ३५:३१) पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ख्रिस्ताने आपल्या जीवनाचं बलिदान देऊन आज्ञाधारक मानवांची पापापासून आणि मृत्यूपासून सुटका करायला जी खंडणी दिली, त्यावर बायबल जोर देतं.—स्तो ४९:७, ८; मत्त २०:२८; इफि १:७.

  • ख्रिस्त.

    येशूला दिलेली एक पदवी. हा शब्द ख्रिस्तोस या ग्रीक शब्दावरून आला आहे. त्यासाठी असलेल्या हिब्रू शब्दाचं भाषांतर, “मसीहा,” किंवा “अभिषिक्‍त” असं करण्यात आलं आहे.—मत्त १:१६; योह १:४१.

  • ख्रिस्तविरोधी.

    या ग्रीक शब्दाचे दोन अर्थ आहेत; ख्रिस्ताच्या विरोधात  किंवा विरुद्ध असलेल्या गोष्टी. तसंच, हा शब्द खोट्या ख्रिस्ताला, म्हणजे ख्रिस्ताची जागा घेऊ पाहणाऱ्‍या व्यक्‍तीलाही सूचित करू शकतो. आपण ख्रिस्ताचे प्रतिनिधी आहोत किंवा मसीहा आहोत असा खोटा दावा करणारे, किंवा ख्रिस्ताचा व त्याच्या शिष्यांचा विरोध करणारे सर्व लोक, संघटना किंवा गट यांना ख्रिस्तविरोधी म्हणणं योग्य राहील.—१यो २:२२.

  • ख्रिस्ती.

    येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना देवाकडून मिळालेलं नाव.—प्रेका ११:२६; २६:२८.

ग

  • गहाण ठेवणं.

    कर्ज घेताना कर्ज देणाऱ्‍याकडे तारण म्हणून काहीतरी ठेवणं. देशातल्या गोरगरिबांचा आणि लाचार लोकांचा कोणी गैरफायदा घेऊ नये, म्हणून मोशेच्या नियमशास्त्रात वस्तू गहाण ठेवून घेण्याच्या बाबतीत काही नियम देण्यात आले होते.—निर्ग २२:२६; यहे १८:७.

  • गित्तीथ.

    संगीताशी संबंध असलेला एक शब्द. त्याचा नेमका अर्थ माहीत नसला, तरी असं दिसून येतं, की तो गाथ  या हिब्रू शब्दावरून आला असावा. गाथ  हे द्राक्षकुंडाला सूचित करतं. त्यामुळे काहींना असं वाटतं, की द्राक्षारस बनवताना गायल्या जाणाऱ्‍या गाण्यांची ही धून असावी.—स्तो ८१:उपरीलेखन.

  • गिलाद.

    यार्देन नदीच्या पूर्वेकडे असलेला एक सुपीक प्रदेश. हा प्रदेश, यब्बोकच्या खोऱ्‍याच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे पसरलेला होता. काही वेळा, हा शब्द यार्देन नदीच्या पूर्वेकडे असलेल्या इस्राएलच्या संपूर्ण प्रदेशासाठी, म्हणजे रऊबेन व गादच्या वंशाचे आणि मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाचे लोक जिथे राहायचे त्या प्रदेशासाठी वापरण्यात आला आहे. (गण ३२:१; यहो १२:२; २रा १०:३३)—अति. ख४ पाहा.

  • गेरा.

    एक प्रकारचं माप. ते ०.५७ ग्रॅम इतकं होतं. २० गेरे म्हणजे एक शेकेल. (लेवी २७:२५)—अति. ख१४ पाहा.

  • गेहेन्‍ना.

    प्राचीन यरुशलेमच्या दक्षिणेला आणि दक्षिण-पश्‍चिमेला असलेल्या ‘हिन्‍नोम खोऱ्‍याचं’ ग्रीक नाव. (यिर्म ७:३१) या ठिकाणी माणसांची प्रेतं टाकून दिली जातील असं भविष्यवाण्यांमध्ये सांगितलं होतं. (यिर्म ७:३२; १९:६) अनेकांना वाटतं, की गेहेन्‍ना हे असं एक अदृश्‍य ठिकाण आहे जिथे मेलेल्या व्यक्‍तीला कायम यातना देण्यासाठी खरोखरच्या आगीत टाकलं जातं. पण, गेहेन्‍नामध्ये प्राण्यांना किंवा माणसांना जिवंत जाळलं जायचं किंवा यातना दिल्या जायच्या याचा कोणताही पुरावा नाही. म्हणूनच, गेहेन्‍ना हे कायम यातना देण्यासाठी असलेल्या आगीच्या ठिकाणाला सूचित करत नाही. याउलट, येशूने आणि त्याच्या शिष्यांनी जेव्हा गेहेन्‍नाचा उल्लेख केला, तेव्हा त्यांनी तो ‘दुसऱ्‍या मृत्यूला,’ म्हणजे कायमच्या नाशाला सूचित करण्यासाठी केला.—प्रक २०:१४; मत्त ५:२२; १०:२८.

  • गोणपाट.

    धान्याची पोती किंवा पिशव्या बनवण्यासाठी वापरलं जाणारं जाड, खरबरीत कापड. सहसा हे कापड बकरीच्या गडद रंगाच्या केसांपासून विणलं जायचं आणि शोक करताना ते घातलं जायचं.—उत्प ३७:३४; लूक १०:१३.

  • गोफण.

    चामड्याचा पट्टा किंवा प्राण्यांच्या स्नायूंपासून, केसांपासून किंवा लांब गवतापासून विणलेला पट्टा. त्याचा मधला भाग रुंद असून त्यात भिरकावून मारण्यासाठी एखादी वस्तू, म्हणजे सहसा दगड ठेवला जायचा. गोफणीचं एक टोक हाताला किंवा मनगटाला बांधलं जायचं, तर दुसरं टोक हातात धरलं जायचं आणि गोफण गोल फिरवून ते टोक सोडलं जायचं. प्राचीन राष्ट्रांतले लोक आपल्या सैन्यात गोफण चालवणाऱ्‍यांना ठेवायचे.—शास २०:१६; १शमु १७:५०.

  • गोमेद.

    काळा, तपकिरी, लाल, राखाडी किंवा हिरवा अशा वेगवेगळ्या रंगांत सापडणारा आणि मधे-मधे पांढऱ्‍या रंगाचे पातळ थर असलेला एक मौल्यवान रत्न. महायाजकाच्या खास वस्त्रांना लावण्यासाठी गोमेद वापरलं जायचं.—निर्ग २८:९, १२; १इत २९:२; ईयो २८:१६.

  • गंधरस.

    कोमीफोरा प्रजातीच्या काटेरी झुडपांपासून किंवा लहान झाडांपासून मिळणारा एक सुगंधी डिंक. अभिषेक करण्यासाठी असलेलं पवित्र तेल तयार करायला इतर पदार्थांसोबत गंधरससुद्धा वापरला जायचा. कपडे किंवा अंथरूण सुगंधित करायला, मालीश करायचं तेल बनवायला आणि इतर सौंदर्यप्रसाधनं तयार करायला याचा उपयोग केला जायचा. दफनविधीच्या आधी मृतदेहाला लावण्यासाठीही गंधरस वापरला जायचा.—निर्ग ३०:२३; नीत ७:१७; योह १९:३९.

  • गुंडाळी.

    चर्मपत्र किंवा पपायरस गवतापासून तयार केलेला लांब कागद. त्याच्या एका बाजूला लिहिलेलं असायचं आणि तो एका छोट्या काठीवर गुंडाळला जायचा. शास्त्रवचनं ही गुंडाळ्यांवर लिहिण्यात आली होती आणि त्यांच्या प्रतीसुद्धा गुंडाळ्यांवरच तयार केल्या जायच्या. बायबलच्या काळात पुस्तकं गुंडाळ्यांच्या रूपात असायची.—यिर्म ३६:४, १८, २३; लूक ४:१७-२०; २ती ४:१३.

  • ग्रीक.

    ग्रीस देशात बोलली जाणारी भाषा; तसंच, ग्रीसचा मूळ रहिवासी किंवा असा माणूस ज्याचं कुटुंब मुळात ग्रीसचं आहे. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत हा शब्द, यहुदी नसलेल्या लोकांना किंवा ज्यांच्यावर ग्रीक भाषेचा व संस्कृतीचा प्रभाव पडला आहे अशा सगळ्या लोकांना सूचित करतो.—योए ३:६; योह १२:२०.

च

  • चढणीचं गीत.

    स्तोत्रं १२० ते १३४ या अध्यायांमधलं उपरीलेखन. या वाक्यांशाच्या अर्थाबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत. असं असलं तरी बरेच लोक मानतात, की इस्राएली लोक जेव्हा त्यांचे तीन मोठे वार्षिक सण साजरे करायला यहूदाचे डोंगर चढून यरुशलेमला जायचे, तेव्हा ते ही १५ स्तोत्रं गायचे.

  • चमत्कार; अद्‌भुत कार्यं.

    मानवी शक्‍तीच्या पलीकडे असलेली कार्यं किंवा घटना. यांसाठी एखादी अलौकिक शक्‍ती जबाबदार असल्याचं मानलं जातं. याच शब्दांसाठी “चिन्हं” हा समानार्थी शब्दही काही ठिकाणी वापरण्यात आला आहे.—निर्ग ४:२१; प्रेका ४:२२; इब्री २:४.

  • चर्मपत्र.

    मेंढी, बकरी किंवा वासराच्या कातडीवर प्रक्रिया करून बनवलेलं लिहिण्याचं साहित्य. ही चर्मपत्रं पपायरसपेक्षा जास्त टिकाऊ असून बायबलच्या गुंडाळ्या म्हणून वापरली जायची. पौलने तीमथ्यला जी चर्मपत्रं आणायला सांगितली होती, ती कदाचित हिब्रू शास्त्रातल्या काही पुस्तकांची असावीत. मृत समुद्राच्या गुंडाळ्यांपैकी काही गुंडाळ्या चर्मपत्रांच्या होत्या.—२ती ४:१३.

  • चिठ्ठ्या टाकणं.

    पूर्वीच्या काळी, निर्णय घेण्यासाठी छोटे-छोटे दगड किंवा लाकडाचे तुकडे वापरले जायचे. ते एखाद्या कापडात किंवा भांड्यात टाकून हालवले जायचे. आणि जो तुकडा बाहेर पडायचा किंवा काढला जायचा तो निवडला जायचा. हे सहसा प्रार्थना करून केलं जायचं. मूळ भाषेत चिठ्ठ्या टाकण्यासाठी जो शब्द वापरण्यात आला आहे त्याचा अर्थ ‘हिस्सा’ किंवा ‘वाटा’ असाही होतो.—यहो १४:२; स्तो १६:५; नीत १६:३३; मत्त २७:३५.

  • चिन्ह.

    एखादी अशी वस्तू, कार्य, परिस्थिती किंवा असं एखादं अद्‌भुत दृश्‍य जे सध्याच्या किंवा भविष्यातल्या दुसऱ्‍या एखाद्या गोष्टीला सूचित करतं.—उत्प ९:१२, १३; २रा २०:९; मत्त २४:३; प्रक १:१.

  • चिमटे.

    सोन्याचं एक साधन. हे कदाचित सांडशीसारखं असावं. त्याचा वापर उपासना मंडपात आणि यरुशलेमच्या मंदिरात दिवे विझवायला केला जायचा.—निर्ग ३७:२३.

  • चांगल्यावाइटाचं ज्ञान देणारं झाड.

    एदेन बागेतलं एक झाड; मानवजातीसाठी ‘चांगल्यावाइटाचे’ स्तर ठरवायचा अधिकार फक्‍त देवाला आहे या गोष्टीला हे सूचित करतं.—उत्प २:९, १७.

ज

  • जगाची(च्या) व्यवस्था.

    यासाठी असलेला ग्रीक शब्द एयोन आहे. विशिष्ट काळातली चालू परिस्थिती किंवा त्या काळाची काही खास वैशिष्ट्यं, जी त्या काळाला किंवा युगाला इतर काळांपेक्षा किंवा युगांपेक्षा वेगळं दाखवतात. बायबलमध्ये ‘सध्याच्या जगाची व्यवस्था’ असा वाक्यांश आढळतो. हा वाक्यांश सध्या चालू असलेल्या जगातल्या कारभारांना आणि जगातल्या लोकांच्या जीवनशैलीला सूचित करतो. (२ती ४:१०) देवाने नियमशास्त्राचा करार करून एका व्यवस्थेची स्थापना केली होती. या व्यवस्थेला काही जण इस्राएली लोकांचा किंवा यहुद्यांचा काळ असं म्हणतात. नंतर देवाने, येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाद्वारे एक वेगळी व्यवस्था सुरू केली. ही व्यवस्था खासकरून अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीशी संबंधित होती. तेव्हापासून एका नव्या काळाची सुरुवात झाली. नियमशास्त्राच्या करारात सांगितलेल्या गोष्टी ज्या गोष्टींना चित्रित करायच्या, त्या या व्यवस्थेत पूर्ण होऊ लागल्या. अनेकवचनी रूपात हा वाक्यांश, होऊन गेलेल्या किंवा भविष्यात अस्तित्वात येणार असलेल्या वेगवेगळ्या व्यवस्थांना किंवा परिस्थितींना सूचित करतो.—मत्त २४:३; मार्क ४:१९; रोम १२:२; १कर १०:११.

  • जगाच्या व्यवस्थेची समाप्ती.

    सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या या जगाच्या व्यवस्थेचा अंत होण्याआधीचा काळ. हा काळ आणि ख्रिस्ताची उपस्थिती, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडतात. येशूच्या नेतृत्वाखाली, स्वर्गदूत “दुष्टांना नीतिमानांपासून वेगळं” करून त्यांचा नाश करतील. (मत्त १३:४०-४२, ४९) ही “समाप्ती” केव्हा होईल हे जाणून घ्यायला येशूचे शिष्य उत्सुक होते. (मत्त २४:३) येशूने स्वर्गात जाण्याआधी आपल्या शिष्यांना वचन दिलं होतं, की त्या काळापर्यंत तो त्यांच्यासोबत असेल.—मत्त २८:२०.

  • जटामांसी.

    जटामांसी (नार्डोस्टॅकिस जटामानसी ) वनस्पतीपासून मिळणारं फिक्कट लाल रंगाचं मौल्यवान सुगंधी तेल. हे तेल खूप महाग असल्यामुळे सहसा त्यात इतर हलक्या दर्जाचं तेल मिसळलं जायचं आणि कधीकधी बनावट तेलसुद्धा जटामांसी म्हणून विकलं जायचं. लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे येशूसाठी ‘शुद्ध जटामांसीचं’ तेल वापरण्यात आलं असा खास उल्लेख मार्क आणि योहान या दोघांनीही केला.—मार्क १४:३; योह १२:३.

  • जात्याचा दगड.

    धान्य दळायला वापरलं जाणारं दगडी साधन. बायबलच्या काळात बहुतेक घरांत स्त्रिया धान्य दळण्यासाठी जातं वापरायच्या. कुटुंबाची दररोजची भाकर जात्यावरच अवलंबून असल्यामुळे मोशेच्या नियमशास्त्रात एखाद्याच्या घरातून जातं जप्त करायला किंवा जात्याचा वरचा दगड गहाण ठेवून घ्यायला मनाई होती. लहान जात्यांसारखीच मोठी जातीसुद्धा वापरली जायची, पण त्यांत जात्याचा दगड फिरवण्यासाठी एखाद्या प्राण्याचा वापर केला जायचा.—अनु २४:६; मार्क ९:४२.

  • जारकर्म.—

    अनैतिक लैंगिक कृत्यं पाहा.

  • जिव.

    यहुद्यांच्या पवित्र कॅलेंडरमधल्या दुसऱ्‍या महिन्याचं आणि कृषी कॅलेंडरमधल्या आठव्या महिन्याचं जुनं नाव. हा महिना एप्रिल महिन्याच्या मध्यापासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत असायचा. बाबेलच्या बंदिवासानंतर या महिन्याला यहुदी तालमूदमध्ये आणि इतर लिखाणांत इय्यार असं नाव देण्यात आलं. (१रा ६:३७)—अति. ख१५ पाहा.

  • जीवनाचं झाड.

    एदेन बागेतलं एक झाड. त्याच्या फळांमध्ये काही खास जीवनदायक गुणधर्म होते, असं काहीही बायबलमध्ये सांगितलेलं नाही. उलट, ते झाड या गोष्टीचं प्रतीक होतं, की देव ज्या कोणाला त्या झाडाचं फळ खाऊ देईल त्याला तो खातरीने सर्वकाळाचं जीवन देईल.—उत्प २:९; ३:२२.

  • जीव.

    नीफेश  या हिब्रू शब्दाचं आणि सायखी  या ग्रीक शब्दाचं भाषांतर. बायबलमध्ये या शब्दांचा ज्या प्रकारे वापर करण्यात आला आहे त्याचं परीक्षण केल्यावर असं दिसून येतं, की ते मुळात पुढे दिलेल्या गोष्टींना सूचित करतात: (१) लोक, (२) प्राणी, किंवा (३) एखाद्या व्यक्‍तीचं किंवा प्राण्याचं जीवन. (उत्प १:२०; २:७; १पेत्र ३:२०, तळटीपसुद्धा पाहा.) बायबलमध्ये जेव्हा पृथ्वीवर असलेल्या प्राण्यांच्या बाबतीत नीफेश  आणि सायखी  या शब्दांचा वापर होतो, तेव्हा ते प्राणी शारीरिक, स्पर्श करता येणारे, डोळ्यांना दिसणारे आणि मरण पावणारे आहेत असं सूचित होतं. या भाषांतरात मूळ भाषेतल्या या दोन्ही शब्दांचं भाषांतर, प्रत्येक ठिकाणी मागचा-पुढचा संदर्भ लक्षात घेऊन करण्यात आलं आहे. त्यांसाठी “जीवन,” “प्राणी,” “व्यक्‍ती,” “संपूर्ण व्यक्‍तिमत्त्व,” किंवा फक्‍त एक सर्वनाम (उदाहरणार्थ, “माझा जीव” यासाठी “मी”) वापरण्यात आलं आहे. बहुतेक ठिकाणी, एखाद्या शब्दाचं भाषांतर “जीव” असंही केलं जाऊ शकतं हे दाखवण्यासाठी तळटीप देण्यात आली आहे. मुख्य मजकुरात किंवा तळटिपांमध्ये जिथे-जिथे “जीव” हा शब्द आला आहे, तिथे-तिथे वर दिलेल्या स्पष्टीकरणाप्रमाणे त्याचा अर्थ घेतला जावा. पूर्ण जिवाने एखादी गोष्ट करणं असा उल्लेख जिथे आढळतो तिथे संपूर्ण शक्‍तीने, मनापासून किंवा जीव ओतून एखादी गोष्ट करणं असा अर्थ सूचित होतो. (अनु ६:५; मत्त २२:३७) काही ठिकाणी, मूळ भाषेतले हे शब्द एखाद्या व्यक्‍तीची किंवा प्राण्याची इच्छा किंवा भूक सूचित करण्यासाठीही वापरण्यात आले आहेत. तसंच, एखाद्या मृत व्यक्‍तीसाठी किंवा मृतदेहासाठीही ते वापरले आहेत.—गण ६:६; नीत २३:२; यश ५६:११; हाग २:१३.

  • जू; जोखड.

    खांद्यांवर वाहून नेण्याचा एक ओंडका. त्याच्या दोन्ही टोकांना वजनदार वस्तू लटकवून त्या वाहून नेल्या जायच्या. तसंच, नांगर किंवा गाडी ओढण्यासाठी, ओझी वाहणाऱ्‍या दोन प्राण्यांच्या (सहसा गुराढोरांच्या) मानेवर ठेवला जाणारा ओंडका किंवा लाकडी दांड्यालाही जू म्हणतात. ओझी वाहायला सहसा गुलाम किंवा दास अशा जुवांचा वापर करायचे. म्हणून लाक्षणिक अर्थाने दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या अधिकाराखाली असणं किंवा अधीन असणं याला सूचित करायला तसंच, अत्याचार आणि छळ यांना सूचित करायलाही जुवाच्या उदाहरणाचा वापर केला जायचा. जू काढून किंवा मोडून टाकणं हे गुलामीतून, जाच-जुलमातून आणि अत्याचारापासून मुक्‍त होण्याला सूचित करायचं.—लेवी २६:१३; मत्त ११:२९, ३०.

  • ज्योतिषी.

    भविष्यात काय घडेल हे सांगण्यासाठी सूर्य, चंद्र आणि तारे यांच्या हालचालींचा अभ्यास करणारी व्यक्‍ती.—दान २:२७; मत्त २:१.

झ

  • झ्यूस.

    अनेक दैवतांची उपासना करणाऱ्‍या ग्रीक लोकांचा सर्वात श्रेष्ठ देव. बर्णबा हा झ्यूस आहे असा लुस्त्रमधल्या लोकांचा गैरसमज झाला होता. लुस्त्र शहराजवळ सापडलेल्या प्राचीन कोरीव लिखाणांत “झ्यूसचे पुजारी” आणि “सूर्यदैवत झ्यूस” असे उल्लेख आढळतात. पौलने मिलिताहून ज्या जहाजाने प्रवास केला त्याच्या समोरच्या बाजूला “झ्यूसच्या मुलांचं” म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोन जुळ्या भावांचं चिन्ह होतं.—प्रेका १४:१२; २८:११.

ट

  • टेकडी.

    हिब्रू भाषेत याला “मिल्लो,” असं म्हटलं आहे; त्याचा मूळ अर्थ “भर घालणं” असा होतो. सेप्टुअजिंटमध्ये याचं भाषांतर “किल्ला” असं करण्यात आलं आहे. यावरून असं दिसतं, की ही दावीदपुरातली एक भौगोलिक जागा किंवा इमारत असावी. पण ते नेमकं काय होतं हे कोणालाही माहीत नाही.—२शमु ५:९; १रा ११:२७.

  • टोळ.

    सहसा मोठ्या घोळक्यांमधून स्थलांतर करणारे वेगवेगळ्या जातींचे नाकतोडे. मोशेच्या नियमशास्त्रानुसार ते खाण्यासाठी शुद्ध मानले जायचे. आपल्या मार्गात असलेलं सगळं काही खाऊन टाकणारे टोळांचे मोठमोठे घोळके मोठ्या प्रमाणात नासधूस करायचे आणि टोळांची धाड पडणं हे एक संकट समजलं जायचं.—निर्ग १०:१४; मत्त ३:४.

ड

  • ड्राख्मा.

    ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत हा शब्द, चांदीच्या ग्रीक नाण्याला सूचित करतो. याचं वजन त्या काळात ३.४ ग्रॅम इतकं असायचं. हिब्रू शास्त्रवचनांत पर्शियन काळातल्या सोन्याच्या ड्राख्माचा उल्लेख आढळतो. त्याचं मूल्य डॅरिकइतकं होतं. (नहे ७:७०; मत्त १७:२४)—अति. ख१४ पाहा.

त

  • तज.

    तज (सिन्‍नामोमम केसिया ) किंवा एक प्रकारच्या दालचिनीच्या झाडापासून मिळणारी वस्तू. तज हे एक सुगंधी अत्तर म्हणून वापरलं जायचं. तसंच, अभिषेकाचं पवित्र तेल तयार करायलाही याचा वापर केला जायचा.—निर्ग ३०:२४; स्तो ४५:८; यहे २७:१९.

  • तम्मूज.

    (१) एका दैवताचं नाव; या दैवतासाठी यरुशलेममधल्या धर्मत्यागी स्त्रिया रडल्या होत्या. असं म्हटलं जातं, की तम्मूज हा आधी राजा होता आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याला देव मानलं गेलं. सुमेरी लोकांच्या लिखाणांत तम्मूजला दुमूझी म्हटलं असून, तो प्रजननाची देवी इनान्‍ना (बाबेलची इश्‍तार) हिचा नवरा किंवा प्रियकर आहे असं सांगितलं आहे. (यहे ८:१४) (२) बाबेलच्या बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांच्या पवित्र कॅलेंडरचा चौथा महिना आणि कृषी कॅलेंडरचा दहावा महिना. हा महिना, जूनच्या मध्यापासून जुलैच्या मध्यापर्यंत असायचा.—अति. ख१५ पाहा.

  • तयारीचा दिवस.

    शब्बाथाच्या आदल्या दिवसाचं नाव. त्या दिवशी यहुदी लोक शब्बाथासाठी आवश्‍यक ती तयारी करायचे. आपण आज ज्याला शुक्रवार असं म्हणतो, त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी हा तयारीचा दिवस संपायचा आणि शब्बाथ सुरू व्हायचा. यहुद्यांचा दिवस हा एका संध्याकाळपासून दुसऱ्‍या संध्याकाळपर्यंत असायचा.—मार्क १५:४२; लूक २३:५४.

  • तार्तारस.

    ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, हा शब्द नोहाच्या काळात देवाची आज्ञा मोडणाऱ्‍या स्वर्गदूतांच्या स्थितीला सूचित करतो; तुरुंगात टाकल्यावर एखाद्याची जशी हीन स्थिती होते, तशा स्थितीत हे स्वर्गदूत आहेत. २ पेत्र २:४ यात तार्तारू  (“तार्तारसमध्ये टाकणं”) हे क्रियापद वापरण्यात आलं आहे. पण त्यावरून हे सूचित होत नाही, की पाप केलेल्या स्वर्गदूतांना मूर्तिपूजक धर्मांच्या दंतकथांमधल्या तार्तारसमध्ये (जमिनीखालचा तुरुंग आणि अंधकारमय ठिकाण जिथे कमी दर्जाच्या देवांना कैद करून टाकलं जायचं) टाकण्यात आलं. तर, त्यावरून असं सूचित होतं, की देवाने या स्वर्गदूतांकडून त्यांचं स्वर्गात असलेलं स्थान आणि अधिकार काढून घेतले आणि त्यांना खालच्या स्थितीला आणलं. तसंच, देवाने त्यांना अशा घोर अंधकाराच्या स्थितीत टाकलं आहे, ज्यामुळे ते देवाचा तेजस्वी आणि महान संकल्प समजू शकत नाहीत. तसंच त्यांचं भविष्यसुद्धा अंधकारात आहे. कारण बायबलमध्ये सांगितलं आहे, की त्यांचा शासक दियाबल सैतान याच्यासोबत त्यांचासुद्धा कायमचा नाश केला जाईल. म्हणूनच, तार्तारस त्या बंडखोर स्वर्गदूतांच्या अतिशय हीन आणि खालच्या स्थितीला सूचित करतं. तार्तारस हे प्रकटीकरण २०:१-३ यात उल्लेख केलेल्या ‘अथांग डोहापेक्षा’ वेगळं आहे.

  • तार्शीशची जहाजं.

    सुरुवातीला हे शब्द प्राचीन तार्शीश देशाला (आजचा स्पेन देश) जाणाऱ्‍या जहाजांसाठी वापरले जायचे. पण असं दिसतं, की नंतर हे शब्द लांबचा प्रवास करू शकणाऱ्‍या मोठमोठ्या जहाजांसाठी वापरले जाऊ लागले. शलमोन राजा आणि यहोशाफाट राजा यांनी व्यापारासाठी या जहाजांचा वापर केला.—१रा ९:२६; १०:२२; २२:४८.

  • तालान्त.

    इब्री लोक वापरत असलेलं चलनाचं किंवा वजनाचं सर्वात मोठं प्रमाण. एक तालान्ताचं वजन ३४.२ किलो इतकं असायचं. ग्रीक लोकांचं तालान्त लहान होतं, त्याचं वजन सुमारे २०.४ किलो इतकं होतं. (१इत २२:१४; मत्त १८:२४)—अति. ख१४ पाहा.

  • तिशरी.—

    एथानीम आणि अति. ख१५ पाहा.

  • तेबेथ.

    बाबेलच्या बंदिवासातून सुटका झाल्यावर यहुद्यांच्या पवित्र कॅलेंडरमधला दहावा महिना आणि कृषी कॅलेंडरमधला चौथा महिना. हा महिना डिसेंबरच्या मध्यापासून जानेवारीच्या मध्यापर्यंत असायचा. बायबलमध्ये सहसा याला ‘दहावा महिना’ म्हटलं गेलं आहे. (एस्ते २:१६)—अति. ख१५ पाहा.

  • तेराफीम मूर्ती.

    घराण्याचं कुलदैवत किंवा मूर्ती; त्यांच्याकडे शकुन विचारले जायचे. (यहे २१:२१) काही मूर्ती माणसाच्या उंचीच्या आणि आकाराच्या असायच्या, तर काही फार छोट्या असायच्या. (उत्प ३१:३४; १शमु १९:१३, १६) मेसोपटेम्या इथे पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असं दिसून आलं, की ज्याच्याकडे तेराफीम मूर्ती असायची त्याला कुटुंबाचा वारसा मिळायचा. (राहेलने आपल्या वडिलांची तेराफीम मूर्ती का घेतली असावी हे यावरून कळतं.) इस्राएलमध्ये मात्र ही पद्धत नव्हती. पण न्यायाधीशांच्या आणि राजांच्या काळात मूर्तिपूजेसाठी तेराफीम मूर्तींचा वापर केला जायचा. देवाला विश्‍वासू असणाऱ्‍या योशीया राजाने ज्या-ज्या गोष्टींचा नाश केला त्यात तेराफीम मूर्तीही होत्या.—शास १७:५; २रा २३:२४; होशे ३:४.

द

  • दकापलीस.

    ग्रीक शहरांचा एक समूह; हा समूह सुरुवातीला दहा शहरांनी मिळून बनला होता (ग्रीक भाषेत देका  म्हणजे “दहा” आणि पलीस  म्हणजे “शहर”). यांपैकी बरीचशी शहरं गालील समुद्र आणि यार्देन नदीच्या पूर्वेकडच्या प्रदेशात असल्यामुळे या प्रदेशालाही याच नावाने ओळखलं जायचं. ही शहरं, ग्रीक संस्कृतीची आणि व्यापाराची केंद्रं होती. येशू या प्रदेशातून गेला असला, तरी तिथल्या कोणत्याही शहराला त्याने भेट दिल्याचा अहवाल नाही. (मत्त ४:२५; मार्क ५:२०)—अति. क७ आणि ख१० पाहा.

  • दशांश (दहावा भाग).

    दान किंवा नजराणा म्हणून, विशेषतः उपासनेशी संबंधित असलेल्या कामांसाठी दिला जाणारा दहावा भाग. (मला ३:१०; अनु २६:१२; मत्त २३:२३) मोशेच्या नियमशास्त्रानुसार, जमिनीतून मिळणाऱ्‍या पिकातला आणि गुराढोरांच्या कळपांतला दहावा भाग दरवर्षी लेव्यांच्या गरजा भागवण्यासाठी दिला जायचा. आणि लेवी या दहाव्या भागातला दहावा भाग अहरोनच्या कुटुंबाच्या याजकांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी द्यायचे. इस्राएली लोकांना इतर प्रकारचे दशांशही द्यावे लागायचे. ख्रिश्‍चनांना मात्र दशांश द्यायची गरज नाही.

  • दागोन.

    पलिष्टी लोकांचं एक दैवत. त्याला हे नाव कशावरून पडलं ते माहीत नाही, पण काही विद्वान असं मानतात की या नावाचा संबंध दाघ (मासा) या हिब्रू शब्दाशी असावा.—शास १६:२३; १शमु ५:४.

  • दारिक.

    सोन्याचं एक पर्शियन नाणं. याचं वजन ८.४ ग्रॅम होतं. (१इत २९:७)—अति. ख१४ पाहा.

  • दावीदचा मुलगा.

    सहसा येशूला सूचित करण्यासाठी वापरलेले शब्द. तो ‘राज्याच्या कराराचा’ वारस आहे या गोष्टीवर हे शब्द जोर देतात. दावीदच्या वंशातून येणारा एक राजा या कराराची भविष्यवाणी पूर्ण करेल असं सांगण्यात आलं होतं.—मत्त १२:२३; २१:९.

  • दावीदपूर.

    यबूस शहराला दिलेलं नाव. दावीदने ते शहर काबीज केलं आणि तिथे आपला राजमहाल बांधला तेव्हा त्या शहराला हे नाव देण्यात आलं. त्याला सीयोन असंही म्हटलं आहे. तो यरुशलेमचा दक्षिण-पूर्व भाग असून यरुशलेमचा सगळ्यात जुना भाग आहे.—२शमु ५:७; १इत ११:४, ५.

  • दिनार.

    सुमारे ३.८५ ग्रॅम वजनाचं चांदीचं एक रोमी नाणं. याच्या एका बाजूला कैसराचं चित्र होतं. दिनार ही मजुराची एक दिवसाची मजुरी होती. तसंच, रोमी लोक यहुद्यांकडून जे कराचं नाणं वसूल करायचे तेसुद्धा दिनारच होतं. (मत्त २२:१७; लूक २०:२४)—अति. ख१४ पाहा.

  • दियाबल.

    ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, सैतानाला दिलेलं एक नाव. याचा अर्थ “निंदा करणारा” असा होतो. सैतान हा यहोवाची, त्याच्या विश्‍वसनीय अभिवचनांची आणि त्याच्या पवित्र नावाची निंदा करणाऱ्‍यांपैकी सर्वात मुख्य असल्यामुळे त्याला दियाबल असं नाव देण्यात आलं.—मत्त ४:१; योह ८:४४ तळटिपा; प्रक १२:९.

  • दिराचं कर्तव्य.

    एक प्रथा. या प्रथेनुसार, एखादा माणूस जर मूलबाळ न होता मेला तर त्याचा वंश पुढे चालवायला त्याचा भाऊ त्याच्या विधवा बायकोशी लग्न करायचा. या प्रथेला दिराचं कर्तव्य म्हटलं जायचं. पुढे मोशेच्या नियमशास्त्रातही या प्रथेचा समावेश करण्यात आला.—उत्प ३८:८; अनु २५:५.

  • दुष्ट.

    देवाचा आणि त्याच्या नीतिमान स्तरांचा विरोध करणाऱ्‍या दियाबल सैतानासाठी वापरलेली एक उपाधी.—मत्त ६:१३; १यो ५:१९.

  • दुष्ट स्वर्गदूत.

    माणसांपेक्षा जास्त शक्‍तिशाली असलेले आणि अदृश्‍य असलेले दुष्ट प्राणी. उत्पत्ती ६:२ मध्ये त्यांना ‘खऱ्‍या देवाचे पुत्र’, आणि यहूदा ६ मध्ये “स्वर्गदूत” असं म्हटलं आहे. देवाने त्यांना मुळात दुष्ट बनवलं नव्हतं. पण, नोहाच्या दिवसांत त्यांनी यहोवाची आज्ञा मोडली आणि त्याच्याविरुद्ध बंड करण्यात सैतानाला साथ देऊन स्वतःला देवाचे शत्रू बनवलं.—यहू ६; अनु ३२:१७; लूक ८:३०; प्रेका १६:१६; याक २:१९.

  • देखरेख करणारा.

    मंडळीकडे लक्ष द्यायची आणि मेंढपाळासारखं मंडळीला सांभाळायची प्रमुख जबाबदारी असलेला बांधव. यासाठी असलेला ग्रीक शब्द एपिस्कोपोस  यातून प्रामुख्याने ‘संरक्षण करण्यासाठी लक्ष ठेवणं’ हा अर्थ सूचित होतो. ख्रिस्ती मंडळीत, “देखरेख करणारा” आणि “वडील” (प्रेस्बीटेरोस ) हे शब्द एकाच पदाला सूचित करतात. “वडील” हा शब्द खासकरून या पदासाठी नियुक्‍त केल्या जाणाऱ्‍या बांधवाच्या अशा ख्रिस्ती गुणांकडे लक्ष वेधतो, ज्यावरून तो प्रौढ ख्रिस्ती असल्याचं दिसून येतं. तसंच, “देखरेख करणारा” हा शब्द या पदावर नियुक्‍त झाल्यावर त्याला कोणत्या जबाबदाऱ्‍या पार पाडाव्या लागतात यावर जोर देतो.—प्रेका २०:२८; १ती ३:२-७; १पेत्र ५:२.

  • देवाची भक्‍ती.

    यहोवा देवाच्या सर्वोच्च अधिकारपदाला एकनिष्ठ राहून देवाचा आदर, उपासना व सेवा करणं.—१ती ४:८; २ती ३:१२.

  • देवाचं राज्य.

    हे शब्द, खासकरून देवाच्या सर्वोच्च अधिकारपदाचं प्रतिनिधित्व करणाऱ्‍या त्याच्या मुलाच्या, म्हणजे ख्रिस्त येशूच्या शाही सरकाराला सूचित करतात.—मत्त १२:२८; लूक ४:४३; १कर १५:५०.

  • दोषार्पण.

    स्वतःच्या पापांसाठी दिलं जाणारं अर्पण. हे अर्पण बाकीच्या पापार्पणांपेक्षा थोडं वेगळं असायचं. कारण, पश्‍चात्ताप करणारा माणूस दोषार्पण देऊन कबूल करायचा, की त्याने देवाविरुद्ध पाप केलं आहे किंवा एखाद्याला कराराप्रमाणे मिळणारे हक्क मिळू दिलेले नाहीत. तसंच, आपल्या पापामुळे गमावलेले हक्क आपल्याला परत मिळावेत आणि आपल्याला शिक्षा होऊ नये, म्हणूनही तो दोषार्पण द्यायचा.—लेवी ७:३७; १९:२२; यश ५३:१०.

  • द्रष्टा.

    देवाच्या मदतीने त्याची इच्छा समजून घेणारा माणूस. माणसांना ज्या गोष्टी समजत नाहीत त्या समजून घ्यायला किंवा पाहायला देव त्याचे डोळे उघडायचा. द्रष्टासाठी असलेला हिब्रू शब्द ज्या शब्दापासून आला आहे, त्याचा अर्थ “पाहणं” असा होतो; हे पाहणं शब्दशः किंवा लाक्षणिक अर्थाने असू शकतं. बायबल काळात, एखादी समस्या सोडवण्यासाठी लोक द्रष्ट्याकडे सल्ला घ्यायला जायचे.—१शमु ९:९.

  • द्राक्षकुंड.

    चुन्याच्या खडकांपासून बनवलेले दोन हौद (टाक्या). एक हौद थोड्या उंचावर असायचा आणि त्याला एका छोट्या वाहिनीने दुसऱ्‍या हौदाशी जोडलं जायचं. वरच्या हौदात द्राक्षं तुडवली जायची तेव्हा त्यांचा रस खालच्या हौदात वाहायचा. देवाच्या न्यायदंडाला सूचित करण्यासाठी लाक्षणिक अर्थानेही या शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे.—यश ५:२; प्रक १९:१५.

ध

  • धर्मत्याग.

    यासाठी असलेला ग्रीक शब्द (अपॉस्टेशिया ) “दूर उभं राहणं” असा शब्दशः अर्थ असलेल्या क्रियापदावरून आला आहे. या शब्दाचा अर्थ, “सोडून देणं, त्याग करणं किंवा बंड करणं,” असा होतो. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, “धर्मत्याग” हा शब्द खऱ्‍या उपासनेपासून दूर जाणाऱ्‍यांच्या बाबतीत वापरण्यात आला आहे.—प्रेका २१:२१; २थेस २:३.

  • धूप जाळण्याची पात्रं.

    धूप जाळण्यासाठी, तसंच बलिदानाच्या वेदीवरून कोळसा आणि सोन्याच्या दीपवृक्षावरून जळालेल्या वाती काढण्यासाठी उपासना मंडपात आणि मंदिरात वापरली जात असलेली सोन्याची, चांदीची किंवा तांब्याची भांडी.—निर्ग ३७:२३; २इत २६:१९; इब्री ९:४.

  • धूप.

    हळूहळू जळत राहणारं आणि सर्वत्र सुगंध पसरवणारं सुवासिक डिंकाचं आणि एका वनस्पतीतल्या सुगंधी द्रव्यांचं मिश्रण. उपासना मंडपात आणि मंदिरात वापरण्याकरता चार घटकांपासून एक खास प्रकारचा धूप तयार केला जायचा. तो रोज सकाळी आणि रात्री पवित्र स्थानाच्या धूपवेदीवर आणि प्रायश्‍चित्ताच्या दिवशी परमपवित्र स्थानात जाळला जायचा. लाक्षणिक अर्थाने, धूप हा देवाच्या विश्‍वासू सेवकांच्या स्वीकारयोग्य प्रार्थनांना सूचित करतो. ख्रिस्ती उपासनेत धूप जाळणं आवश्‍यक नव्हतं.—निर्ग ३०:३४, ३५; लेवी १६:१३; प्रक ५:८.

न

  • नथीनीम.

    मंदिरात काम करणारे सेवक. हे मूळचे इस्राएली नव्हते. नथीनीम या हिब्रू शब्दाचा शब्दशः अर्थ “दिलेले लोक” असा होतो. यावरून दिसतं की नथीनीम हे मंदिराच्या सेवेसाठी दिलेले लोक होते. बरेच नथीनीम गिबोनी लोकांचे वंशज असावेत. या गिबोनी लोकांना यहोशवाने यहोवाच्या “वेदीसाठी लाकूड तोडणारे आणि पाणी भरणारे म्हणून नेमलं” होतं.—यहो ९:२३, २७; १इत ९:२; एज ८:१७.

  • नवचंद्र दिवस.

    यहुदी कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्याचा पहिला दिवस. या दिवशी लोक एकत्र जमायचे, मेजवानी करायचे आणि खास बलिदानं अर्पण करायचे. नंतरच्या काळात हा दिवस एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण म्हणून पाळला जाऊ लागला आणि त्या दिवशी लोक कामावर न जाता विश्रांती घ्यायचे.—गण १०:१०; २इत ८:१३; कल २:१६.

  • नवस.

    एखादं काम करण्याचं किंवा काहीतरी अर्पण देण्याचं, विशिष्ट प्रकारची सेवा स्वीकारण्याचं किंवा मुळात चुकीच्या नसलेल्या काही गोष्टींचा स्वतःहून त्याग करण्याचं देवाला दिलेलं वचन म्हणजे नवस. नवस करणं हे शपथ घेण्याइतकंच गंभीर होतं.—गण ६:२; उप ५:४; मत्त ५:३३.

  • नवसाचं अर्पण.

    नवस करताना त्यासोबत स्वेच्छेने दिलेलं अर्पण.—लेवी २३:३८; १शमु १:२१.

  • नाझीर.

    हा शब्द “निवडलेला,” “समर्पित केलेला” आणि “वेगळा केलेला” या अर्थाच्या हिब्रू शब्दापासून आला आहे. नाझीर हे दोन प्रकारचे असायचे: एक, जे स्वतःच्या इच्छेने नाझीर बनायचे आणि दुसरे, ज्यांना देव नाझीर म्हणून नेमायचा. एखादी व्यक्‍ती फक्‍त काही काळापुरतीही नाझीर म्हणून यहोवासाठी जीवन जगण्याची शपथ घेऊ शकत होती. स्वतःच्या इच्छेने नाझीर म्हणून शपथ घेणाऱ्‍याला तीन मुख्य गोष्टींची मनाई होती: दारू पिण्याची किंवा द्राक्षांपासून बनवलेलं कोणतंही पेय किंवा पदार्थ खाण्याची, आपल्या डोक्यावरचे केस कापण्याची आणि प्रेताच्या जवळ जाण्याची. यहोवाने नेमलेल्या नाझीराला आयुष्यभर नाझीर म्हणूनच जीवन जगायचं होतं. आणि त्याने काय करावं आणि काय करू नये हे यहोवा त्याला सांगायचा.—गण ६:२-७; शास १३:५.

  • नासरेथकर.

    येशू हा नासरेथ या गावाचा असल्यामुळे त्याच्यासाठी वापरलेलं एक नाव. या शब्दाचा कदाचित, यशया ११:१ या वचनात मूळ हिब्रू भाषेत वापरलेल्या “अंकुर” या शब्दाशी संबंध असावा. नंतर येशूच्या शिष्यांनाही नासरेथकर म्हणण्यात आलं.—मत्त २:२३; प्रेका २४:५.

  • नियम.

    काही ठिकाणी हा शब्द, मोशेच्या नियमशास्त्राला किंवा बायबलमधल्या पहिल्या पाच पुस्तकांना सूचित करतो. तसंच, मोशेच्या नियमशास्त्रातल्या एखाद्या नियमाबद्दल किंवा तत्त्वाबद्दल बोलतानाही नियम असा शब्द वापरण्यात आला आहे.—गण १५:१६; अनु ४:८; मत्त ७:१२; गल ३:२४.

  • निर्लज्ज वर्तन.

    यासाठी ॲसेल्गेया हा ग्रीक शब्द वापरण्यात आला आहे. निर्लज्ज वर्तन म्हणजे, अशी कामं जी देवाच्या नियमांच्या अगदी विरोधात आहेत आणि ज्यांमधून निर्लज्ज किंवा उद्धट मनोवृत्ती दिसून येते; तसंच, अधिकार, नीतिनियम आणि स्तर यांबद्दल अनादराची, इतकंच नाही तर त्यांना तुच्छ लेखण्याची वृत्तीसुद्धा दिसून येते. हे लहानसहान चुकांना सूचित करत नाही.—गल ५:१९; २पेत्र २:७.

  • निसान.

    बाबेलच्या बंदिवासातून सुटका झाल्यावर यहुद्यांच्या पवित्र कॅलेंडरमधल्या अबीब या पहिल्या महिन्याला आणि कृषी कॅलेंडरमधल्या सातव्या महिन्याला निसान म्हटलं जाऊ लागलं. हा महिना मार्चच्या मध्यापासून एप्रिलच्या मध्यापर्यंत असायचा. (नहे २:१)—अति. ख१५ पाहा.

  • नीतिमत्त्व.

    शास्त्रवचनांत, देवाने योग्य आणि अयोग्य यांसाठी स्तर ठरवले आहेत; त्यानुसार योग्य ते करणं म्हणजे नीतिमत्त्व.—उत्प १५:६; अनु ६:२५; नीत ११:४; सफ २:३; मत्त ६:३३.

  • नीतिवचन; म्हण.

    सुविचार किंवा चांगली शिकवण देणारी, किंवा फार कमी शब्दांत एखादं गहन सत्य व्यक्‍त करणारी लहानशी गोष्ट. बायबलमधली काही नीतिवचनं म्हणीच्या किंवा कोड्याच्या रूपात आहेत. नीतिवचनांत सहसा आलंकारिक भाषेत, आणि बऱ्‍याचदा रूपकांच्या मदतीने एक सत्य व्यक्‍त केलेलं असतं. काही म्हणी विशिष्ट लोकांची टिंगल करायला किंवा त्यांना तुच्छ लेखायला सर्रासपणे वापरल्या जायच्या.—उप १२:९; २पेत्र २:२२.

  • नेफिलीम.

    जलप्रलयाआधी मानवी रूप धारण केलेले स्वर्गदूत आणि मानवांच्या मुली यांच्या संबंधांतून झालेली हिंसक प्रवृत्तीची मुलं.—उत्प ६:४.

  • नेहिलोथ.

    या शब्दाचा नेमका अर्थ माहीत नाही. हा शब्द स्तोत्र ५ च्या उपरीलेखनात आला आहे. काहींच्या मते हा शब्द बासरीसारख्या वायुवाद्याला सूचित करतो. कारण, याचा संबंध कालील  (बासरी) या मूळ हिब्रू शब्दाशी असावा असं मानलं जातं. पण कदाचित ही एक धूनसुद्धा असू शकते.

  • नंदनवन.

    एक सुंदर बगिचा. यहोवाने पहिल्या मानवी जोडप्यासाठी बनवलेली एदेन बाग हे असंच एक सुंदर ठिकाण होतं. वधस्तंभावर असताना येशूने आपल्या शेजारी असलेल्या गुन्हेगारांपैकी एकाशी बोलताना असं सुचवलं, की भविष्यात पृथ्वी एक नंदनवन बनेल. हा शब्द २ करिंथकर १२:४ या वचनात भविष्यातल्या नंदनवनाला आणि प्रकटीकरण २:७ यात स्वर्गातल्या नंदनवनाला सूचित करतो.—गीत ४:१३; लूक २३:४३.

  • न्याय-निर्णय.

    अधिकार पदावर असलेल्या एखाद्या व्यक्‍तीने न्यायिक गोष्टींच्या बाबतींत दिलेले निकाल, निर्णय, किंवा कायद्याच्या बाबतीत दिलेले आदेश. बायबलमध्ये हा शब्द सहसा यहोवा देवाने न्यायाधीश म्हणून, तसंच कायदे बनवणारा आणि राजा या नात्याने दिलेल्या निर्णयांना सूचित करतो. हे निर्णय नंतर इस्राएलमध्ये नियम म्हणून पाळले जाऊ लागले.—गण २७:११; अनु ४:१.

  • न्यायसभा (सन्हेद्रिन).

    यरुशलेममधलं यहुद्यांचं उच्च न्यायालय. येशूच्या काळात, या न्यायसभेत ७१ सदस्य होते. यांत महायाजक आणि पूर्वी ज्यांनी महायाजकाचं पद सांभाळलं होतं अशी माणसं, महायाजकांच्या कुटुंबांतले सदस्य, वडीलजन, वंशांचे आणि घराण्यांचे प्रमुख, तसंच शास्त्री होते.—मार्क १५:१; प्रेका ५:३४; २३:१, ६.

  • न्यायाचा दिवस.

    असा एक विशिष्ट दिवस किंवा कालावधी जेव्हा देव ठरावीक समूहांकडून, राष्ट्रांकडून किंवा संपूर्ण मानवजातीकडून हिशोब घेईल. कदाचित या कालावधीतच, मृत्युदंडासाठी पात्र ठरवण्यात आलेल्यांना मृत्यूची शिक्षा दिली जाईल, किंवा काहींचा न्याय केल्यावर त्यांना वाचवलं जाईल आणि त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळेल. येशू ख्रिस्ताने आणि त्याच्या प्रेषितांनी भविष्यातल्या अशा एका ‘न्यायाच्या दिवसाविषयी’ सांगितलं, जेव्हा फक्‍त जिवंतांचाच नाही, तर पूर्वीच्या काळात मेलेल्या लोकांचाही न्याय केला जाईल.—मत्त १२:३६.

  • न्यायाधीश.

    इस्राएलवर कुठलाही राजा राज्य करण्याच्या आधी यहोवा आपल्या लोकांना वाचवण्यासाठी ज्यांना निवडायचा त्यांना न्यायाधीश म्हटलं जायचं.—शास २:१६.

  • न्यायासन.

    सहसा, मोकळ्या जागी असलेला एक उंच कट्टा किंवा चबुतरा; त्यावर चढून जाण्यासाठी पायऱ्‍या असायच्या. न्यायासनावर बसून अधिकारी जमलेल्या लोकांशी बोलायचे आणि आपले निर्णय जाहीर करायचे. ‘देवाचं न्यायासन’ आणि ‘ख्रिस्ताचं न्यायासन’ हे शब्द मानवाजातीचा न्याय करण्यासाठी असलेल्या यहोवाच्या व्यवस्थेला सूचित करतात.—रोम १४:१०; २कर ५:१०; योह १९:१३.

प

  • पगडी.

    महायाजक चांगल्या प्रतीच्या मलमलीची पगडी घालायचा. या पगडीवर निळ्या दोरीने बांधलेली एक शुद्ध सोन्याची पट्टी असायची. राजाच्या डोक्यावरही पगडी असायची आणि त्यावर तो आपला मुकुट ठेवायचा. ईयोबने त्याच्या न्यायाची तुलना पगडीशी केली.—निर्ग २८:३६, ३७; ईयो २९:१४; यहे २१:२६.

  • पडदा.

    उपासना मंडपात आणि नंतर मंदिरातसुद्धा, पवित्र स्थानाला परमपवित्र स्थानापासून वेगळं करायला लावलेला कापडाचा पडदा; या सुंदर विणलेल्या पडद्यावर करुबांच्या आकृत्यांचं नक्षीकाम करण्यात आलं होतं. (निर्ग २६:३१; २इत ३:१४; मत्त २७:५१; इब्री ९:३)—अति. ख५ पाहा.

  • पपायरस गवत.

    पाण्यात उगवणारी बोरूसारखी एक वनस्पती; यापासून टोपल्या आणि होड्या बनवल्या जायच्या. तसंच यापासून लिहिण्यासाठी कागदासारखी वस्तूही बनवली जायची. शिवाय अनेक गुंडाळ्या तयार करायलाही याचा वापर व्हायचा.—निर्ग २:३.

  • परमपवित्र स्थान.

    उपासना मंडप आणि मंदिर यांतली सगळ्यात आतली खोली. या खोलीत कराराची पेटी ठेवली जायची. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे फक्‍त महायाजकालाच परमपवित्र स्थानात प्रवेश करायची परवानगी होती आणि तेसुद्धा फक्‍त प्रायश्‍चित्ताच्या दिवशीच.—निर्ग २६:३३; लेवी १६:२, १७; १रा ६:१६; इब्री ९:३.

  • पराणी.

    गुरांना हाकून नेण्यासाठी वापरली जाणारी आणि धातूचं टोक असलेली एक लांब काठी. पराणीची तुलना, बुद्धिमान व्यक्‍तीच्या शब्दांशी करण्यात आली आहे; त्या शब्दांमुळे ऐकणाऱ्‍याला त्याचा सल्ला स्वीकारायची प्रेरणा मिळते. एखाद्या अडेल बैलाला जेव्हा ढोसणी दिली जाते, तेव्हा तो पराणीवर लाथा मारून तिचा प्रतिकार करतो आणि स्वतःला दुखापत करून घेतो. यावरूनच, “पराणीवर लाथा मारणं” ही म्हण आली आहे.—प्रेका २६:१४; शास ३:३१.

  • परूशी.

    इ.स. पहिल्या शतकात यहुदी धर्माचा एक प्रमुख पंथ. या पंथाचे लोक याजक वंशातले नव्हते. पण तरी ते नियमशास्त्राचं खूप काटेकोरपणे पालन करायचे आणि तोंडी सांगत आलेल्या परंपरांना नियमशास्त्राइतकंच महत्त्व द्यायचे. (मत्त २३:२३) ग्रीक संस्कृतीच्या प्रभावाचा ते खूप विरोध करायचे. नियमशास्त्राचं आणि परंपरांचं त्यांना बरंच ज्ञान असल्यामुळे ते लोकांवर अधिकार गाजवायचे. (मत्त २३:२-६) त्यांच्यापैकी काही जण यहुदी न्यायसभेचे (सन्हेद्रिनचे) सदस्यसुद्धा होते. शब्बाथ व रूढी-परंपरा पाळणं, तसंच पापी लोकांसोबत आणि जकातदारांसोबत उठणं-बसणं यांसारख्या गोष्टींवरून त्यांनी बऱ्‍याच वेळा येशूचा विरोध केला. त्यांच्यापैकी काही जण ख्रिस्ती बनले. त्यांत तार्सचा राहणारा शौलसुद्धा होता.—मत्त ९:११; १२:१४; मार्क ७:५; लूक ६:२; प्रेका २६:५.

  • पर्शिया; पर्शियाचे लोक.

    एक देश आणि त्यातले लोक. त्यांचा नेहमी मेद देशासोबत उल्लेख करण्यात आला आहे; यावरून असं दिसतं की त्यांचा मेदसोबत संबंध असावा. सुरुवातीला पर्शियाच्या लोकांचा फक्‍त इराणच्या पठाराच्या दक्षिण-पश्‍चिम भागावर कब्जा होता. महान कोरेशच्या शासनकाळात पर्शियाचे लोक मेदच्या लोकांवर वरचढ ठरले (काही जुन्या इतिहासकारांच्या मते कोरेशचे वडील पर्शियाचे तर आई मेदची होती). पण तरी त्यांचं साम्राज्य मेद आणि पर्शिया या दोन्ही देशांच्या लोकांनी मिळून बनलं होतं. कोरेशने इ.स.पू. ५३९ मध्ये बाबेलच्या साम्राज्यावर कब्जा मिळवला, आणि तिथे बंदिवासात असलेल्या यहुदी लोकांना आपल्या देशात जाण्याची परवानगी दिली. पर्शियाच्या साम्राज्याची सीमा पूर्वेकडे सिंधू नदीपासून पश्‍चिमेकडे एजियन समुद्रापर्यंत होती. इ.स.पू. ३३१ मध्ये महान सिकंदरने पर्शियाला हरवलं तोपर्यंत यहुदी लोक पर्शियाच्या अधिकाराखाली होते. पर्शियाचं साम्राज्य उभं राहील याबद्दल दानीएलने आधीच एक दृष्टान्त पाहिला होता. आणि नंतर बायबलच्या एज्रा, नहेम्या आणि एस्तेर या पुस्तकांत या साम्राज्याचा उल्लेख आढळतो. (एज १:१; दान ५:२८; ८:२०)—अति. ख९ पाहा.

  • पलेशेथ; पलिष्टी लोक.

    इस्राएलच्या दक्षिण किनारपट्टीवर असलेला प्रदेश; क्रेत बेटावरून या ठिकाणी स्थलांतर केलेल्या लोकांना पलिष्टी लोक म्हटलं जायचं. दावीदने पलिष्टी लोकांना हरवलं असलं, तरी ते नेहमी एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहिले आणि त्यांनी कायम इस्राएलशी शत्रुत्व बाळगलं. (निर्ग १३:१७; १शमु १७:४; आम ९:७)—अति. ख४ पाहा.

  • पवित्र; पवित्रता.

    यहोवाचा एक स्वाभाविक गुण; पूर्ण नैतिक शुद्धता आणि पवित्रता. (निर्ग २८:३६; १शमु २:२; नीत ९:१०; यश ६:३) जेव्हा माणूस (निर्ग १९:६; २रा ४:९), प्राणी (गण १८:१७), वस्तू (निर्ग २८:३८; ३०:२५; लेवी २७:१४), ठिकाणं (निर्ग ३:५; यश २७:१३), काळ व समय (निर्ग १६:२३; लेवी २५:१२), आणि कार्यं (निर्ग ३६:४) यांच्या बाबतीत हा शब्द वापरला आहे, तेव्हा मूळ हिब्रू आणि ग्रीक शब्दांचा अर्थ, पवित्र देवासाठी वेगळं किंवा शुद्ध करणं; यहोवाच्या सेवेसाठी राखून ठेवणं असा होतो. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये, “पवित्र” आणि “पवित्रता” असे भाषांतरित केलेले शब्द एखाद्याच्या शुद्ध आचरणाच्या बाबतीतही वापरण्यात आले आहेत.—मार्क ६:२०; २कर ७:१; १पेत्र १:१५, १६.

  • पवित्र भाकरी.—

    अर्पणाच्या भाकरी पाहा.

  • पवित्र रहस्य.

    देवाच्या संकल्पाचा एक पैलू. या पैलूविषयीची माहिती खुद्द देवापासून आहे आणि त्याच्या निवडलेल्या वेळेपर्यंत तो ती गुप्त ठेवतो. तसंच, ज्यांना ही माहिती प्रकट करायची त्याची इच्छा आहे त्यांनाच ती तो कळवतो.—मार्क ४:११; कल १:२६.

  • पवित्र शक्‍ती.

    देव आपली इच्छा पूर्ण करायला ज्या शक्‍तीचा उपयोग करतो ती अदृश्‍य, स्फूर्तिदायक शक्‍ती. तिचा उगम यहोवापासून होत असल्यामुळे ती पवित्र आहे. कारण, स्वतः यहोवा पूर्णपणे शुद्ध व नीतिमान आहे आणि या शक्‍तीद्वारे तो आपली पवित्र इच्छा पूर्ण करतो.—लूक १:३५; प्रेका १:८.

  • पवित्र सेवा.

    अशी सेवा किंवा असं काम जे पवित्र आहे, म्हणजेच देवाच्या उपासनेशी याचा थेट संबंध आहे.—रोम १२:१; प्रक ७:१५.

  • पवित्र स्थान.

    उपासना मंडपाचा किंवा मंदिराचा पहिला आणि मोठा भाग. हा भाग सगळ्यात आतल्या, म्हणजे परमपवित्र स्थानापेक्षा वेगळा होता. उपासना मंडपातल्या पवित्र स्थानात सोन्याचा दीपवृक्ष, धूप जाळायची सोन्याची वेदी, अर्पणाच्या भाकरी ठेवलेलं मेज आणि सोन्याची भांडी असायची; तर मंदिरातल्या पवित्र स्थानात, सोन्याची वेदी, दहा दीपवृक्ष आणि अर्पणाच्या भाकरी ठेवलेली दहा मेजं होती. (निर्ग २६:३३; इब्री ९:२)—अति. ख५ आणि ख८ पाहा.

  • पश्‍चात्ताप.

    बायबलमध्ये हा शब्द पस्तावा झाल्यामुळे एखाद्याच्या दृष्टिकोनात पूर्णपणे झालेला बदल, यासाठी वापरण्यात आला आहे. पूर्वीच्या जीवनशैलीबद्दल, चुकीच्या कृत्यांबद्दल, किंवा जे करायला हवं होतं ते न केल्याबद्दल मनापासून पस्तावा झाल्यामुळे हा बदल होतो. खरा पश्‍चात्ताप कामांतून दिसून येतो, म्हणजेच खरा पश्‍चात्ताप करणारी व्यक्‍ती आपल्या वागण्यात बदल करते.—मत्त ३:८; प्रेका ३:१९; २पेत्र ३:९.

  • पहाटेचा तारा.

    सूर्योदयापूर्वी, पूर्वेकडच्या क्षितिजावर सर्वात शेवटी उगवणारा आणि एका नव्या दिवसाची पहाट घेऊन येणारा तारा.—प्रक २२:१६; २पेत्र १:१९.

  • पहारेकरी.

    खासकरून रात्रीच्या वेळी लोकांचं किंवा मालमत्तेचं धोक्यांपासून रक्षण करणारा. धोक्याची चाहूल लागली तर पहारेकरी लोकांना त्याची सूचना द्यायचा. पहारेकरी सहसा शहराच्या भिंतींवर आणि बुरुजांवर तैनात असायचे आणि शहराकडे येणाऱ्‍यांवर नजर ठेवायचे. सैन्यातल्या पहारेकऱ्‍याला शिपाई किंवा रक्षक म्हटलं जायचं. लाक्षणिक अर्थाने, संदेष्टे हे इस्राएल राष्ट्राचे पहारेकरी होते. कारण ते त्यांना येणाऱ्‍या नाशाचा इशारा द्यायचे.—२रा ९:२०; यहे ३:१७.

  • पहिलं फळ.

    कापणीच्या काळातला सगळ्यात पहिला उपज. कोणत्याही गोष्टीचे पहिले परिणाम किंवा फळ. इस्राएली लोकांना यहोवाने अशी आज्ञा दिली होती, की त्यांनी आपलं पहिलं फळ त्याला अर्पण करावं; मग हे पहिलं फळ माणसांचं असो, प्राण्यांचं असो किंवा जमिनीच्या उत्पन्‍नाचं असो. एक राष्ट्र या नात्याने इस्राएली लोक बेखमीर भाकरींच्या सणाच्या वेळी आणि पेन्टेकॉस्टच्या दिवशी देवाला पहिलं फळ अर्पण करायचे. लाक्षणिक अर्थाने ख्रिस्ताला आणि त्याच्या अभिषिक्‍त शिष्यांनाही “पहिलं फळ” म्हटलं आहे.—१कर १५:२३; अनु २६:१०; नीत ३:९; प्रक १४:४.

  • पापार्पण.

    मानवी अपरिपूर्णतेमुळे नकळत केलेल्या पापाबद्दल दिलेलं बलिदान. जो माणूस आपल्या पापाच्या प्रायश्‍चित्तासाठी हे बलिदान द्यायचा, तो आपल्या परिस्थितीनुसार आणि ऐपतीनुसार वेगवेगळ्या प्राण्यांचं बलिदान देऊ शकत होता. तो बैलापासून कबुतरापर्यंत कोणत्याही प्राण्याचं किंवा पक्ष्याचं बलिदान देऊ शकत होता.—लेवी ४:२७, २९; इब्री १०:८.

  • पिम.

    एक प्रकारचं वजन, तसंच धातूच्या वेगवेगळ्या अवजारांना धार लावायला पलिष्टी लोक घेत असलेली किंमत. इस्राएलमध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्खननात त्यांना दगडांची वजनं सापडली. त्यांच्यावर “पिम” या शब्दासाठी असलेली हिब्रू व्यंजनं कोरली होती. त्या दगडांचं सरासरी वजन ७.८ ग्रॅम, म्हणजे सुमारे दोन तृतीयांश शेकेल होतं.—१शमु १३:२०, २१.

  • पुनरुत्थान.

    मेलेल्या स्थितीतून पुन्हा जिवंत होणं. यासाठी असलेला ग्रीक शब्द ॲनास्तासिस  याचा शब्दशः अर्थ “उठणं; उभं राहणं” असा होतो. बायबलमध्ये एकूण नऊ पुनरुत्थानांचे अहवाल आहेत. यांत यहोवाने केलेल्या येशूच्या पुनरुत्थानाचाही समावेश आहे. बाकीची पुनरुत्थानं ही एलीया, अलीशा, येशू, पेत्र आणि पौल यांनी केलेली असली, तरी त्यांनी ही देवाच्या शक्‍तीने केली होती हे स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. देवाचा संकल्प पूर्ण होण्यासाठी, पृथ्वीवर “नीतिमान आणि अनीतिमान” लोकांचं पुनरुत्थान होणं गरजेचं आहे. (प्रेका २४:१५) बायबलमध्ये येशूच्या अभिषिक्‍त बांधवांच्या स्वर्गातल्या पुनरुत्थानाबद्दलही सांगण्यात आलं आहे. या पुनरुत्थानाला “पहिलं पुनरुत्थान” किंवा ‘आधीचं पुनरुत्थान’ म्हटलं आहे.—फिलि ३:११; प्रक २०:५, ६; योह ५:२८, २९; ११:२५.

  • पुरीम.

    अदार महिन्याच्या १४ व्या आणि १५ व्या दिवशी साजरा केला जाणारा एक वार्षिक सण. एस्तेर राणीच्या काळात यहुदी लोकांचा जीव वाचवला गेला, त्या गोष्टीची आठवण म्हणून हा सण पाळला जायचा. पुरीम हा हिब्रू शब्द नाही; त्याचा अर्थ “चिठ्ठ्या” असा होतो. हामानने यहुद्यांचा समूळ नाश करायला एक कट रचला होता आणि हे कोणत्या दिवशी केलं जावं यासाठी ‘पूर’ म्हणजे चिठ्ठ्या टाकल्या होत्या. यावरून या सणाला ‘पुरीमचा सण’ किंवा ‘चिठ्ठ्यांचा सण’ असं नाव पडलं.—एस्ते ३:७; ९:२६.

  • पूजेचा खांब.

    यासाठी असलेला हिब्रू शब्द अशेरा  दोन गोष्टींना सूचित करत असावा: (१) कनानी लोकांची प्रजननाची देवी अशेरा हिला सूचित करणारा पूजेचा खांब, किंवा (२) अशेरा देवीची मूर्ती. हे खांब सरळ उभे केलेले असून यांचा काही भाग लाकडाचा असायचा. हे कदाचित आकार न दिलेले किंवा कोणतंही कोरीव काम न केलेले खांब किंवा झाडंही असू शकतात.—अनु १६:२१; शास ६:२६; १रा १५:१३.

  • पूजेचा स्तंभ.

    सहसा दगडापासून बनवलेला एक उभा खांब; हे बआल दैवताच्या किंवा इतर खोट्या दैवताच्या लिंगाचं प्रतीक असायचं.—निर्ग २३:२४.

  • पेन्टेकॉस्ट.

    सर्व यहुदी पुरुषांना जे तीन प्रमुख सण पाळायला यरुशलेमला जाणं आवश्‍यक होतं, त्यांपैकी दुसरा सण. पेन्टेकॉस्ट या शब्दाचा अर्थ “पन्‍नासावा (दिवस)” असा होतो. हिब्रू शास्त्रवचनांत ज्या सणाला ‘कापणीचा सण’ किंवा ‘सप्ताहांचा सण’ म्हणण्यात आलं आहे, त्याला ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत ‘पेन्टेकॉस्ट’ म्हणण्यात आलं आहे. हा सण निसान १६ पासून मोजायला सुरुवात करून ५० व्या दिवशी साजरा केला जायचा.—निर्ग २३:१६; ३४:२२; प्रेका २:१.

  • पेयार्पण.

    वेदीवर ओतलं जाणारं द्राक्षारसाचं अर्पण. इतर अर्पणं देतानाही हे अर्पण दिलं जायचं. आपल्या ख्रिस्ती बांधवांसाठी स्वतःला झोकून देण्याची आपली किती इच्छा आहे, हे दाखवण्यासाठी पौलने लाक्षणिक अर्थाने या शब्दाचा उपयोग केला.—गण १५:५, ७; फिलि २:१७.

  • पोर्निया.—

    अनैतिक लैंगिक कृत्यं पाहा.

  • पोवळं.

    समुद्रातल्या लहान कीटकांसारख्या प्राण्यांच्या हाडांनी बनलेला दगडासारखा एक टणक खनिज पदार्थ. समुद्रामध्ये वेगवेगळ्या रंगांची पोवळी दिसून येतात; उदाहरणार्थ, लाल, पांढरी आणि काळी. तांबड्या समुद्रामध्ये पोवळ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं. बायबल काळात लाल रंगाच्या पोवळ्यांना फार मोल होतं. त्यांपासून मणी आणि इतर अलंकार बनवले जायचे.—नीत ८:११.

  • पंथ.

    एखाद्या धार्मिक सिद्धान्ताचं पालन करणाऱ्‍या किंवा एखाद्या गुरूचं अनुकरण करणाऱ्‍या आणि स्वतःचे धार्मिक विश्‍वास असलेल्या लोकांचा गट. यहुदी धर्माच्या दोन प्रमुख शाखा, म्हणजे परूशी आणि सदूकी या लोकांच्या बाबतीत हा शब्द वापरला गेला आहे. ख्रिस्ती नसणारे लोक ख्रिस्ती धर्माला “पंथ” किंवा ‘नासरेथकरांचा पंथ’ असं म्हणायचे. कदाचित ख्रिस्ती लोक यहुदी धर्मापासून वेगळे झाले असल्यामुळे ते असं म्हणत असावेत. काही काळाने, ख्रिस्ती मंडळीतही वेगवेगळे पंथ निर्माण झाले. प्रकटीकरणात खासकरून ‘निकलावच्या पंथाचा’ उल्लेख करण्यात आला आहे.—प्रेका ५:१७; १५:५; २४:५; २८:२२; प्रक २:६; २पेत्र २:१.

  • प्रथमपुत्र; पहिला जन्मलेला.

    वडिलांचा सगळ्यात मोठा मुलगा (आईचा पहिला मुलगा नाही). बायबलच्या काळात, पहिल्या जन्मलेल्या मुलाला कुटुंबात मानाचं स्थान असून वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचं मस्तकपद त्याला दिलं जायचं. प्राण्यांच्या पहिल्या जन्मलेल्या नर पिल्लालाही पहिला जन्मलेला असं म्हटलं आहे.—निर्ग ११:५; १३:१२; उत्प २५:३३; कल १:१५.

  • प्रभूचा मार्ग; मार्ग.

    येशू ख्रिस्ताचे शिष्य बनलेल्यांना “प्रभूचा मार्ग” अनुसरणारे असं म्हणण्यात आलं होतं. ते येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवतात आणि आपल्या जीवनात त्याच्या पावलावर पाऊल ठेवून एका विशिष्ट मार्गाचं अनुसरण करतात असं यावरून सूचित होतं. (प्रेका १९:९) बायबलमध्ये “मार्ग” असं जे म्हटलं आहे ते अशा वागण्याला किंवा कामांना सूचित करतं जी यहोवाच्या नजरेत योग्य किंवा अयोग्य आहेत.—स्तो १:६; नीत ५:२१.

  • प्रभूचं सांजभोजन.

    ख्रिस्ताचं शरीर आणि रक्‍त यांना सूचित करणारी भाकर आणि द्राक्षारसाचं भोजन; येशूच्या मृत्यूची आठवण म्हणून हे भोजन केलं जायचं. बायबलमध्ये ख्रिश्‍चनांना हा विधी पाळण्याची आज्ञा देण्यात आली आहे, म्हणून त्याला “स्मारकविधी” असं योग्यपणे म्हटलं जातं.—१कर ११:२०, २३-२६.

  • प्रमुख स्वर्गदूत.

    याचा अर्थ, “स्वर्गदूतांचा प्रमुख” असा होतो. यावरून आणि यासाठी बायबलमध्ये वापरण्यात आलेल्या एकवचनी शब्दावरून हेच दिसून येतं, की प्रमुख स्वर्गदूत हा केवळ एकच आहे. बायबल सांगतं की या प्रमुख स्वर्गदूताचं नाव मीखाएल आहे.—दान १२:१; यहू ९; प्रक १२:७.

  • प्रशासकीय अधिकारी.

    बाबेलच्या शासनात सुभेदारापेक्षा कमी अधिकार असलेला अधिकारी. बायबलच्या काळात, प्रशासकीय अधिकारी हे बाबेलच्या दरबारातल्या ज्ञानी माणसांवर अधिकारी होते. मेदचा राजा दारयावेश याच्या शासनकाळातही प्रशासकीय अधिकाऱ्‍यांचा उल्लेख सापडतो.—दान २:४८; ६:७.

  • प्रायश्‍चित्त.

    हिब्रू शास्त्रवचनांनुसार, लोकांना आपल्या पापांची क्षमा मिळवण्यासाठी बलिदानं द्यावी लागायची. आणि त्यांमुळे त्यांना देवासमोर जाणं आणि त्याची उपासना करणं शक्य व्हायचं. एखादी व्यक्‍ती किंवा संपूर्ण राष्ट्र पाप करायचं, तेव्हा मोशेच्या नियमशास्त्रानुसार देवाशी पुन्हा समेट करण्यासाठी बलिदानं द्यावी लागायची; खासकरून बलिदानं प्रायश्‍चित्ताच्या दिवशी द्यावी लागायची. ही बलिदानं येशूच्या बलिदानाला सूचित करायची. येशूच्या बलिदानामुळे सगळ्या माणसांच्या पापांसाठी एकदाच व सर्वकाळासाठी प्रायश्‍चित्त करण्यात आलं. आणि त्यामुळे सर्व लोकांना यहोवाशी समेट करायची संधी मिळाली.—लेवी ५:१०; २३:२८; कल १:२०; इब्री ९:१२.

  • प्रायश्‍चित्ताचा दिवस.

    इस्राएली लोकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र दिवस; याला योम किप्पूर असंही म्हणतात (योहम हाक्किपुरीम  या हिब्रू शब्दांवरून; याचा अर्थ “झाकणांचा दिवस”). हा दिवस एथानीम महिन्याच्या १० व्या दिवशी पाळला जायचा. वर्षाच्या फक्‍त याच दिवशी महायाजक उपासना मंडपाच्या परमपवित्र स्थानात आणि नंतरच्या काळात मंदिराच्या परमपवित्र स्थानात जायचा. आणि तिथे तो स्वतःच्या, इतर लेव्यांच्या आणि लोकांच्या पापांसाठी दिलेल्या बलिदानांचं रक्‍त अर्पण करायचा. हा पवित्र मेळाव्याचा आणि उपास करण्याचा दिवस होता; तसंच, तो शब्बाथाचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी रोजची कामं केली जात नव्हती.—लेवी २३:२७, २८.

  • प्रायश्‍चित्ताचं झाकण.

    कराराच्या पेटीचं झाकण. प्रायश्‍चित्ताच्या दिवशी महायाजक त्याच्यापुढे पापार्पणांचं रक्‍त शिंपडायचा. यासाठी असलेला हिब्रू शब्द मुळात “(पाप) झाकून टाकणं” किंवा कदाचित, “(पाप) पुसून टाकणं” या अर्थाच्या क्रियापदावरून आला आहे. हे झाकण सोन्याचं असून त्याच्या दोन्ही टोकांवर दोन करूब होते. याला काही ठिकाणी फक्‍त ‘झाकण’ असंही म्हटलं आहे. (निर्ग २५:१७-२२; १इत २८:११; इब्री ९:५)—अति. ख५ पाहा.

  • प्रेषित.

    या शब्दाचा मुळात अर्थ “पाठवलेला” असा होतो. हा शब्द, इतरांची सेवा करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या येशूच्या आणि विशिष्ट जणांच्या बाबतीत वापरण्यात आला आहे. येशूने आपले प्रतिनिधी म्हणून ज्या १२ शिष्यांना निवडलं होतं त्यांच्या बाबतीत हा शब्द जास्तकरून वापरण्यात आला आहे.—मार्क ३:१४; प्रेका १४:१४.

फ

  • फटके मारणं.

    एक प्रकारची शिक्षा; ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, हे चाबकाने मारण्याला सूचित करतं. या चाबकाला बऱ्‍याच गाठी मारलेल्या असायच्या आणि याच्या कडेला टोकदार वस्तू लावलेल्या असायच्या.—मत्त २०:१९; योह १९:१.

  • फरात.

    दक्षिण-पश्‍चिम आशियातली सगळ्यात मोठी व महत्त्वपूर्ण नदी. ही मेसोपटेम्यातल्या दोन मोठ्या नद्यांपैकी एक आहे. एदेन बागेतल्या चार नद्यांपैकी एक नदी, म्हणून उत्पत्ती २:१४ मध्ये तिचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो. बायबलमध्ये सहसा तिचा उल्लेख “नदी” असा करण्यात आला आहे. (उत्प ३१:२१) इस्राएलला नेमून दिलेल्या प्रदेशाची ती उत्तरेकडची सीमा होती. (उत्प १५:१८; प्रक १६:१२)—अति. ख२ पाहा.

  • फारो.

    इजिप्तच्या राजांना देण्यात आलेली एक पदवी. बायबलमध्ये पाच फारोंची नावं (शिशक, सो, तिऱ्‍हाका, नखो, हफ्रा) देण्यात आली आहेत. पण इतर फारोंच्या नावांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. अब्राहाम, मोशे आणि योसेफ यांच्यासोबत बराच संबंध आलेल्या फारोंचीही नावं देण्यात आलेली नाहीत.—निर्ग १५:४; रोम ९:१७.

ब

  • बआल.

    कनान देशाचा एक देव. तो पाऊस व सुपिकता देणारा आकाशाचा मालक आहे असं मानलं जायचं. वेगवेगळ्या प्रदेशातल्या स्थानिक दैवतांनाही “बआल” म्हटलं जायचं. या हिब्रू शब्दाचा अर्थ, “मालक; स्वामी” असा होतो.—१रा १८:२१; रोम ११:४.

  • बथ.

    साधारण २२ लिटरचं एक द्रव माप. ही गोष्ट पुरातत्व शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून दिसून आली. कारण मातीच्या भांड्याच्या काही तुकड्यांवर त्यांना ‘बथ’ असं लिहिलेलं दिसलं. बायबलमध्ये दिलेली बहुतेक सगळी घन आणि द्रव मापं, बथच्या अंदाजे मापानुसार मोजण्यात आली आहेत. (१रा ७:३८; यहे ४५:१४)—अति. ख१४ पाहा.

  • बलिदान.

    देवाला आभार व्यक्‍त करायला, आपली चूक कबूल करायला आणि देवासोबत चांगले संबंध पुन्हा जोडायला त्याला सादर केलेलं अर्पण. हाबेलने देवाला अर्पण दिलं होतं, तेव्हापासूनच माणसांनी वेगवेगळ्या प्रकारची, स्वेच्छेने दिलेली बलिदानं देवाला अर्पण केली. यांत प्राण्यांच्या बलिदानांचाही समावेश होता. नंतर, मोशेच्या नियमशास्त्रात देवाला बलिदानं अर्पण करायची आज्ञा देण्यात आली. येशूने आपल्या परिपूर्ण जीवनाचं बलिदान दिल्यावर मात्र, प्राण्यांची बलिदानं द्यायची गरज उरली नाही. पण ख्रिस्ती आजही देवाला आध्यात्मिक बलिदानं देतात.—उत्प ४:४; इब्री १३:१५, १६; १यो ४:१०.

  • बाप्तिस्मा; बाप्तिस्मा देणं.

    या क्रियापदाचा अर्थ, “बुडवणं” किंवा पाण्याखाली डुबवणं असा होतो. येशूने म्हटलं, की त्याचा शिष्य होण्यासाठी बाप्तिस्मा घेणं आवश्‍यक आहे. शास्त्रवचनांत अनेक बाप्तिस्म्यांचा उल्लेख केला आहे; जसं की, योहानने दिलेला बाप्तिस्मा, पवित्र शक्‍तीने आणि अग्नीने दिलेला बाप्तिस्मा.—मत्त ३:११, १६; २८:१९; योह ३:२३; १पेत्र ३:२१.

  • बालजबूल.

    दुष्ट स्वर्गदूतांचा राजा किंवा शासक असलेल्या सैतानाला दिलेलं एक नाव. हे नाव कदाचित, पलिष्टी लोक एक्रोनमध्ये उपासना करत असलेल्या बआल-जबूब या दैवताच्या नावाचं दुसरं रूप असावं.—२रा १:३; मत्त १२:२४.

  • बाल्सम.

    काही झुडपांपासून आणि वृक्षांपासून मिळणारा राळेसारखा सुगंधी पदार्थ. याचा अत्तर म्हणून, तसंच औषध म्हणून उपयोग केला जायचा. प्राचीन काळात बाल्सम फार मौल्यवान समजलं जायचं.—उत्प ३७:२५; यिर्म ८:२२.

  • बुधली.

    बकरी किंवा मेंढी यांसारख्या प्राण्यांच्या संपूर्ण कातडीचा उपयोग करून बनवलेली पिशवी. तिचा वापर द्राक्षारस ठेवायला केला जायचा. सहसा द्राक्षारस नव्या बुधल्यांमध्ये ठेवला जायचा, कारण जसजसा तो आंबायचा तसतसा त्यातून कार्बन डायॉक्साईड वायू निघून ती बुधली फुगायची. नव्या बुधल्यांचा आकार आपोआप वाढायचा; तर जुन्या, कडक झालेल्या बुधल्या फुगून फाटून जायच्या.—यहो ९:४; मत्त ९:१७.

  • बूल.

    हे यहुदी लोकांच्या पवित्र कॅलेंडरच्या आठव्या महिन्याचं आणि कृषी कॅलेंडरच्या दुसऱ्‍या महिन्याचं जुनं नाव आहे. यासाठी मूळ भाषेत जो शब्द वापरण्यात आला आहे त्याचा अर्थ “उपज; उत्पन्‍न” असा होतो. हा महिना, ऑक्टोबरच्या मध्यापासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत असायचा. (१रा ६:३८)—अति. ख१५ पाहा.

  • बेखमीर.

    खमीर न घालता बनवलेली भाकर. (अनु १६:३; मार्क १४:१२; १कर ५:८)—खमीर पाहा.

  • बेखमीर भाकरींचा सण.

    इस्राएली लोकांच्या तीन मोठ्या वार्षिक सणांपैकी पहिला सण. हा सण निसान महिन्याच्या १५ व्या दिवशी, म्हणजे वल्हांडण सणाच्या दुसऱ्‍या दिवशी सुरू होऊन सात दिवस पाळला जायचा. इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर पडले त्या घटनेची आठवण ठेवण्यासाठी ते हा सण पाळायचे आणि त्या वेळी ते फक्‍त बेखमीर भाकरी खायचे.—निर्ग २३:१५; मार्क १४:१.

  • बोरू.

    दलदलीच्या भागांत किंवा पाण्याच्या काठी उगवणाऱ्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती. बऱ्‍याच अहवालांत उल्लेख केलेला बोरू म्हणजे अरुंदो दोनाक्स  ही वनस्पती असावी. (ईयो ८:११; यश ४२:३; मत्त २७:२९; प्रक ११:१) बोरूचा उपयोग मोजमापाची काठी म्हणून केला जायचा.—मोजमापाची काठी पाहा.

  • बंदिवास.

    एखाद्याला कैद करून किंवा बंदी बनवून त्याच्या देशातून किंवा घरातून दूर घेऊन जाणं. हे सहसा देश काबीज करणाऱ्‍याच्या हुकमावरून केलं जायचं. यासाठी असलेल्या हिब्रू शब्दाचा अर्थ “निघून जाणं” असा होतो. इस्राएलच्या इतिहासात दोन वेळा मोठ्या प्रमाणात लोकांना बंदिवासात जावं लागलं. पहिल्यांदा, अश्‍शूरी लोकांनी उत्तरेकडच्या दहा वंशांच्या राज्याला बंदिवासात नेलं. आणि नंतर, बाबेलच्या लोकांनी दक्षिणेकडच्या दोन वंशांच्या राज्याला बंदिवासात नेलं. मग, पर्शियाचा राजा कोरेश याच्या शासनकाळात दोन्ही राज्यांतल्या उरलेल्या बंदिवानांना परत त्यांच्या देशात पाठवण्यात आलं.—२रा १७:६; २४:१६; एज ६:२१.

भ

  • भविष्यवाणी.

    एक प्रेरित संदेश. हा संदेश देवाची इच्छा प्रकट करणारा किंवा त्याची जाहीर घोषणा करणारा संदेश असू शकतो. भविष्यवाणी ही देवाने प्रेरित केलेली नैतिक शिकवण असू शकते किंवा देवाच्या आज्ञेची, न्यायदंडाची किंवा भविष्यात घडणार असलेल्या एखाद्या गोष्टीची घोषणा असू शकते.—यहे ३७:९, १०; दान ९:२४; मत्त १३:१४; २पेत्र १:२०, २१.

  • भुसा.

    धान्याची मळणी आणि पाखडणी करताना दाण्यापासून वेगळी होणारी टरफलं. एखाद्या निरुपयोगी किंवा नकोशा असलेल्या गोष्टीला सूचित करायलाही लाक्षणिक अर्थाने भुसा हा शब्द वापरण्यात आला आहे.—स्तो १:४; मत्त ३:१२.

  • भूतविद्या.

    भूतविद्येचा संबंध लोकांच्या एका समजुतीशी आहे. बरेच लोक असं मानतात की मेल्यानंतर माणसाच्या शरीरातून आत्मा बाहेर पडून जिवंत राहतो. ते असंही मानतात की तो जिवंत व्यक्‍तींसोबत बोलू शकतो व बोलतोही; खासकरून त्यांच्या प्रभावाखाली येणाऱ्‍या एखाद्या माणसाद्वारे (माध्यमाद्वारे) तो जिवंत लोकांशी संपर्क साधतो. “भूतविद्या” यासाठी असलेला ग्रीक शब्द फार्माकीया  आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ “नशा येणारं औषध देणं” असा होतो. प्राचीन काळात भूतविद्या करण्यासाठी दुष्ट स्वर्गदूतांना बोलवताना, सहसा नशा येणाऱ्‍या पदार्थांचा उपयोग केला जायचा. आणि म्हणून या शब्दाचा भूतविद्येशी संबंध जोडण्यात आला.—गल ५:२०; प्रक २१:८.

  • भेटमंडप.

    मोशेच्या तंबूसाठी आणि सर्वात आधी ओसाड रानात उभारलेल्या उपासना मंडपासाठी वापरण्यात आलेला शब्द.—निर्ग ३३:७; ३९:३२.

  • मथ-लाबेन.

    हा शब्द स्तोत्र ९ च्या उपरीलेखनात आला आहे. यहुदी लोक मानायचे, की याचा अर्थ, “मुलाच्या मृत्यूविषयी” असा आहे. काहींचं असं म्हणणं आहे, की हे एका ओळखीच्या गाण्याचं नाव असावं किंवा त्या गाण्याचे सुरुवातीचे शब्द असावेत; आणि या गाण्याच्या चालीवर हे स्तोत्र गायलं जायचं.

  • मध्यस्थ.

    दोन पक्षांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करणारा. बायबलमध्ये मोशे नियमशास्त्राच्या कराराचा, तर येशू नव्या कराराचा मध्यस्थ आहे.—गल ३:१९; १ती २:५.

म

  • मनुष्याचा मुलगा.

    आनंदाचा संदेश सांगणाऱ्‍या चार पुस्तकांत हे शब्द सुमारे ८० वेळा आढळतात. ते येशू ख्रिस्ताला सूचित करतात. या शब्दांवरून असं दिसतं, की येशू फक्‍त शरीर धारण केलेला एक स्वर्गदूत नसून, तो माणसाच्या रूपात जन्मलेला एक मनुष्य आहे. दानीएल ७:१३, १४ यात दिलेली भविष्यवाणी येशू पूर्ण करेल हेसुद्धा या शब्दांवरून सूचित होतं. हिब्रू शास्त्रवचनांत हे शब्द यहेज्केल आणि दानीएल यांच्यासाठी वापरण्यात आले आहेत; संदेश जरी माणसं देत असली तरी तो संदेश देवाकडून आहे हा फरक स्पष्ट करण्यासाठी हे शब्द यहेज्केल आणि दानीएल यांच्यासाठी वापरण्यात आले आहेत.—यहे ३:१७; दान ८:१७; मत्त १९:२८; २०:२८.

  • मरोदख.

    बाबेल शहराचं मुख्य दैवत. बाबेलचा राजा आणि कायदा बनवणारा हम्मुराबी याने बाबेलला बॅबिलोनियाची राजधानी बनवल्यानंतर मरोदख (किंवा, मारदूक) दैवताचं महत्त्व वाढलं. शेवटी त्याचं महत्त्व इतकं वाढलं, की त्याने आधीच्या अनेक दैवतांची जागा घेतली आणि बॅबिलोनियातल्या सगळ्या दैवतांमध्ये ते मुख्य दैवत बनलं. पुढे काही काळाने मरोदख (किंवा, मारदूक) याला “बेलू” (“मालक”) ही उपाधी देण्यात आली, आणि त्याला ‘बेल’ असं म्हटलं जाऊ लागलं.—यिर्म ५०:२.

  • मलमल.

    अळशीच्या धाग्यापासून बनवलं जाणारं मऊसूत कापड. वस्त्रं तयार करायला किंवा इतर वस्तू बनवायला हे वापरलं जायचं. (लेवी १३:४७; यिर्म १३:१) मलमलीचे वेगवेगळे प्रकार असायचे; काही साधे तर काही चांगल्या प्रतीचे. (उत्प ४१:४२; निर्ग २५:४) इंग्रजीत याला लिनन असं म्हणतात.

  • मल्काम.

    हे अम्मोनी लोकांचं प्रमुख दैवत मोलख याचं दुसरं नाव असावं. (सफ १:५)—मोलख पाहा.

  • मसीहा.

    “अभिषिक्‍त” यासाठी असलेल्या हिब्रू शब्दावरून. याच अर्थाचा “ख्रिस्त” हा शब्द ग्रीक भाषेतल्या शब्दावरून आला आहे.—दान ९:२५; योह १:४१.

  • मस्कील.

    बायबलमधल्या १३ स्तोत्रांच्या उपरीलेखनांत हा शब्द आला आहे. पण या हिब्रू शब्दाचा नेमका अर्थ माहीत नाही. कदाचित याचा अर्थ “मनन करायला प्रवृत्त करणारी कविता,” असा असू शकतो. मस्कील याच्यासारखाच आणखी एक शब्द आहे आणि त्याचं भाषांतर ‘समंजसपणे सेवा करणं’ असं करण्यात आलं आहे; काहींना वाटतं की या दोन्ही शब्दांचा अर्थ एकसारखाच असावा.—२इत ३०:२२; स्तो ३२:उपरीलेखन.

  • महलथ.

    हा संगीताशी संबंधित असलेला एक शब्द असावा असं दिसतं. स्तोत्र ५३ आणि ८८ यांच्या उपरीलेखनांत हा शब्द आला आहे. हा शब्द, “अशक्‍त होणं; अजारी पडणं,” या अर्थाच्या हिब्रू शब्दावरून आला असावा. यावरून असं समजतं, की महलथ हा दुःख आणि निराशा व्यक्‍त करणारा सूर असावा. आणि म्हणूनच या दोन स्तोत्रांमधले शब्दही दुःख व्यक्‍त करणारे का आहेत, हे कळून येतं.

  • महायाजक.

    मोशेच्या नियमशास्त्रानुसार सगळ्यात प्रमुख याजक. तो देवासमोर लोकांचं प्रतिनिधित्व करायचा आणि इतर याजकांच्या कामांवर देखरेख करायचा. त्याला “मुख्य याजक” असंही म्हटलं जायचं. (२इत २६:२०; एज ७:५) फक्‍त त्यालाच परमपवित्र स्थानात, म्हणजे उपासना मंडपातल्या आणि मंदिरातल्या सगळ्यात आतल्या भागात जायची परवानगी होती. तो तिथे फक्‍त प्रायश्‍चित्ताच्या दिवशीच जायचा. येशू ख्रिस्तालासुद्धा “महायाजक” असं म्हटलं आहे.—लेवी १६:२, १७; २१:१०; मत्त २६:३; इब्री ४:१४.

  • मान्‍ना.

    ओसाड रानात ४० वर्षं यहोवाने इस्राएली लोकांना पुरवलेलं मुख्य अन्‍न. शब्बाथाचा दिवस सोडून इतर प्रत्येक दिवशी सकाळी चमत्कारिकपणे दवाच्या थराखाली मान्‍ना जमिनीवर दिसायचा. इस्राएली लोकांनी पहिल्यांदा तो पाहिला तेव्हा ते म्हणाले, “काय आहे हे?” किंवा हिब्रू भाषेत, “मान हू?”  (निर्ग १६:१३-१५, ३५) काही ठिकाणी याला “स्वर्गातलं धान्य” (स्तो ७८:२४), ‘आकाशातली भाकर’ (स्तो १०५:४०), आणि “ताकदवानांचं अन्‍न” (स्तो ७८:२५) असंही म्हटलं आहे. येशूनेसुद्धा लाक्षणिक अर्थाने मान्‍नाचा उल्लेख केला होता.—योह ६:४९, ५०.

  • मासेदोनिया.

    ग्रीसच्या उत्तरेकडे असलेला एक प्रदेश. थोर सिकंदरच्या शासनकाळात या प्रदेशाला महत्त्व मिळालं. रोमी लोकांनी त्यावर विजय मिळवला तोपर्यंत हा प्रदेश स्वतंत्र राहिला. प्रेषित पौल युरोपला पहिल्यांदा गेला तेव्हा मासेदोनिया हा एक रोमी प्रांत होता. पौलने या प्रदेशाला तीन वेळा भेट दिली. (प्रेका १६:९)—अति. ख१३ पाहा.

  • मिक्‍ताम.

    सहा स्तोत्रांच्या उपरीलेखनांत वापरलेला हिब्रू शब्द. (स्तो १६; ५६–६०) याचा नेमका अर्थ माहीत नसला, तरी “कोरीव लेख” या शब्दांशी त्याचा संबंध असावा.

  • मिना.

    यहेज्केलच्या पुस्तकात याला मानेह असंही म्हटलं आहे. वजनाचं आणि चलनाचं एक प्रमाण. पुरातत्व शास्त्रज्ञांना मिळालेल्या पुराव्यानुसार, एक मिना हे ५० शेकेल आहे. आणि एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. त्यामुळे हिब्रू शास्त्रवचनांत सांगितलेलं मिना हे ५७० ग्रॅम इतकं होतं. शिवाय, जसं हात या मापाचे दोन प्रमाण होते, तसंच मिनाचेही दोन प्रमाण असावेत. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, एक मिना म्हणजे १०० ड्राख्मा असून, त्याचं वजन ३४० ग्रॅम इतकं होतं. आणि ६० मिना म्हणजे एक तालान्त असायचं. (एज २:६९; यहे ४५:१२; लूक १९:१३)—अति. ख१४ पाहा.

  • मिलकोम.

    अम्मोनी लोकांचं एक दैवत; कदाचित याचं दुसरं नाव मोलख असावं. (१रा ११:५, ७) शलमोनने आपल्या शासनकाळाच्या शेवटी-शेवटी या खोट्या दैवतासाठी उच्च स्थानं बांधली.—मोलख पाहा.

  • मुख्य प्रतिनिधी.

    यासाठी जो ग्रीक शब्द वापरला आहे, त्याचा अर्थ “प्रमुख नेता” असा होतो. ही येशू ख्रिस्ताला दिलेली एक पदवी असून ती त्याच्या खास भूमिकेला सूचित करते. ती भूमिका म्हणजे, विश्‍वासू मानवांची पापाच्या भयंकर परिणामांपासून सुटका करून त्यांना सर्वकाळाच्या जीवनाकडे नेणं.—प्रेका ३:१५; ५:३१; इब्री २:१०; १२:२.

  • मुख्य याजक.

    हिब्रू शास्त्रवचनांत, “महायाजक” याला मुख्य याजक असंही म्हटलं आहे. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये, याजकवर्गातल्या प्रमुख माणसांना “मुख्य याजक” म्हटल्याचं दिसून येतं; यांत कदाचित, महायाजकाच्या पदावरून काढण्यात आलेल्या याजकांचा, तसंच २४ याजक दलांच्या प्रमुखांचाही समावेश होतो.—२इत २६:२०; एज ७:५; मत्त २:४; मार्क ८:३१.

  • मुद्रेची अंगठी.

    एक प्रकारची मोहर. ही बोटात घातली जायची किंवा धाग्यात ओवून गळ्यात घातली जायची. ही अंगठी अधिकाऱ्‍याच्या किंवा राजाच्या अधिकाराची निशाणी असायची. (उत्प ४१:४२)—मोहर पाहा.

  • मूर्ती; मूर्तिपूजा.

    मूर्ती म्हणजे, लोक पूजा करत असलेल्या कोणत्याही खऱ्‍या किंवा काल्पनिक गोष्टीची प्रतिमा किंवा प्रतीक. मूर्तिपूजा म्हणजे, एखाद्या मूर्तीची उपासना करणं, तिच्याबद्दल श्रद्धा बाळगणं किंवा तिची आराधना करणं.—स्तो ११५:४; प्रेका १७:१६; १कर १०:१४.

  • मेद; मेदी.

    याफेथचा मुलगा मादय याचे वंशज; ते इराणच्या डोंगराळ भागातल्या पठारावर वसले होते. हाच प्रदेश पुढे मेद देश बनला. नंतर अश्‍शूरला हरवायला मेदने बाबेलला साथ दिली. त्या काळात, पर्शिया हा मेदच्या शासनाखाली असलेला एक प्रांत होता. पण कोरेशने विद्रोह केला आणि मेद व पर्शिया एकत्र होऊन मेद-पारस साम्राज्य बनलं. या साम्राज्याने इ.स.पू. ५३९ मध्ये बाबेलच्या साम्राज्याला हरवलं. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी यरुशलेममध्ये मेदी लोकसुद्धा होते. (दान ५:२८, ३१; प्रेका २:९)—अति. ख९ पाहा.

  • मैल.

    ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतल्या मूळ अहवालात फक्‍त एकदा, म्हणजे मत्तय ५:४१ यात आढळणारं अंतर मोजण्याचं एक प्रमाण. कदाचित ते रोमी लोकांच्या मोजण्याच्या पद्धतीनुसार १,४७९.५ मीटर (४,८५४ फूट) इतक्या अंतराला सूचित करत असावं.—अति. ख१४ पाहा.

  • मोजमापाची काठी.

    ही सहसा बोरूची काठी असून ६ हात लांब असायची. हाताच्या मापाप्रमाणे ती २.६७ मीटर (८.७५ फूट) लांब; आणि लांब हाताच्या मापाप्रमाणे ती ३.११ मीटर (१०.२ फूट) लांब असायची. (यहे ४०:३, ५; प्रक ११:१)—अति. ख१४ पाहा.

  • मोठं संकट.

    “संकट” यासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, परिस्थितीच्या दबावांमुळे निर्माण होणारं तीव्र दुःख. पूर्वी कधीही आलं नाही असं “मोठं संकट” यरुशलेमवर येणार असल्याचं येशूने सांगितलं. आणि भविष्यात तो “मोठ्या वैभवाने” येईल तेव्हा असंच एक मोठं संकट संपूर्ण मानवजातीवर येईल, याबद्दलही येशू खासकरून बोलला. (मत्त २४:२१, २९-३१) या संकटाचं वर्णन करताना पौलने म्हटलं, की जे देवाला ओळखत नाहीत आणि येशू ख्रिस्ताविषयीचा आनंदाचा संदेश मानत नाहीत अशांवर संकट आणून देव आपल्या न्यायीपणाचा पुरावा देईल. प्रकटीकरणाचा १९ वा अध्याय दाखवून देतो, की ‘जंगली पशू’ तसंच “पृथ्वीवरचे राजे आणि त्यांची सैन्यं” यांच्याविरुद्ध “युद्ध करायला” येशू आपल्या स्वर्गीय सैन्यासोबत येत आहे. (२थेस १:६-८; प्रक १९:११-२१) त्या संकटातून “एक मोठा लोकसमुदाय” सुखरूप वाचेल. (प्रक ७:९, १४)—हर्मगिदोन पाहा.

  • मोलख.

    अम्मोनी लोकांचं एक दैवत; मल्काम, मिलकोम आणि मोलोख ही नावंसुद्धा याच दैवताला सूचित करत असावीत. हे एखाद्या विशिष्ट दैवताचं नाव नाही, तर त्याची एक उपाधी असावी. मोशेच्या नियमशास्त्रानुसार, जो कोणी मोलखसाठी आपल्या मुलांचा बळी द्यायचा त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जायची.—लेवी २०:२; यिर्म ३२:३५; प्रेका ७:४३.

  • मोलोख.—

    मोलख पाहा.

  • मोशेचं नियमशास्त्र.

    यहोवाने मोशेच्याद्वारे इ.स.पू. १५१३ मध्ये सीनायच्या ओसाड रानात इस्राएली लोकांना दिलेलं नियमशास्त्र. बायबलमधल्या पहिल्या पाच पुस्तकांना सहसा नियमशास्त्र म्हटलं जातं.—यहो २३:६; लूक २४:४४.

  • मोहर; शिक्का; मुद्रा.

    मालकी हक्क, विश्‍वसनीयता किंवा संमती दाखवण्यासाठी छाप मारण्याचं (सहसा मातीवर किंवा मेणावर) साधन. प्राचीन काळातली मोहर किंवा शिक्का एखाद्या कठीण वस्तूपासून (दगड, हस्तिदंत किंवा लाकूड) बनलेला असायचा. आणि त्यावर उलट दिशेने अक्षरं किंवा एखादी आकृती कोरलेली असायची. लाक्षणिक अर्थाने, एखादी गोष्ट विश्‍वसनीय असल्याचं दाखवायला किंवा एखाद्या गोष्टीवर मालकी हक्क दाखवायला, किंवा काहीतरी गुप्त किंवा लपवलेलं आहे हे दाखवायला मोहर लावणं किंवा शिक्का मारणं अशा शब्दांचा उपयोग करण्यात आला आहे.—निर्ग २८:११; नहे ९:३८; प्रक ५:१; ९:४.

  • मंडपांचा सण.

    याला तंबूंचा किंवा पीक गोळा करण्याचा सण असंही म्हटलं जायचं. हा सण, एथानीम महिन्याच्या १५-२१ तारखेपर्यंत साजरा केला जायचा. इस्राएलमध्ये कृषी वर्षाच्या शेवटी कापणीच्या वेळी साजरा केला जाणारा हा सण आनंदोत्सव करण्याचा आणि भरघोस पीक दिल्याबद्दल यहोवाचे आभार मानण्याचा समय होता. इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले या गोष्टीची स्वतःला आठवण करून देण्यासाठी ते या सणाच्या दिवसांत तंबूंमध्ये किंवा छत असलेल्या मचाणांमध्ये राहायचे. इस्राएली लोकांना नेमून दिलेल्या तीन सणांपैकी हा एक सण असून तो पाळण्यासाठी पुरुषांना यरुशलेमला जाणं आवश्‍यक होतं.—लेवी २३:३४; एज ३:४.

  • मंडळी.

    एका खास उद्देशासाठी, प्रसंगासाठी किंवा विशिष्ट कार्यांसाठी एकत्र जमलेला लोकांचा समूह. हिब्रू शास्त्रवचनांत, हा शब्द सहसा इस्राएल राष्ट्रासाठी वापरण्यात आला आहे. तसंच, तो धार्मिक सणांच्या वेळी किंवा इस्राएलमधल्या अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी एकत्र आलेल्या लोकांसाठीही वापरण्यात आला आहे. ग्रीक शास्त्रवचनांत, हा शब्द ख्रिस्ती लोकांच्या वेगवेगळ्या मंडळ्यांना सूचित करतो. पण बहुतेक वेळा तो संपूर्ण ख्रिस्ती मंडळीला सूचित करतो.—अनु १६:८; १रा ८:५, २२; प्रेका ९:३१; रोम १६:५.

  • मंदिर.

    उपासनेसाठी असलेलं एक पवित्र ठिकाण. पण शास्त्रवचनांत सहसा हा शब्द उपासना मंडपाला किंवा यरुशलेममधल्या मंदिराला सूचित करतो. इस्राएली लोक पूर्वी तात्पुरत्या स्वरूपाच्या उपासना मंडपात उपासना करायचे. पण नंतर यरुशलेममधल्या मंदिराची इमारत इस्राएली लोकांच्या उपासनेचं मुख्य स्थान बनली. पहिलं मंदिर शलमोनने बांधलं होतं आणि बाबेलच्या लोकांनी ते नष्ट केलं. त्यानंतर, यहुदी लोक बाबेलच्या बंदिवासातून परत आल्यावर दुसरं मंदिर जरूब्बाबेल याने निर्माण केलं आणि नंतर महान हेरोद राजाने ते पुन्हा बांधलं. बायबलमध्ये मंदिराला मूळ भाषेत बऱ्‍याचदा फक्‍त ‘यहोवाचं घर’ असं म्हटलं आहे. (एज १:३; ६:१४, १५; १इत २९:१; २इत २:४; मत्त २४:१) स्वर्गात देवाच्या राहण्याच्या ठिकाणासाठीही हा शब्द वापरण्यात आला आहे. (निर्ग २५:८, ९; २रा १०:२५; १इत २८:१०; प्रक ११:१९)—अति. ख८ आणि ख११ पाहा.

य

  • यदूथून.

    हा शब्द स्तोत्र ३९, ६२ आणि ७७ यांच्या उपरीलेखनांत दिला आहे. पण त्याचा नेमका अर्थ माहीत नाही. कदाचित ही स्तोत्रं कशी गायली जावीत याबद्दल सूचना देण्यासाठी, म्हणजे स्तोत्रं कोणत्या शैलीत गायली जावीत किंवा कोणतं वाद्य वाजवलं जावं यांबद्दल सूचना देण्यासाठी ही उपरीलेखनं दिली असावीत. यदूथून नावाचा एक लेवी संगीतकार होता. त्यामुळे स्तोत्र गाण्याची शैली किंवा वाद्य यांचा त्याच्याशी किंवा त्याच्या मुलांशी संबंध असावा.

  • यहुदी.

    इस्राएलच्या दहा वंशाच्या राज्याचा नाश झाल्यावर यहूदा वंशाच्या व्यक्‍तीसाठी हा शब्द वापरला जाऊ लागला. (२रा १६:६) बाबेलच्या बंदिवासातून सुटका झाल्यानंतर हा शब्द, इस्राएलला परत आलेल्या वेगवेगळ्या वंशांतल्या इस्राएली लोकांच्या बाबतीत वापरण्यात आला. (एज ४:१२) नंतर, इस्राएली लोकांना विदेशी राष्ट्रांपासून वेगळं दाखवण्यासाठी हा शब्द जगभरात वापरला जाऊ लागला. (एस्ते ३:६) एक व्यक्‍ती कोणत्या राष्ट्राची आहे या गोष्टीला ख्रिस्ती मंडळीत कोणतंही महत्त्व नाही, हे दाखवून देण्यासाठी प्रेषित पौलने लाक्षणिक अर्थानेही या शब्दाचा वापर केला.—रोम २:२८, २९; गल ३:२८.

  • यहुदी धर्म स्वीकारलेला.

    यहुदी धर्म स्वीकारणाऱ्‍या व्यक्‍तीला हे सूचित करतं. शास्त्रवचनांत सांगितलं आहे, की यहुदी धर्म स्वीकारलेल्या पुरुषाला सुंता करावी लागायची.—मत्त २३:१५; प्रेका १३:४३.

  • यहूदा.

    याकोब याची बायको लेआ हिच्यापासून त्याला झालेला चौथा मुलगा. याकोबने आपल्या मृत्यूच्या वेळी अशी भविष्यवाणी केली, की यहूदाच्या घराण्यातून एका महान राजा येईल आणि तो सर्वकाळ राज्य करेल. मानव म्हणून येशूचा जन्म यहूदाच्या वंशात झाला. यहूदा हे नाव यहूदाच्या वंशाला आणि नंतर यहूदा या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या राज्यालाही सूचित करतं. यहूदाला दक्षिणेचं राज्य म्हणूनही ओळखलं जायचं. यात यहूदा व बन्यामीन वंशांचा, आणि याजक व लेवी यांचा समावेश होता. यहूदाचा प्रदेश इस्राएल देशाच्या दक्षिण भागात असून, तिथे यरुशलेम शहर आणि मंदिर होतं.—उत्प २९:३५; ४९:१०; १रा ४:२०; इब्री ७:१४.

  • यहोवा.

    देवाचं नाव. हिब्रू भाषेतल्या चार अक्षरांचं (יהוה) भाषांतर. बायबलच्या या भाषांतरात ७,००० पेक्षा जास्त वेळा हे नाव आलं आहे.—अति. क४ आणि क५ पाहा.

  • याकोब.

    इसहाक आणि रिबका यांचा मुलगा. नंतर देवाने त्याला इस्राएल हे नाव दिलं आणि तो इस्राएलच्या लोकांचा (यांना इस्राएली आणि नंतर यहुदी म्हटलं गेलं) कुलप्रमुख बनला. त्याची १२ मुलं आणि त्यांचे वंशज यांच्यापासून इस्राएल राष्ट्राचे १२ वंश बनले. पुढेही इस्राएल राष्ट्राला किंवा इस्राएली लोकांना याकोबच्या नावानेच ओळखलं गेलं.—उत्प ३२:२८; मत्त २२:३२.

  • याजक.

    देवाचा नियुक्‍त प्रतिनिधी म्हणून लोकांची सेवा करणारा आणि त्यांना देवाबद्दल आणि त्याच्या नियमांबद्दल शिकवणारा. याजक हा, बलिदानं अर्पण करण्याद्वारे, आणि लोकांच्या वतीने देवाकडे प्रार्थना व याचना करण्याद्वारे देवापुढे लोकांचं प्रतिनिधित्व करायचा. मोशेचं नियमशास्त्र लागू होण्याआधी कुटुंबप्रमुखच आपल्या कुटुंबात याजकाची भूमिका पार पाडायचे. मोशेच्या नियमशास्त्रानुसार, लेवी वंशातून आलेल्या अहरोनच्या कुटुंबातल्या पुरुषांपासून एक याजकवर्ग तयार करण्यात आला. लेवी वंशातले इतर पुरुष त्यांचे सहायक म्हणून काम करायचे. नव्या कराराची सुरुवात करण्यात आली, तेव्हा ‘देवाचं इस्राएल’ हे याजकांचं राष्ट्र बनलं आणि येशू ख्रिस्त महायाजक बनला.—निर्ग २८:४१; इब्री ९:२४; प्रक ५:१०.

र

  • रथ.

    घोड्यांनी ओढलं जाणारं दोन चाकांचं वाहन. बायबलच्या काळात प्रवास करण्यासाठी, तसंच युद्धांसाठी याचा उपयोग व्हायचा.—निर्ग १४:२३; शास ४:१३; प्रेका ८:२८.

  • राजदंड.

    सहसा राजाच्या हातात असलेला आणि त्याच्या अधिकाराचं प्रतीक असलेला दांडा.—उत्प ४९:१०; इब्री १:८.

  • राज्यपाल.

    रोमच्या वरिष्ठ सभेच्या शासनाखाली असलेल्या एका प्रांताचा मुख्य अधिकारी. त्याला न्याय करायचा अधिकार होता आणि सेनाही त्याच्या अधिकाराखाली होती. वरिष्ठ सभेला त्याच्या निर्णयांबद्दल जाब विचारण्याचा हक्क असला, तरीसुद्धा प्रांतात त्याचाच अधिकार सर्वोच्च होता.—प्रेका १३:७; १८:१२.

  • राहाब.

    ईयोब, स्तोत्रं आणि यशया या पुस्तकांमध्ये लाक्षणिक अर्थाने वापरण्यात आलेला शब्द (यहोशवा या पुस्तकात सांगितलेली राहाब नाही). ईयोबच्या पुस्तकात जिथे हा शब्द आला आहे त्याच्या मागच्या-पुढच्या संदर्भावरून दिसून येतं, की ‘राहाब’ हा शब्द समुद्रातल्या एका महाकाय प्राण्याला सूचित करत असावा. इतर काही ठिकाणी, हा महाकाय प्राणी इजिप्तला सूचित करायला वापरण्यात आला आहे.—ईयो ९:१३; स्तो ८७:४; यश ३०:७; ५१:९, १०.

  • रूआख; न्यूमा.

    रूआख या हिब्रू शब्दाचं आणि न्यूमा  या ग्रीक शब्दाचं बऱ्‍याच मराठी बायबल भाषांतरांमध्ये सहसा “आत्मा” असं भाषांतर करण्यात आलं आहे. पण हे भाषांतर चुकीचं आहे, कारण यामुळे अमर आत्म्याची खोटी शिकवण पसरते. (स्तो १४६:४) रूआख  आणि न्यूमा  या शब्दांचा मूळ अर्थ “श्‍वास” असा होतो. पण हे शब्द पुढे दिलेल्या गोष्टींना सूचित करण्यासाठीही वापरण्यात आले आहेत: (१) वारा, (२) पृथ्वीवरच्या प्राण्यांमध्ये असलेली जीवन-शक्‍ती, (३) एखाद्या व्यक्‍तीला विशिष्ट प्रकारे बोलायला आणि वागायला प्रवृत्त करण्यासाठी त्याच्या मनातून येणारी प्रेरणा, (४) देवाकडून किंवा दुष्ट स्वर्गदूतांकडून येणारी वचनं किंवा संदेश, (५) अदृश्‍य प्राणी आणि (६) देवाची क्रियाशील शक्‍ती, म्हणजे पवित्र शक्‍ती. (निर्ग ३५:२१; स्तो १०४:२९; मत्त १२:४३; लूक ११:१३) म्हणून या भाषांतरात संदर्भ लक्षात घेऊन या शब्दांचं भाषांतर करण्यात आलं आहे.

  • रोगराई; रोगाची साथ.

    झपाट्याने पसरणारा आणि साथीचं रूप घेणारा एखादा जीवघेणा संसर्गजन्य रोग. देवाकडून मिळणारी शिक्षा म्हणून याचा सहसा उल्लेख करण्यात आला आहे.—गण १४:१२; यहे ३८:२२, २३; आम ४:१०.

ल

  • लबानोनची पर्वतरांग.

    लबानोन देशातल्या दोन पर्वतरांगांपैकी एक. लबानोनची एक पर्वतरांग पश्‍चिमेकडे आणि दुसरी पर्वतरांग पूर्वेकडे आहे. या दोन्ही पर्वतरांगांच्या मध्ये एक मोठं सुपीक खोरं आहे. लबानोनची पर्वतरांग जवळजवळ भूमध्य समुद्राच्या किनारपट्टीपासूनच सुरू होते आणि त्याच्या शिखरांची सरासरी उंची १,८०० मीटर ते २,१०० मीटर (६,००० फूट ते ७,००० फूट) आहे. प्राचीन काळात लबानोनमध्ये मोठ्या प्रमाणात देवदाराचे उंच-उंच वृक्ष असायचे. हे वृक्षं खूप मौल्यवान असून आसपासच्या राष्ट्रांमध्ये त्यांना खूप मागणी होती. (अनु १:७; स्तो २९:६; ९२:१२)—अति. ख७ पाहा.

  • लिव्याथान.

    कदाचित, पाण्यात राहणारा एक प्रकारचा प्राणी, कारण त्याचा संबंध सहसा पाण्याशी जोडण्यात आला आहे. ईयोब ३:८ आणि ४१:१ या वचनांत हा शब्द मगरीला किंवा पाण्यात राहणाऱ्‍या दुसऱ्‍या एखाद्या मोठ्या, शक्‍तिशाली प्राण्याला सूचित करतो असं दिसून येतं. स्तोत्र १०४:२६ मध्ये उल्लेख केलेला लिव्याथान एक प्रकारचा देवमासा असावा. इतर ठिकाणी याचा लाक्षणिक अर्थाने उल्लेख करण्यात आला आहे, आणि तो अमुक एक प्राणी आहे असं म्हणता येणार नाही.—स्तो ७४:१४; यश २७:१.

  • लेप्टन.

    ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या काळात, तांब्याचं किंवा कांस्याचं सगळ्यात लहान नाणं. बायबलच्या काही भाषांतरांमध्ये त्याचा अनुवाद दमडी किंवा टोले, असं करण्यात आला आहे. (मार्क १२:४२; लूक २१:२; तळटिपा.)—अति. ख१४ पाहा.

  • लेवी; लेवीय.

    याकोबची बायको लेआ हिच्यापासून त्याला झालेला तिसरा मुलगा; तसंच, त्याच्यापासून आलेला वंश. लेवीच्या तीन मुलांपासून लेव्यांचे तीन मुख्य गट बनले. “लेवी” हा शब्द सहसा संपूर्ण लेवी वंशाला लागू होतो; पण यात अहरोन याजकाच्या कुटुंबाचा समावेश होत नाही. लेवी वंशाला, वचन दिलेल्या देशात जमिनीचा वाटा देण्यात आला नाही. पण इतर वंशांना दिलेल्या प्रदेशांच्या हद्दीत त्यांना ४८ शहरं मात्र नेमून देण्यात आली होती.—अनु १०:८; १इत ६:१; इब्री ७:११.

  • लोग.

    बायबलमध्ये उल्लेख केलेलं सगळ्यात छोटं द्रव माप. यहुदी तालमूदमध्ये सांगितल्याप्रमाणे हा हिन मापाचा बारावा (१/१२) भाग आहे. त्या हिशोबाने एक लोग म्हणजे ०.३१ लिटर इतकं आहे. (लेवी १४:१०)—अति. ख१४ पाहा.

व

  • वडील; वडीलजन.

    वयाने मोठा असलेला पुरुष; पण, शास्त्रवचनांत या शब्दाचा उपयोग समाजात किंवा राष्ट्रात अधिकारपदावर असलेल्या जबाबदार व्यक्‍तीला सूचित करण्यासाठी केला आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात स्वर्गातल्या व्यक्‍तींच्या बाबतीतही हा शब्द वापरण्यात आला आहे. जी शास्त्रवचनं, मंडळीत नेतृत्व करणाऱ्‍या जबाबदार व्यक्‍तींना उद्देशून लिहिली आहेत, त्यांत प्रेसबिटेरोस  या ग्रीक शब्दाचं भाषांतर “वडील” असं करण्यात आलं आहे.—निर्ग ४:२९; नीत ३१:२३; १ती ५:१७; प्रक ४:४.

  • वधस्तंभ.

    एक उभा स्तंभ किंवा खांब. काही राष्ट्रं, एखाद्या व्यक्‍तीला मृत्युदंड देण्यासाठी आणि/किंवा लोकांना दिसावा म्हणून त्याचा मृतदेह लटकवून ठेवण्यासाठी याचा वापर करायचे. लोकांच्या मनात धाक बसवायला किंवा लटकवलेल्या माणसाचा जाहीरपणे अपमान करायला असं केलं जायचं. अश्‍शूरचे लोक तर फार क्रूरपणे बंदिवानांच्या पोटात टोकदार वधस्तंभ घुसवून छातीतून बाहेर काढायचे आणि त्यांची प्रेतं त्यावरच लटकवून ठेवायचे. यहुदी कायद्यानुसार, देवाची निंदा करणं किंवा मूर्तिपूजा करणं यांसारख्या मोठ्या अपराधांसाठी, आधी गुन्हेगाराला दगडमार केला जायचा किंवा दुसऱ्‍या एखाद्या पद्धतीने ठार मारलं जायचं. आणि मग त्याचा मृतदेह स्तंभावर किंवा झाडावर लटकवला जायचा. इतरांनी यापासून धडा घ्यावा म्हणून असं केलं जायचं. (अनु २१:२२, २३; २शमु २१:६, ९) रोमी लोक, कधीकधी गुन्हेगाराला शिक्षा म्हणून खांबाला नुसतंच बांधून ठेवायचे. खांबाला बांधलेला गुन्हेगार कधीकधी तर बऱ्‍याच दिवसांपर्यंत जिवंत राहायचा आणि शेवटी वेदनेने, तहान-भुकेने आणि उष्णतेने मरून जायचा. काही वेळा मात्र गुन्हेगाराच्या हातापायांना खिळे ठोकून त्याला वधस्तंभावर लटकवलं जायचं. येशूला अशाच प्रकारे मृत्युदंड देण्यात आला होता. (लूक २४:२०; योह १९:१४-१६; २०:२५; प्रेका २:२३, ३६) वधस्तंभासाठी स्टाऊरोस  हा ग्रीक शब्द आहे. हा शब्द क्रूसाला सूचित करत असल्याचा कोणताही पुरावा नाही. खरंतर ख्रिस्त येण्याआधीच, मूर्तिपूजक धर्म कित्येक शतकांपासून क्रूसाचा धार्मिक चिन्ह म्हणून वापर करत होते. स्टाऊरोस  हा शब्द, येशूच्या शिष्यांना छळ, दुःख आणि अपमान सहन करावा लागेल हे दाखवण्यासाठीही वापरण्यात आला आहे. त्यामुळे, मूळ शब्दाचा संपूर्ण अर्थ “वधस्तंभ” या शब्दातून व्यक्‍त होतो.—मत्त १६:२४; इब्री १२:२.

  • वल्हांडण.

    अबीब महिन्याच्या (याला नंतर निसान म्हणण्यात आलं) १४ व्या दिवशी पाळला जाणारा एक वार्षिक सण. इस्राएली लोकांची इजिप्तमधून सुटका झाली याची आठवण म्हणून हा सण पाळला जायचा. या सणात एक कोकरू (किंवा बकरी) कापून ते भाजण्याची पद्धत होती. नंतर त्याचं मांस कडू भाज्या आणि बेखमीर भाकरींसोबत खाल्लं जायचं.—निर्ग १२:२७; योह ६:४; १कर ५:७.

  • वाव.

    पाण्याची खोली मोजण्याचं एक माप. ते १.८ मीटर (६ फूट) इतकं होतं. (प्रेका २७:२८)—अति. ख१४ पाहा.

  • वीणा.

    एक प्रकारचं तंतुवाद्य. हे आधुनिक काळातल्या वीणेपेक्षा वेगळं होतं. इंग्रजीत, हार्प.  जुन्या काळातलं हे वाद्य कुठेही नेता येण्यासारखं आणि वजनाने हलकं असावं, कारण मिरवणुकांमध्येही ते वाजवलं जायचं. इजिप्तच्या स्मारकांवर असलेल्या चित्रांतून असं दिसतं, की या वीणा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकारांच्या होत्या. तसंच, यांतल्या तारांची संख्याही वेगवेगळी असायची.—१शमु १०:५; १कर १४:७.

  • वीत.

    अंतर मोजायचं माप. हाताच्या अंगठ्याच्या टोकापासून करंगळीच्या टोकापर्यंतचं अंतर. एका हाताचं माप ४४.५ सें.मी. (१७.५ इंच) होतं, या हिशोबाने एक वीत २२.२ सें.मी. (८.७५ इंच) इतकं असायचं. (निर्ग २८:१६; १शमु १७:४)—अति. ख१४ पाहा.

  • वेदीची शिंगं.

    काही वेदींच्या चार कोपऱ्‍यांवर, बाहेरच्या बाजूला वळलेले शिंगांच्या आकाराचे निमुळते भाग. (लेवी ८:१५; १रा २:२८)—अति. ख५ आणि ख८ पाहा.

  • वेदी.

    माती, दगड, चिरे किंवा लाकूड यांपासून बांधलेला आणि धातूचा मुलामा दिलेला एक चबुतरा किंवा उंचवटा. त्यावर उपासनेसाठी बलिदानं अर्पण केली जायची किंवा धूप जाळला जायचा. उपासना मंडपाच्या आणि मंदिराच्या पहिल्या खोलीत धूप जाळण्यासाठी एक छोटी “सोन्याची वेदी” होती; ती लाकडाची असून तिला सोन्याचा मुलामा दिलेला होता. आणि मंदिराच्या अंगणात, होमबली अर्पण करण्यासाठी एक मोठी “तांब्याची वेदी” होती. (निर्ग २७:१; ३९:३८, ३९; उत्प ८:२०; १रा ६:२०; २इत ४:१; लूक १:११)—अति. ख५ आणि ख८ पाहा.

  • वेश्‍या.

    यासाठी असलेला ग्रीक शब्द पोर्ने  हा मुळात “विकणं” या अर्थाच्या शब्दावरून आला आहे. हा शब्द सहसा स्त्रीला सूचित करत असला, तरी बायबलमध्ये पुरुष वेश्‍यांचाही उल्लेख आला आहे. मोशेच्या नियमशास्त्रात वेश्‍याव्यवसायाचा निषेध करण्यात आला होता आणि वेश्‍येने कमावलेले पैसे यहोवाच्या मंदिरात दान म्हणून दिले जाऊ शकत नव्हते. याउलट, मूर्तिपूजक धर्मांत पैसा कमावण्याचा मार्ग म्हणून मंदिरात वेश्‍या ठेवायची प्रथा होती. (अनु २३:१७, १८; १रा १४:२४) बायबलमध्ये या शब्दाचा लाक्षणिक अर्थानेही उपयोग केला आहे. एकीकडे देवाची उपासना करण्याचा दावा करत असताना, दुसरीकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारे मूर्तिपूजा करणाऱ्‍या व्यक्‍तींना, राष्ट्रांना किंवा संघटनांना सूचित करण्यासाठी या शब्दाचा लाक्षणिक रीत्या उपयोग केला आहे. उदाहरणार्थ, प्रकटीकरणात “मोठी बाबेल” म्हणण्यात आलेल्या धार्मिक संघटनेला वेश्‍या म्हणण्यात आलं आहे. कारण ती सत्तेसाठी आणि आर्थिक फायद्यासाठी या जगाच्या शासकांसोबत संबंध ठेवते.—प्रक १७:१-५; १८:३; १इत ५:२५.

  • व्यभिचार.

    आपला नवरा किंवा बायकोशिवाय दुसऱ्‍या कोणत्याही व्यक्‍तीसोबत स्वेच्छेने लैंगिक संबंध ठेवणं.—निर्ग २०:१४; मत्त ५:२७; १९:९.

श

  • शपथ.

    एखादी गोष्ट खरी आहे हे प्रतिज्ञा घेऊन सांगणं, किंवा एखादी गोष्ट करण्याचं किंवा न करण्याचं वचन देणं. हे असं वचन आहे जे सहसा आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्‍तीला किंवा खासकरून देवाला दिलं जातं. यहोवाने अब्राहामसोबत करार केला, आणि नंतर शपथ घेऊन त्याला त्या कराराची हमी दिली.—उत्प १४:२२; इब्री ६:१६, १७.

  • शबाट.

    बाबेलच्या बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांच्या पवित्र कॅलेंडरचा ११ वा महिना आणि कृषी कॅलेंडरचा ५ वा महिना. हा महिना, जानेवारीच्या मध्यापासून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत असायचा. (जख १:७)—अति. ख१५ पाहा.

  • शब्बाथ.

    “विश्रांती घेणं; थांबणं” या अर्थाच्या हिब्रू शब्दावरून. हा यहुदी आठवड्याचा सातवा दिवस आहे (म्हणजे शुक्रवारच्या सूर्यास्तापासून शनिवारच्या सूर्यास्तापर्यंत). वर्षातल्या इतर काही सणाच्या दिवसांना, तसंच ७ व्या आणि ५० व्या वर्षालाही शब्बाथ म्हटलं जायचं. शब्बाथाच्या दिवशी मंदिरातल्या याजकांच्या सेवेशिवाय दुसरं कोणतंही काम करायची परवानगी नव्हती. शब्बाथाच्या वर्षी शेती केली जात नव्हती. तसंच, या काळात यहुदी लोक आपल्या बांधवांना कर्ज फेडायला जबरदस्ती करत नव्हते. मोशेच्या नियमशास्त्रात शब्बाथाविषयी जे नियम देण्यात आले होते, ते पाळणं कठीण नव्हतं. पण धार्मिक पुढाऱ्‍यांनी हळूहळू त्यांत आणखी नियमांची भर घातली. आणि येशूच्या काळात तर लोकांना ते नियम पाळणं खूप कठीण होऊन बसलं होतं.—निर्ग २०:८; लेवी २५:४; लूक १३:१४-१६; कल २:१६.

  • शमीनीथ.

    संगीताशी संबंधित असलेला एक शब्द. याचा शब्दशः अर्थ “आठवा” असा होतो. हे कदाचित, खालच्या स्वराला सूचित करत असावं. वाद्यांच्या बाबतीत हा शब्द कदाचित अशा वाद्यांना सूचित करण्यासाठी असावा, जी वाद्यं खालच्या (खरज) सुरात वाजवली जातात. आणि गाण्याच्या बाबतीत याचा अर्थ कदाचित खालच्या सुरात गाणं आणि संगीत वाजवणं असा होत असावा.—१इत १५:२१; स्तो ६:उपरीलेखन; १२:उपरीलेखन.

  • शरण-शहरं.

    लेव्यांना देण्यात आलेली शहरं. वचन दिलेल्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी सहा शरण-शहरं होती. यहोवाने सांगितल्याप्रमाणे, आधी मोशेने आणि नंतर यहोशवाने ही शरण-शहरं नेमली होती. एखाद्याच्या हातून जर चुकून किंवा नकळत खून झाला, तर रक्‍ताचा सूड घेणाऱ्‍यापासून स्वतःला वाचवण्यासाठी तो यांपैकी एखाद्या शहरात आश्रय घेऊ शकत होता. शहराकडे आल्यावर तो शहराच्या दरवाजाजवळ असलेल्या वडीलजनांना घडलेली सगळी हकीगत सांगायचा आणि वडीलजन त्याला शहरात घ्यायचे. पण, जाणूनबुजून खून करणाऱ्‍याने या व्यवस्थेचा गैरफायदा घेऊ नये, म्हणून आश्रयासाठी आलेल्या माणसाला आधी स्वतःला निर्दोष सिद्ध करावं लागायचं. आणि त्यासाठी त्याला खून झालेल्या शहरात न्यायचौकशीसाठी उभं राहावं लागायचं. तो निर्दोष असल्याचं सिद्ध झालं, तर त्याला परत शरण-शहरात पाठवलं जायचं. तिथे त्याला आयुष्यभर किंवा महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत राहावं लागायचं.—गण ३५:६, ११-१५, २२-२९; यहो २०:२-८.

  • शलमोनचा वऱ्‍हांडा.

    येशूच्या काळात मंदिरातल्या बाहेरच्या अंगणाच्या पूर्वेकडे छत असलेला मार्ग. हा मार्ग शलमोनच्या मंदिराचा अवशेष असल्याचं मानलं जायचं. येशू एकदा हिवाळ्यात तिथे फिरत असल्याचा उल्लेख आहे आणि सुरुवातीचे ख्रिस्ती तिथे उपासना करण्यासाठी एकत्र जमायचे. (योह १०:२२, २३; प्रेका ५:१२)—अति. ख११ पाहा.

  • शस्त्रसामग्री.

    आपल्या संपूर्ण शरीराचं संरक्षण करण्यासाठी सैनिक घालायचे ते कवच; जसं की, टोप, चिलखत, कमरपट्टा, पायांवरचं कवच आणि ढाल.—१शमु ३१:९; इफि ६:१३-१७.

  • शाप.

    एखाद्या व्यक्‍तीसोबत किंवा गोष्टीसोबत वाईट घडेल अशी धमकी देणं किंवा बोलून दाखवणं. शाप देणं हे शिवीगाळ करणं किंवा अतिशय रागात येऊन काही बोलणं यांपेक्षा वेगळं आहे. शाप म्हणजे कोणाचं वाईट होईल असं इतरांसमोर बोलून दाखवणं. देवाने किंवा त्याने नियुक्‍त केलेल्या व्यक्‍तीने दिलेला शाप एक भविष्यवाणी असून ती नक्की पूर्ण होईल असं मानलं जायचं.—उत्प १२:३; गण २२:१२; गल ३:१०.

  • शास्त्र (शास्त्रवचनं).

    देवाच्या वचनाचं पवित्र लिखाण. हे शब्द फक्‍त ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतच सापडतात.—लूक २४:२७; २ती ३:१६.

  • शास्त्री.

    हिब्रू शास्त्रवचनांच्या प्रती तयार करणारा. येशू पृथ्वीवर आला त्या काळात, नियमशास्त्राचे विद्वान असलेल्या एका खास गटाच्या सदस्यांना शास्त्री म्हटलं जायचं. ते येशूचा विरोध करायचे.—एज ७:६; मार्क १२:३८, ३९; १४:१.

  • शिओल.

    एक हिब्रू शब्द. यासाठी असलेला ग्रीक शब्द “हेडीस” आहे. त्याचं भाषांतर “कबर” असं करण्यात आलं आहे. एखाद्या व्यक्‍तीला पुरलं जातं ती कबर नाही, तर मृत्यूनंतर सगळी माणसं जातात अशी एक लाक्षणिक कबर.—उत्प ३७:३५; स्तो १६:१०; प्रेका २:३१ (तळटिपा).

  • शिवान.

    बाबेलच्या बंदिवासातून सुटका झाल्यावर यहुद्यांच्या पवित्र कॅलेंडरमधल्या तिसऱ्‍या महिन्याचं आणि कृषी कॅलेंडरमधल्या नवव्या महिन्याचं नाव. हा महिना मे महिन्याच्या मध्यापासून जून महिन्याच्या मध्यापर्यंत असायचा. (एस्ते ८:९)—अति. ख१५ पाहा.

  • शुद्ध.

    बायबलमध्ये, हा शब्द केवळ शारीरिक स्वच्छतेसाठीच नाही, तर नैतिक आणि उपासनेच्या बाबतीत निर्दोष किंवा निष्कलंक स्थिती टिकवून ठेवण्याच्या किंवा ती स्थिती परत मिळवण्याच्या बाबतीत वापरण्यात आला आहे. तसंच, दूषित किंवा भ्रष्ट करणाऱ्‍या कोणत्याही गोष्टीपासून दूर राहण्याच्या बाबतीतसुद्धा हा शब्द वापरण्यात आला आहे. मोशेच्या नियमशास्त्रात हा शब्द नियमाप्रमाणे शुद्ध असण्याला सूचित करतो.—लेवी १०:१०; स्तो ५१:७; मत्त ८:२; १कर ६:११.

  • शेकेल.

    इब्री लोक वापरत असलेलं वजनाचं आणि चलनाचं एक प्रमाण माप. शेकेलचं वजन ११.४ ग्रॅम इतकं होतं. बायबलमध्ये ‘पवित्र ठिकाणाचं ठरलेलं शेकेल’ हा वाक्यांश सापडतो; वजन अचूक असावं किंवा वजन उपासना मंडपात ठेवलेल्या प्रमाण मापाइतकं असावं, या गोष्टीवर जोर द्यायला हा वाक्यांश वापरण्यात आला असावा. याशिवाय राजमहालात शाही शेकेल, म्हणजे प्रमाण वजनाचं मापही ठेवलं जात असावं (शाही शेकेल सर्वसामान्य शेकेलपेक्षा वेगळं होतं).—निर्ग ३०:१३.

  • शेवटचे दिवस.

    बायबलच्या भविष्यवाण्यांमध्ये हे शब्द आणि यांसारखे इतर शब्द, जसं की ‘शेवटचा काळ,’ अशा एका काळाला सूचित करण्यासाठी वापरण्यात आले आहेत, जेव्हा ऐतिहासिक घटना कळस गाठतील. (यहे ३८:१६; दान १०:१४; प्रेका २:१७) भविष्यवाणी ज्या घटनेसंबंधी आहे त्यानुसार, हा कालावधी फक्‍त काही वर्षांचा किंवा अनेक वर्षांचाही असू शकतो. पण बायबलमध्ये हे शब्द, खासकरून येशूच्या अदृश्‍य उपस्थितीच्या वेळी सुरू असलेल्या सध्याच्या जगाच्या ‘शेवटच्या दिवसांना’ सूचित करण्यासाठी वापरण्यात आले आहेत.—२ती ३:१; याक ५:३; २पेत्र ३:३.

  • शोक करणं.

    एखाद्याच्या मृत्यूबद्दल किंवा दुसऱ्‍या एखाद्या संकटाबद्दल दुःख व्यक्‍त करणं. बायबलच्या काळात दुःखद घटनेसाठी काही काळ शोक करायची पद्धत होती. शोक करणारे मोठमोठ्याने रडण्यासोबतच विशिष्ट प्रकारचे कपडे घालायचे, डोक्यावर राख टाकायचे, आपले कपडे फाडायचे आणि छाती बडवायचे. काही वेळा अंत्यविधीला पैसे देऊन शोक करणाऱ्‍यांना खास बोलावून घेतलं जायचं.—उत्प २३:२; एस्ते ४:३; प्रक २१:४.

  • शोकगीत.

    दुःख व्यक्‍त करण्यासाठी रचलेली कविता किंवा गीत. जसं की, प्रिय व्यक्‍तीच्या किंवा मित्राच्या मृत्यूमुळे झालेलं दुःख; विलापगीत.—२शमु १:१७; स्तो ७:उपरीलेखन.

  • शोमरोन.

    हे शहर जवळजवळ २०० वर्षांपर्यंत, इस्राएलच्या उत्तरेकडे असलेल्या दहा-वंशांच्या राज्याची राजधानी होतं. तसंच, या संपूर्ण राज्याचं नावही शोमरोन होतं. हे शहर शोमरोन नावाच्याच डोंगरावर वसलेलं होतं. पुढे येशूच्या काळात, उत्तरेकडचं गालील आणि दक्षिणेकडचं यहूदीया यांच्या मधोमध असलेल्या एका प्रांताचं हे नाव होतं. येशूने गावोगावी प्रवास करताना सहसा या प्रांतात प्रचार करायचं टाळलं. पण काही वेळा तिथून जाताना तो तिथल्या लोकांशी बोलला. पुढे, पेत्रने जेव्हा राज्याच्या दुसऱ्‍या लाक्षणिक किल्लीचा उपयोग केला, तेव्हा शोमरोनी लोकांवर पवित्र शक्‍ती आली. (१रा १६:२४; योह ४:७; प्रेका ८:१४)— अति.ख१० पाहा.

  • शोमरोनी.

    सुरुवातीला उत्तरेकडच्या दहा-वंशांच्या राज्यात राहणाऱ्‍या इस्राएली लोकांना शोमरोनी म्हटलं जायचं. पण, इ.स.पू. ७४० मध्ये अश्‍शूरी लोकांनी शोमरोनवर विजय मिळवला, तेव्हा अश्‍शूरी लोकांसोबत आलेल्या विदेशी लोकांनाही शोमरोनी हेच नाव पडलं. येशूच्या काळात कोणत्याही विशिष्ट जातीच्या किंवा राष्ट्राच्या लोकांना शोमरोनी म्हटलं जात नव्हतं. तर, प्राचीन शखेम आणि शोमरोन या प्रदेशांच्या आसपासच्या परिसरातल्या धार्मिक पंथाच्या सदस्यांनाच सहसा शोमरोनी म्हटलं जायचं. या पंथाच्या सदस्यांचे विश्‍वास यहुदी धर्म मानणाऱ्‍यांपेक्षा खूपच वेगळे होते.—योह ८:४८.

  • शांती-अर्पण.

    यहोवासोबत शांतीचे संबंध ठेवण्यासाठी त्याला दिलं जाणारं बलिदान. बलिदान देणारा आणि त्याचं कुटुंब, तसंच बलिदान अर्पण करणारा याजक आणि त्या वेळी मंदिरात सेवा करणारे इतर याजक हे सगळे त्या बलिदानातून खायचे. बलिदान केलेल्या प्राण्याची चरबी जाळल्याने जो धूर व्हायचा, तो जणू यहोवाला दिला जायचा. तसंच, जीवनाला सूचित करणारं प्राण्याचं रक्‍तसुद्धा देवाला दिलं जायचं. हे सगळं जणू काही, याजक आणि अर्पण देणारा यहोवासोबत बसून जेवत असल्यासारखं होतं. ही गोष्ट त्यांच्यात शांतीचे संबंध असल्याचं दाखवून द्यायची.—लेवी ७:२९, ३२; अनु २७:७.

  • शिंग.

    प्राण्यांचं शिंग. याचा उपयोग पाणी पिण्याचं, तेलाचं, सौंदर्यप्रसाधनांचं भांडं म्हणून आणि दौत म्हणून केला जायचा. तसंच, वाद्य म्हणूनही त्याचा उपयोग केला जायचा. याशिवाय लोकांना इशारा देण्यासाठी शिंग फुंकलं जायचं. (१शमु १६:१, १३; १रा १:३९; यहे ९:२) बायबलमध्ये सहसा सामर्थ्य आणि विजय यांना सूचित करण्यासाठी लाक्षणिक अर्थाने त्याचा उपयोग करण्यात आला आहे.—अनु ३३:१७; मीख ४:१३; जख १:१९.

ष

  • षंढ.

    शब्दशः खच्चीकरण केलेला पुरुष. अशा नपुंसक पुरुषांना, सहसा दरबारात सहायक म्हणून नेमलं जायचं. तसंच, त्यांना राणीचं व उपपत्नींचं रक्षण करायला व त्यांना मदत करायलाही नेमलं जायचं. मुळात षंढ नसलेल्या, पण राजाच्या दरबारात जबाबदाऱ्‍या हाताळण्यासाठी अधिकारी म्हणून नेमलेल्या पुरुषाच्या बाबतीतही हा शब्द वापरला जायचा. लाक्षणिक अर्थाने, “स्वर्गाच्या राज्यासाठी स्वतःला नपुंसक” करणाऱ्‍यांसाठीही, म्हणजे देवाची जास्त प्रमाणात सेवा करता यावी म्हणून स्वतःवर संयम बाळगणाऱ्‍यांसाठीही हा शब्द वापरण्यात आला आहे.—मत्त १९:१२; एस्ते २:१५; प्रेका ८:२७.

स

  • सखोल समज.

    बायबलमध्ये हे शब्द, एखादी परिस्थिती फक्‍त वरवर नाही, तर अगदी चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या क्षमतेला सूचित करण्यासाठी वापरण्यात आली आहे. सखोल समज असलेली व्यक्‍ती शहाणपणाने आणि सुज्ञतेने वागते.

  • सदूकी.

    यहुदी धर्मातला एक प्रमुख पंथ. या पंथाचे लोक, समाजातल्या श्रीमंत व उच्च वर्गाचे आणि याजकांपैकी होते. मंदिरातल्या कारभारावर त्यांचं नियंत्रण होतं. सदूकी लोक, परूशी पाळत असलेल्या तोंडी परंपरा आणि त्यांचे विश्‍वास मानत नव्हते. पुनरुत्थानावर तसंच, स्वर्गदूतांच्या अस्तित्वावरही त्यांचा विश्‍वास नव्हता. त्यांनी येशूचा विरोध केला.—मत्त १६:१; प्रेका २३:८.

  • सभास्थान (सिनगॉग).

    या शब्दाचा अर्थ “एकत्र आणणं; सभा” असा होतो. पण, बऱ्‍याच शास्त्रवचनांत हा शब्द अशा इमारतीला किंवा ठिकाणाला सूचित करतो, जिथे यहुदी लोक शास्त्राचं वाचन करण्यासाठी, सूचना देण्यासाठी, प्रचारासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमायचे. येशूच्या काळात इस्राएलमधल्या प्रत्येक गावात एक सभास्थान होतं आणि मोठ्या शहरांत एकापेक्षा जास्त सभास्थानं असायची.—लूक ४:१६; प्रेका १३:१४, १५.

  • समर्पणाचा सण.

    ॲन्टिऑकस एपिफेनस याने मंदिर अपवित्र केल्यानंतर, मंदिराचं शुद्धीकरण केलं गेलं. या गोष्टीची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी हा सण पाळला जायचा. किसलेव या महिन्याच्या २५ व्या दिवशी सुरू होणारा हा सण आठ दिवस साजरा केला जायचा.—योह १०:२२.

  • समर्पणाचं पवित्र चिन्ह.

    शुद्ध सोन्याची एक चकाकणारी पट्टी; महायाजक ती आपल्या पगडीवर समोरच्या बाजूला बांधायचा. तिच्यावर हिब्रू भाषेत, “पावित्र्य यहोवाचं आहे” असं कोरण्यात आलं होतं. (निर्ग ३९:३०)—अति ख५ पाहा.

  • सम्राटाचं अंगरक्षक दल.

    रोमी सम्राटाचे अंगरक्षक म्हणून कार्य करायला स्थापन करण्यात आलेलं रोमी सैनिकांचं एक दल. या अंगरक्षक दलाचं राजकारणात खूप महत्त्व होतं; हे दल एखाद्या सम्राटाला पाठिंबा देऊ शकत होतं किंवा त्याला पदावरून काढूही शकत होतं.—फिलि १:१३.

  • सराफदूत.

    स्वर्गात यहोवाच्या राजासनाच्या आजूबाजूला उभे राहणारे अदृश्‍य प्राणी. सराफदूतासाठी असलेला हिब्रू शब्द सेराफिम  याचा शब्दशः अर्थ “जळत असलेले” असा होतो.—यश ६:२, ६.

  • सहायक सेवक.

    डायकोनोस या ग्रीक शब्दावरून. सहसा याचं भाषांतर “सेवक” असं केलं जातं. “सहायक सेवक” हे शब्द अशा बांधवाला सूचित करतात, जो मंडळीतल्या वडीलवर्गाचा सहायक म्हणून सेवा करतो. सेवेची ही जबाबदारी मिळण्यासाठी त्याने बायबलमध्ये दिलेल्या पात्रता पूर्ण करणं आवश्‍यक आहे.—१ती ३:८-१०, १२.

  • साक्षलेख.

    मोशेला देण्यात आलेल्या दोन दगडी पाट्यांवर ज्या दहा आज्ञा लिहिल्या होत्या त्यांना हे सूचित करतं.—निर्ग ३१:१८.

  • सीयोन; सीयोन पर्वत.

    यरुशलेमच्या दक्षिणपूर्वेकडच्या डोंगरावर असलेल्या यबूस या यबूसी लोकांचा किल्ला असलेल्या शहराचं नाव. दावीदने या शहरावर विजय मिळवल्यावर तिथे आपला राजमहाल बांधला. या शहराला “दावीदपूर” असं नाव पडलं. (२शमु ५:७, ९) दावीदने कराराची पेटी या शहरात आणल्यावर सीयोन पर्वत हा यहोवाच्या दृष्टीत खासकरून पवित्र ठरला. नंतर, या नावात मोरिया पर्वतावर असलेल्या मंदिराच्या परिसराचाही समावेश केला जाऊ लागला. कधीकधी संपूर्ण यरुशलेम शहराला सीयोन म्हटलं जायचं. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत सहसा या शब्दाचा लाक्षणिक अर्थाने उपयोग करण्यात आला आहे.—स्तो २:६; १पेत्र २:६; प्रक १४:१.

  • सीरिया; सीरियाचे लोक.—

    अराम; अरामी लोक पाहा.

  • सुटकेचं वर्ष; योबेल वर्ष.

    इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात आले, तेव्हापासूनचं प्रत्येक ५० वं वर्ष. सुटकेच्या या वर्षात त्यांना जमिनीची मशागत करायची नव्हती, आणि इब्री दासांना मुक्‍त करायचं होतं. एखाद्याने आपली वारशाची जमीन विकली असेल, तर ती त्याला त्या वर्षी परत मिळायची. एका अर्थाने, हे संपूर्ण वर्षं उत्सवाचं आणि सुटकेचं वर्ष होतं; कारण, देवाने ते राष्ट्र स्थापन केलं होतं तेव्हा त्याची जशी चांगली स्थिती होती, तशीच स्थिती त्या संपूर्ण राष्ट्राची सुटकेच्या वर्षी व्हायची.—लेवी २५:१०.

  • सुभेदार.

    बाबेलच्या आणि पर्शियाच्या साम्राज्यात प्रांताचा राज्यपाल किंवा राजप्रतिनिधी. राजा सुभेदाराला एखाद्या प्रांतावर मुख्य अधिकारी म्हणून नेमायचा.—एज ८:३६; दान ६:१.

  • सुर्ती.

    उत्तर आफ्रिकेतल्या आजच्या काळातल्या ट्युनिसियाच्या आणि लिबियाच्या समुद्रकिनाऱ्‍याला लागून असलेल्या दोन मोठ्या उथळ खाड्या. जुन्या काळात खलाशांना या भागातून जहाज न्यायला भीती वाटायची, कारण भरती-ओहोटीमुळे पाण्याखाली वाळूचे बांध सतत वर-खाली होत असल्यामुळे त्यांचा अंदाज घेणं कठीण व्हायचं. (प्रेका २७:१७)—अति. ख१३ पाहा.

  • सेया.

    एक घन माप. हे बथ या द्रव मापानुसार मोजलं तर ते ७.३३ लिटर इतकं भरेल. (२रा ७:१)—अति. ख१४ पाहा.

  • सेला.

    स्तोत्रं आणि हबक्कूक या पुस्तकांत संगीताशी किंवा गीत गाण्याशी संबंधित असलेला शब्द. याचा अर्थ मनन करायला किंवा व्यक्‍त केलेल्या भावनेवर जोर द्यायला घेतलेला विराम असा होऊ शकतो. हा विराम वाद्य वाजवताना किंवा गाणं गाताना किंवा दोन्ही गोष्टी करताना घेतला जात असावा. या शब्दासाठी ग्रीक सेप्टुअजिंट  यात डायसाल्मा  हा शब्द वापरला आहे. त्याचा अर्थ ‘गाण्याच्या मधे वाद्यांवर वाजवली जाणारी धून’ असा होतो.—स्तो ३:४; हब ३:३.

  • सैतान.

    “विरोध करणारा” या अर्थाचा एक हिब्रू शब्द. बायबलमध्ये सहसा तो देवाच्या मुख्य शत्रूला सूचित करतो. त्याला दियाबल सैतान असंही म्हटलं आहे.—ईयो १:६; मत्त ४:१०; प्रक १२:९.

  • सोडवणारा.

    जवळच्या नातेवाइकाला गुलामगिरीतून सोडवण्याचा, त्याला परत विकत घेण्याचा, तसंच त्याची मालमत्ता किंवा त्याचा वारसा परत विकत घेण्याचा हक्क असणारा किंवा कर्तव्य असणारा माणूस. (लेवी २५:२५-२७, ४७-५४) त्या नातेवाइकाच्या विधवेशी लग्न करून त्याचा वंश पुढे चालवण्याच्या प्रथेच्या बाबतीतही हा शब्द वापरला गेला आहे.—रूथ ४:७-१०.

  • संचालक.

    बायबलच्या स्तोत्रं या पुस्तकात यासाठी असलेल्या हिब्रू शब्दाचा अर्थ कदाचित, गीतांची व्यवस्था करणारा आणि गायल्या जाणाऱ्‍या गीतांचं निर्देशन करणारा असा होतो. तसंच, लेवी गायकांकडून गाण्याची तयारी करून घेणाऱ्‍याला, त्यांना प्रशिक्षण देणाऱ्‍याला आणि संगीताच्या खास कार्यक्रमांचं नेतृत्व करणाऱ्‍यालाही हा शब्द सूचित करतो. इतर भाषांतरांमध्ये या शब्दासाठी “मुख्य संगीतकार” किंवा “संगीत निर्देशक” हे शब्द वापरण्यात आले आहेत.—स्तो ४:उपरीलेखन; स्तो ५:उपरीलेखन.

  • संदेष्टा.

    देव आपली इच्छा ज्याच्याद्वारे सर्वांना कळवतो ती व्यक्‍ती. संदेष्टे देवाच्या वतीने बोलायचे. ते फक्‍त भविष्यवाण्याच नाही, तर यहोवाच्या शिकवणी, त्याच्या आज्ञा आणि त्याचे न्याय-निर्णयही कळवायचे.—आम ३:७; २पेत्र १:२१.

  • सुंता.

    पुरुषाच्या जननेंद्रियाची पुढील त्वचा कापून टाकणं. अब्राहामला आणि त्याच्या वंशजांना सुंता करणं आवश्‍यक होतं, पण ख्रिश्‍चनांना मात्र सुंता करणं आवश्‍यक नाही. बऱ्‍याच शास्त्रवचनांमध्ये लाक्षणिक अर्थानेसुद्धा या शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे.—उत्प १७:१०; १कर ७:१९; फिलि ३:३.

  • स्तोत्र; स्तुतिगीत.

    देवाच्या स्तुतीसाठी गायलं जाणारं गीत. स्तोत्रांना सहसा चाल लावली जायची आणि देवाची उपासना करणारे ही स्तोत्रं गायचे. यरुशलेममधल्या यहोवाच्या मंदिरात सार्वजनिक उपासनेच्या वेळी स्तोत्रं गायली जायची.—लूक २०:४२; प्रेका १३:३३; याक ५:१३.

  • स्तोयिक पंथातले तत्त्वज्ञानी लोक.

    ग्रीक तत्त्वज्ञानी लोकांचा एक गट. त्यांचा असा विश्‍वास होता की तर्कशुद्ध पद्धतीने आणि निसर्गाप्रमाणे जीवन जगलं, तर एक व्यक्‍ती जीवनात आनंदी होऊ शकते. त्यांच्या मते, खऱ्‍या अर्थाने बुद्धिमान असलेल्या माणसावर वेदनेचा किंवा सुखाचा काहीच परिणाम होत नाही.—प्रेका १७:१८.

  • स्तंभ; खांब.

    स्मारक म्हणून किंवा एखाद्या ऐतिहासिक घटनेची साक्ष म्हणून उभारण्यात आलेला दगड. खोट्या दैवतांची उपासना करणाऱ्‍या लोकांनी उपासनेसाठी पूजेचे स्तंभ उभारले, आणि काही वेळा इस्राएली लोकांनीही त्यांच्यासारखंच केलं.—१रा १४:२३.

  • स्मरण-सूचना.

    हिब्रू शास्त्रवचनांमध्ये हा शब्द सहसा देवाने त्याच्या लोकांना दिलेल्या कायद्यांना, आज्ञांना, नियमांना आणि इशारा देणाऱ्‍या संदेशांना सूचित करतो. हा शब्द, “एखादी गोष्ट वारंवार करणं” या अर्थाच्या मूळ शब्दावरून आला आहे. त्यामुळे स्मरण-सूचना म्हणजे, एखादी महत्त्वाची गोष्ट करायची आठवण किंवा स्मरण करून देणं.—अनु ४:४५; स्तो १९:७.

  • स्मारक कबर.

    मेलेल्या व्यक्‍तीचा मृतदेह ठेवला जायचा ते ठिकाण. यासाठी असलेला ग्रीक शब्द नेमियोन  असून तो “स्मरण करून देणं” या अर्थाच्या एका क्रियापदावरून आला आहे. यावरून मेलेल्या व्यक्‍तीची पुढेही आठवण राहते असं सूचित होतं.—योह ५:२८, २९.

  • स्वतंत्र माणूस; स्वतंत्र दास.

    रोमी शासनकाळात, स्वतंत्र म्हणून जन्माला आलेला आणि नागरिकत्वाचे सगळे हक्क असलेला माणूस हा “स्वतंत्र माणूस” होता; तर ज्याला गुलामीतून मुक्‍त करण्यात आलं होतं तो ‘स्वतंत्र दास’ होता. अशा दासाला जर अधिकृतपणे मुक्‍त करण्यात आलं असेल तर त्याला रोमी नागरिकत्व मिळायचं, पण तो राजकीय पद स्वीकारू शकत नव्हता; तर, अनधिकृतपणे मुक्‍त केलेल्या मनुष्याला गुलामीतून सुटका मिळायची, पण त्याला सगळेच नागरी हक्क मिळायचे नाहीत.—१कर ७:२२.

  • स्वर्गदूत.

    यासाठी हिब्रू भाषेत मलाख आणि ग्रीक भाषेत ॲग्गेलोस  हे शब्द वापरण्यात आले आहेत. या दोन्ही शब्दांचा शब्दश: अर्थ, “दूत” असा असला, तरी स्वर्गातून आलेल्या दूतांच्या बाबतीत “स्वर्गदूत” असं भाषांतर करण्यात आलं आहे. (उत्प १६:७; ३२:३; याक २:२५; प्रक २२:८) स्वर्गदूत हे शक्‍तिशाली अदृश्‍य व्यक्‍ती असून मानवांना निर्माण केल्याच्या बऱ्‍याच काळाआधी देवाने त्यांना निर्माण केलं होतं. बायबलमध्ये त्यांना “लाखो पवित्र,” “देवाची मुलं,” आणि ‘पहाटेचे तारे’ असंही म्हटलं आहे. (अनु ३३:२; ईयो १:६; ३८:७) मुलांना जन्म देण्याची क्षमता देऊन त्यांना बनवण्यात आलं नव्हतं, तर त्यांच्यापैकी प्रत्येकाला देवाने बनवलं होतं. त्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. (दान ७:१०) बायबल सांगतं की प्रत्येक स्वर्गदूताला एक नाव आणि त्याचं स्वतःचं वेगळं व्यक्‍तिमत्त्व आहे. पण असं असलं, तरी ते नम्र आहेत, आणि माणसांनी त्यांची उपासना करायची इच्छा दाखवली तेव्हा त्यांनी ती नाकारली. त्यांच्यापैकी अनेकांनी तर आपलं नावही सांगायचं टाळलं. (उत्प ३२:२९; लूक १:२६; प्रक २२:८, ९) स्वर्गदूतांचे वेगवेगळे हुद्दे असून त्यांना वेगवेगळी कामं नेमून दिली जातात; जसं की यहोवाच्या राजासनापुढे सेवा करणं, त्याचे संदेश पोहोचवणं, यहोवाच्या पृथ्वीवरच्या सेवकांना मदत करणं, त्याचे न्यायदंड बजावणं आणि आनंदाचा संदेश घोषित करायच्या कामात मदत करणं. (२रा १९:३५; स्तो ३४:७; लूक १:३०, ३१; प्रक ५:११; १४:६) भविष्यात होणाऱ्‍या हर्मगिदोनच्या युद्धात ते येशूसोबत मिळून लढाई करतील.—प्रक १९:१४, १५.

  • स्वर्गाची राणी.

    यिर्मयाच्या काळात, देवाला सोडून दिलेले इस्राएली लोक जिची उपासना करायचे, त्या देवीला दिलेली पदवी. काहींचं म्हणणं आहे की ही कदाचित बाबेलची इश्‍तार (अस्तार्ते) देवी असावी. जुन्या काळातले सुमेरी लोक तिच्यासारख्याच देवीची उपासना करायचे. त्या देवीचं नाव इनान्‍ना म्हणजे ‘स्वर्गाची राणी’ असं होतं. शिवाय तिला प्रजननाची देवीही मानलं जायचं. इजिप्तच्या एका शिलालेखात अस्तार्तेला “स्वर्गातली स्त्री” असंही म्हटलं आहे.—यिर्म ४४:१९.

ह

  • हर्मगिदोन.

    हा हिब्रू शब्द हर मघिदोन  यावरून आलेला असून, त्याचा अर्थ “मग्गिदोचा डोंगर” असा होतो. हा शब्द, “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धासाठी” वापरण्यात आला आहे. या युद्धात ‘संपूर्ण पृथ्वीवरचे राजे’ यहोवाशी युद्ध करायला एकत्र येतात. (प्रक १६:१४, १६; १९:११-२१)—मोठं संकट पाहा.

  • हर्मेस.

    ग्रीक लोकांचा एक देव; झ्यूस दैवताचा मुलगा. पौल हा हर्मेस आहे असं लुस्त्रच्या लोकांना वाटलं. कारण हर्मेस हा सर्व दैवतांचा संदेशवाहक असून बोलण्यात तरबेज असलेला देव आहे, असं मानलं जायचं.—प्रेका १४:१२.

  • हात ठेवणं.

    एखाद्या व्यक्‍तीला खास कामासाठी नियुक्‍त करायला किंवा आशीर्वाद द्यायला, रोग बरे करायला किंवा पवित्र शक्‍तीचं दान द्यायला एखाद्याला निवडण्यात आलं आहे, हे दाखवायला त्याच्यावर हात ठेवले जायचे. काही वेळा प्राण्यांचं बलिदान देण्याआधी त्यांच्यावर हात ठेवले जायचे.—निर्ग २९:१५; गण २७:१८; प्रेका १९:६; १ती ५:२२.

  • हातमाग.

    धाग्यापासून किंवा सूतापासून कापड विणायची एक चौकट.—निर्ग ३९:२७.

  • हात.

    लांबी आणि अंतर मोजायचं एक माप. एक हात म्हणजे हाताच्या कोपरापासून ते हाताच्या मधल्या बोटाच्या टोकापर्यंतची लांबी. इस्राएली लोक सहसा ४४.५ सें.मी. (१७.५ इंच) याला एक हात मानायचे. पण, ते लांब हाताचं मापसुद्धा वापरायचे. हे माप चार बोटं जास्त असायचं; म्हणजे सुमारे ५१.८ से.मी. (२०.४ इंच). (उत्प ६:१५; लूक १२:२५)—अति. ख१४ पाहा.

  • हिग्गायोन.

    संगीत निर्देशनाशी संबंध असलेला एक शब्द. स्तोत्र ९:१६ मध्ये ज्या प्रकारे हा शब्द वापरण्यात आला आहे त्यावरून दिसून येतं, की कदाचित गाणं मध्ये थांबवून वीणेवर गंभीर आणि खालच्या सुरात एक धून वाजवली जायची, किंवा मग मनन करायला थोडा वेळ थांबलं जायचं.

  • हिन.

    एक प्रकारचं द्रव माप आणि द्रव मोजायचं भांडं. एक हिन म्हणजे ३.६७ लिटर (निर्ग २९:४०)—अति. ख१४ पाहा.

  • हेडीस.

    एक ग्रीक शब्द. यासाठी असलेला हिब्रू शब्द “शिओल” आहे. त्याचं भाषांतर “कबर” असं करण्यात आलं आहे, म्हणजे मृत्यूनंतर सगळी माणसं जिथे जातात अशी एक लाक्षणिक कबर.—कबर पाहा.

  • हेरोद.

    एका राजेशाही घराण्याचं नाव; रोमी सरकारने या घराण्याला यहुद्यांवर राज्य करायला नेमलं होतं. महान हेरोद हा यरुशलेममधल्या मंदिराची पुनर्बांधणी करणारा आणि येशूला ठार मारायच्या हेतूने लहान मुलांची हत्या करण्याचा हुकूम देणारा म्हणून प्रसिद्ध होता. (मत्त २:१६; लूक १:५) महान हेरोदच्या मुलांना, म्हणजे हेरोद अर्खेलाव आणि हेरोद अंतिपा यांना आपल्या वडिलांच्या अधिकाराखाली असलेल्या वेगवेगळ्या भागांवर राज्य करायला नेमण्यात आलं होतं. (मत्त २:२२) अंतिपा हा राज्यपाल असला, तरी त्याला “राजा” म्हटलं जायचं; त्याने ख्रिस्ताच्या साडेतीन वर्षांच्या सेवाकार्यादरम्यान आणि प्रेषितांच्या १२ व्या अध्यायात नमूद असलेल्या घटना घडण्याच्या काळापर्यंत राज्य केलं. (मार्क ६:१४-१७; लूक ३:१, १९, २०; १३:३१, ३२; २३:६-१५; प्रेका ४:२७; १३:१) त्यानंतर, हेरोद अग्रिप्पा पहिला, म्हणजे महान हेरोदचा नातू याने फक्‍त काही काळ राज्य केल्यानंतर देवाच्या दूताने त्याला ठार मारलं. (प्रेका १२:१-६, १८-२३) पुढे, त्याचा मुलगा हेरोद अग्रिप्पा दुसरा हा राजा बनला आणि यहुद्यांनी रोमविरुद्ध बंड केलं तोपर्यंत त्याने राज्य केलं.—प्रेका २३:३५; २५:१३, २२-२७; २६:१, २, १९-३२.

  • हेरोदच्या पक्षाचे लोक.

    यांना हेरोदीय असंही म्हटलं जायचं. हा देशभक्‍तांचा एक पक्ष असून याचे सदस्य रोमी सरकाराच्या अधीन राज्य करणाऱ्‍या हेरोदच्या राजकीय हेतूंचं समर्थन करायचे. कदाचित काही सदूकी लोकही याच पक्षाचे होते. येशूचा विरोध करण्यात काही हेरोदीयांनी परुश्‍यांना साथ दिली.—मार्क ३:६.

  • होमर.

    एक घन माप; हे कोर मापाइतकंच आहे. हे माप २२० लिटर इतकं असून बथच्या अंदाजे मापानुसार मोजण्यात आलं आहे. (लेवी २७:१६)—अति. ख१४ पाहा.

  • होमार्पण.

    देवाला दिलं जाणारं प्राण्याचं बलिदान. यात अख्खाच्या अख्खा प्राणी देवासाठी अर्पण म्हणून वेदीवर जाळला जायचा. होमार्पण देणारी व्यक्‍ती प्राण्याच्या (बैल, मेंढा, बकरा, पारवा किंवा कबुतराचं पिल्लू) शरीराचा कोणताही भाग स्वतःसाठी ठेवायची नाही.—निर्ग २९:१८; लेवी ६:९.

  • होरेब; होरेब पर्वत.

    सीनाय पर्वताच्या आसपासचा डोंगराळ प्रदेश. सीनाय पर्वताचं दुसरं नाव. (निर्ग ३:१; अनु ५:२)—अति. ख३ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा